28 September, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा घेतला आढावा
• तातडीच्या मदतकार्यांना गती देण्याचे निर्देश
हिंगोली, दि. २८ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील नुकसान, मदतकार्यांची स्थिती, निधी वितरणाची प्रगती यासह उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास २३ मंडळांमध्ये पिकांचे, घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे १० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला होता, मात्र आता पाणी हळूहळू ओसरत असून प्रशासनाकडून दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. संपर्क पुनर्स्थापनासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ कामे हाती घेण्याचे निर्देश यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे निर्देश दिले. यासाठी २३१.२७ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आला असून, या निधीचे वाटप पारदर्शक व त्वरीत होण्यासाठी संबंधित विभागांनी पूर्ण समन्वय ठेवावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच, कोणत्याही लाभार्थ्याला मदत मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी विशेष पथके तयार करून गतीने कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.
अतिवृष्टीदरम्यान जिल्ह्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात आली आहे. याशिवाय, जनावरे गमावलेल्या शेतकऱ्यांपैकी काहींना मदत वाटप करण्यात आली असून, उर्वरित लाभार्थ्यांना मदत वितरणाचे काम वेगाने सुरू आहे. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पंचनामे करून मदत तातडीने वितरित करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी पुरवठा, अन्नधान्य वितरण यांसारख्या मूलभूत सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश देत त्यांनी पाणीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने वैद्यकीय पथके तैनात करण्याचेही आदेश दिले.
लोकहिताच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता तातडीची मदत कार्यक्षमतेने व पारदर्शकतेने राबवावी. हिंगोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतकार्यांना अधिक गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment