02 September, 2025

अनुकंपा उमेदवारांना १५ सप्टेंबरला नियुक्ती देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू

हिंगोली, दि. २ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार १५० दिवसांच्या कार्यक्रमांच्या अंतर्गत गट-क संवर्गातील प्रतीक्षा सूचीतील अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी हे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्हास्तरावर सर्व कार्यालय प्रमुख,नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या स्तरावर गट-क अनुकंपा प्रतीक्षासूची एकत्रित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अनुकंपा तत्त्वावर गट-क पदांवर नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची माहिती सर्व प्रतीक्षासूचीतील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दि. २९ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी एकूण ३२ उमेदवारांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उमेदवारांकडून नियुक्तीबाबत विकल्प घेण्यात आले असून शैक्षणिक पात्रता व उपलब्ध रिक्त पदांनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे शिफारस करण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी शिफारस केलेल्या अनुकंपा उमेदवारांना दि. १५ सप्टेंबर रोजी नियुक्ती आदेश देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. *****

No comments: