24 September, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

• जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच संगणक प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. यासाठी अतिरिक्त लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, मत्स्यव्यवसाय, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, पाटबंधारे, शिक्षण, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. तसेच जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हा विकास आराखड्यासाठी केंद्र व राज्यस्तरावरुन प्राप्त निधीची माहिती द्यावी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणारा 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातील कामावर खर्च करण्याच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने केंद्र व राज्यस्तरावरुन तसेच इतर माध्यमातून सर्व संबंधित विभागाना प्राप्त होणाऱ्या निधीचे लेखा शिर्ष व लेखा शिर्षाचे नाव यासह सन 2024-25 मध्ये प्राप्त निधीची माहिती 1 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. *******

No comments: