29 September, 2025
ग्राम बाल संरक्षण समितीचे दोन दिवशीय प्रशिक्षण संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाची सेनगाव येथे ग्राम बाल संरक्षण समितीचे दोन दिवसीय प्रशिक्षण जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
या प्रशिक्षणात सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक मस्के आणि सेनगाव येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी केले. पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांनी बालकांच्या संरक्षणासंदर्भात ग्राम बाल संरक्षण समितीमधील सदस्य, अंगणवाडी सेविका, शाळेचे मुख्याधापक, ग्रामसेवक, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील यांना उद्देशून बोलताना जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे व यासाठी पोलीस विभागामार्फत शाळांमध्ये जाऊन विविध कायद्याची जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती दिली. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे यांनी ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात बालकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे कशाप्रकारे निरसण करण्यात यावे याबाबत मार्गदर्शन केले व सर्व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या बैठका घेऊन बालविवाह या प्रथेला आळा घालण्यासंदर्भात सूचना दिल्या.
दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे आणि सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य व जबाबदाऱ्या, बाल संरक्षण यंत्रणा विषयी माहिती दिली. समुपदेशक सचिन पठाडे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 यातील महत्त्वाच्या तरतुदी व अंमलबजावणी, बाल हक्क सुरक्षा अभियान मूलभूत हक्क व सामुदायिक जनजागृतीविषयी माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण यांनी दत्तक विधान कायदेशीर प्रक्रिया व पात्रता याविषयी तर कायदा तथा परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 कायदेशीर बाबी व प्रतिबंध उपाय याविषयी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे आणि लेखापाल शितल भंडारे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, प्रतिपालकत्व योजना, अनाथ प्रमाणपत्र, बालगृह, निरीक्षण ग्रह आणि बालन्याय मंडळ व बाल कल्याण समिती यांच्या कार्यप्रणालीविषयी माहिती दिली, चाईल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे आणि समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी चाईल्ड हेल्पलाइन 1098 याविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा तथा परीविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित आणि लेखापाल शितल भंडारे यांनी केले. बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षणात तालुका संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, चाईल्ड हेल्प लाईन 1098 चे केस वर्कर राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे यांनी परिश्रम घेतले. हे प्रशिक्षण जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment