26 September, 2025

वसमत तहसीलमध्ये जनता दरबार

• प्राप्त अर्जावर संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश हिंगोली (जिमाका), दि. 26 : छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनांक 02 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा अंतर्गत वसमत येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार राजूभैया नवघरे व उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. या जनता दरबारात सर्व प्राप्त अर्जावर नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले. तसेच सर्व संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या जनता दरबार कार्यक्रमामध्ये नवीन लोकांना महसूल विभाग वसमत अंतर्गत ई रेशनकार्ड 06, मराठा कुणबी जातीचे दाखले 08, उत्पन्न प्रमाणपत्र, वय व अधिवास, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रत्येकी 5, आयुष्यमान भारत कार्ड, एमआरईजीएस वर्क ऑर्डर, 155 चे आदेश, जिवंत सातबारा आणि आदिवासी खातेदारांना वर्ग(2) सातबाराचे रूपांतर करून वर्ग (1) व तसेच मौजे म्हातारगाव, ता.वसमत येथे झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे ओढ्यास पूर येऊन केशव तुकाराम जाधव हे मयत झालेले आहेत. त्यांच्या वारस पत्नी श्रीमती कांताबाई केशव जाधव यांना आज 4 लाख रुपये जमा होण्याबाबतची सर्व प्रक्रिया बाबतची कागदपत्रे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार डी. जाधव, डॉ.विनोद डोणगावकर, गटविकास अधिकारी तोटावाड, मुख्याधिकारी आशुतोष चिंचोलकर, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे तसेच सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. या जनता दरबार कार्यक्रमास तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ******

No comments: