04 August, 2025

हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

• कावड यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रतिपादन हिंगोली, दि. 01 (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासन हिंगोली जिल्ह्याच्या विकासकामांसाठी भरघोस निधी पुरवठा करत असून, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी अहोरात्र झटत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे शासन सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नमो शेतकरी सन्मान निधी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यासह विविध योजना राबविण्यात येत असून, निधीअभावी या योजना बंद पडणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. हिंगोली येथील कावड यात्रा महोत्सव समितीच्या वतीने यात्रेचा समारोपीय कार्यक्रम गांधी चौकात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषद सदस्य हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बाबुराव कदम- कोहळीकर, माजी खासदार सुभाष वानखेडे उपस्थित होते. आमदार संतोष बांगर हे 2016 पासून कावड यात्रेचे आयोजन करत असून, गेल्या तीन वर्षांपासून येथे येत असल्याचे सांगून दरवर्षी या यात्रेला शिवभक्तांची हजेरी वाढत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षात जिल्ह्याच्या विविध विकासकामांसाठी आपण 2600 कोटी रुपयांचा भरघोस निधी दिल्याचे सांगून भविष्यातही हा निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या आदिवासी बांधवांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतांच्या भूमीत ही कावड यात्रा २०१६ पासून सुरू असून, आता ती हिंगोलीपुरती सीमित राहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेत संस्कृती, परंपरा धर्म वाढविण्याचे काम करत आमदार बांगर करत असल्याचे ते म्हणाले. ही यात्रा आध्यात्मिक परंपरेचे प्रतिक असून, त्याग, समर्पण, एकजुटीचे दर्शन घडत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबविल्याबाबत त्यांनी देशाच्या जवानांचे कौतुक केले. आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल व शिवमूर्ती भेट देऊन स्वागत केले. *****

No comments: