07 August, 2025

भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शेतकरी परिसंवाद उत्साहात

हिंगोली, दि. ७ (जिमाका): हरितक्रांतीचे जनक आणि भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंगोली येथे ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपसंचालक तथा नोडल अधिकारी (स्मार्ट) जी. बी. बंटेवाड, शास्त्रज्ञ राजेश भालेराव, उपसंचालक प्रसाद हजारे, तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप रणखांब आदी उपस्थित होते. या विशेष दिनानिमित्त प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली आणि कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत शेती दिन व शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन आत्मा सभागृह, हिंगोली येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक उपसंचालक तथा नोडल अधिकारी (स्मार्ट) जी. बी. बंटेवाड यांनी केले. मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथील शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी शाश्वत शेतीसंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, जैवविविधता संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि उत्पादनक्षम शेती यावर भर देत नवकल्पनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात येणाऱ्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात उपसंचालक प्रसाद हजारे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, सशक्त कृषी व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, बाजारपेठेची उपलब्धता आणि शाश्वत उत्पादनक्षमतेसंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी स्वतःच्या अनुभवांची माहिती देत नव्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमास सर्व बीटीएम व एटीएम कर्मचारी तसेच विविध गावांतील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन निता जावळे यांनी केले. हा परिसंवाद शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील सशक्त संवादाचा आदर्श ठरला असून शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. *****

No comments: