17 September, 2025

पालकमंत्री नरहरी झिरवाळ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

• पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी केली अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी हिंगोली, दि.17 (जिमाका): गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, हरीष गाडे, शारदा दळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री झिरवाळ यांनी हिंगोली तालुक्यातील सवड, नरसी नामदेव, सेनगाव तालुक्यातील पुसेगाव, सेनगाव तसेच औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील सुरेगाव, गलांडी, नागेशवाडी, हट्टा, गुंडा गावांना भेट दिली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासमोर सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी हानी झालेली पिके दाखवत वास्तव चित्र मांडले. यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सवड येथील शेतकरी नारायण जोजार यांच्या सोयाबीन पिकाची, नरसी नामदेव येथील शेतकरी विलास नागरे व सतीष नागरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची, सुरेगाव येथील शेतकरी बाबूराव पवार यांच्या सोयाबीन, गलांडी येथील शेतकरी बालासाहेब पाठक यांच्या कापूस, नागेशवाडी येथील शेतकरी कोंडबा बेले यांच्या सोयाबीन आणि हट्टा येथील संजय बडवे यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पालकमंत्री झिरवाळ यांनी या वेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी शासनाच्या विविध मदत योजनांतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. "शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे. कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही," असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचे हाल-अपेष्टा जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने रस्ते दुरुस्ती व आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुंडा येथील पुरात वाहून गेलेल्या महिलांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन वसमत तालुक्यातील गुंडा येथील श्रीमती सखुबाई विश्वनाथ भालेराव आणि श्रीमती गयाबाई अंबादास सारोळे या दोन महिला शेतक-यांचा शुक्रवार (दि.१२) रोजी पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज गुंडा येथे त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पुसेगाव येथील भगवान महावीर संस्थानच्या कामाची केली पाहणी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथील भगवान महावीर संस्थानच्या विकासकामांची पाहणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांसाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल, असेही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी संत नामदेव महाराजाचे दर्शन घेऊन केली मंदिर कामाची पाहणी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सवड येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर नरसी नामदेव येथे संत नामदेव मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर येथील सभामंडप व विविधकामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येथील विकासकामांची माहिती दिली. पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन केली मंदिर कामाची पाहणी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी औंढा नागनाथ येथे नागेश्वर ज्योतीर्लिंग मंदिरात जावून दर्शन घेतले. त्यानंतर येथील विकास आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या विविध कामाची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिली. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, तहसीलदार हरीश गाडे उपस्थित होते. ******

No comments: