18 September, 2025
नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जस्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे राज्याचे अन्न व औषध, विशेष सहाय मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी आमदार राजुभैय्या ऊर्फ चंद्रकांत नवघरे, आमदार संतोष बांगर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या महिन्यात जिल्ह्यात 2 लाख 71 हजार 586 हेक्टर क्षेत्राचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. जवळपास 85 टक्के क्षेत्र बाधित झालेले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच सध्या हळद पीक हे पीक पेरामध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला पूर आल्यामुळे काठावरील जमिनी खरडून गेल्या आहेत. या शेतकऱ्यांनाही मदत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच भविष्यात पुराचा धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच मयत झालेल्या जनावरांचेही पंचनामे करुन निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच न सापडलेल्या पशुंच्या मालकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्याला पूर आल्यामुळे रस्ते व पूल खराब व नादुरुस्त झाले आहेत. त्या सर्व पुलाची व रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व बाबीच्या नुकसानीची माहिती तात्काळ उपलब्ध करुन द्यावा. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
जलजीवन मिशनचे काम वेळेत पूर्ण करावेत. तसेच यासाठी लागणारे ट्रान्सफार्मर बसविण्याची कार्यवाही करावी. याबाबत संबंधित विभागाची बैठक घेऊन कामाच्या सद्यस्थितीची माहिती घ्यावी. तसेच तक्रारी असलेल्या कामासाठी समिती गठीत करुन चौकशी करुन काम न करणाऱ्या कंत्रादारावर व दोषीवर कार्यवाही करावी. तसेच जिल्हा परिषद अंतर्गतची सर्व कामे प्रशासकीय मान्यता देऊन तात्काळ पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिल्या.
आरोग्य विभागाने प्रत्येक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात कुत्रा चावल्यानंतर व साप चावल्यानंतर द्यावयाच्या प्रतिबंधात्मक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. डायलेसीस रुग्णांची संख्या लक्षात शासकीय महाविद्यालयात दिवसरात्र डायलेसीस सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. तसेच वसमत येथील ग्रामीण रुग्णालयात डायलेसीसची सुविधा सुरु करण्यासाठी कामाला गती द्यावी. तसेच आवश्यक मनुष्यबळासाठी प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगून आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मोहिमांचा यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांनी घेतला.
स्मशानभूमीची कामे, सीसीटीव्ही, पोलीस विभाग मनुष्यबळ वाढीचा प्रस्ताव, जिल्हा कारागृह कामाच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्यात येईल. तसेच शासनामार्फत दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवाड्यात सर्व अधिकाऱ्यांनी पाणंद रस्त्याची व इतर विविध कामे तातडीने पूर्ण करुन आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केले.
गोजेगाव, नुपूर, पोटा या नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्याचे पंचनामे करावेत. जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करावी. वसमत येथील डायलेसीस सेंटर सुरु करावेत. गवळेवाडी, सारंगवाडी व बेरुळा येथील रस्ते व पुलाची दुरुस्ती करावी. जोडजवळा रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी. सिरळी वसमत येथे पोलीस चौकी उभारावी. नदीनाले खोलीकरण, सरळीकरणाची कामे करावीत, अशा सूचना आमदार राजूभैय्या नवघरे यांनी दिल्या. यावर पालकमंत्र्यांनी आमदारांनी सूचविलेली कामे वेळेत पूर्ण करुन तसे त्यांना अवगत करावे, अशा सूचना केल्या.
जलजीवन मिशनच्या पूर्ण झालेल्या कामाच्या ठिकाणी ट्रान्सफार्मर बसवावेत. जलजीवन मिशनच्या कामाची तक्रारी आहेत. याबाबत चौकशी करावी. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डायलेसीसची सुविधा दिवसरात्र सुरु ठेवावी. कळमनुरी येथे सीटीस्कॅनची सुविधा सुरु करावी. गांगलवाडी, दुधाळा येथील पुलाची दुरुस्ती करावी. कळमनुरी व आखाडा बाळापूर येथे सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. यासह विविध सूचना करुन वेळेत कामे करावीत, अशा सूचना दिल्या. यावर पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी आमदारांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वेळेत कामे पूर्ण करुन त्याची माहिती त्यांना द्यावी, असे सांगितले.
या बैठकीस विविध विभागाचे विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment