09 September, 2025

निधी मागणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे रमेश भडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर न करणाऱ्या कार्यालय प्रमुखावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास, परिवहन विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी निती आयोगाच्या निर्देशांकानुसार आकांक्षीत तालुका हिंगोलीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावेत. केलेल्या कामाची माहिती पोर्टलवर वेळोवेळी अपडेट करावी. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत ज्या बाबीसाठी निधी नाही ती कामे आकांक्षीत उपक्रमांतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले. *******

No comments: