04 September, 2025
जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा
हिंगोली (जिमाका), दि. 4 : जगातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धेचे आयोजन सन 2026 मध्ये करण्याचे निश्चित झाले आहे. या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. सन 2026 मध्ये या स्पर्धेचे आयोजन शांघाई येथे करण्यात येणार असून ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. हिंगोली जिल्ह्यातील 23 वर्षांखालील तरुणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्यासाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे.
या स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 63 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, क्षेत्रातील कौशल्य स्पर्धा (सेक्टर स्कील कॉम्प्यूटेशन), विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन प्रथमत: जिल्हास्तर, तद्नंतर विभागस्तर व राज्यस्तरावर होणार असून त्यात निवड झालेले उमेदवार देशपातळीवर व देशपातळीवरील निवड झालेले उमेदवार जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2026 मधील जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 50 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच डिजिटल कन्स्ट्रक्शन, क्लाऊड कॉम्प्यूटींग, सायबर सेक्युरिटी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडिटीव्ह मॅन्यूफॅक्चरींग, इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, मेट्रॉनिक्स (Mechatronics), ऑप्टोइलेक्ट्रॉनिक टेक्नॉलाजी, रोबोट सिस्टीम इंटीग्रेशन, वाटर टेक्नॉलाजी, डेंटल प्रोस्थेटीक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स या क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म दिनांक 01 जानेवारी, 2001 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
शांघाई येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 करिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेसाठी सर्व आयटीआय, पॉलटेक्नीक, एमएसएमई टूल्स रुम, सीआयपीईटी, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट, कार्पोरेट टेक्निकल इन्स्टीट्यूट, कौशल्य प्रशिक्षण संस्था, महाविद्यालये, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीइटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, फाईपन आर्ट कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टीट्यूट, इन्स्टीट्यूट ऑफ ज्वलेरी मेकींग, कौशल्य प्रशिक्षण केंद्र (टीपी/टीसी/व्हीटीआय) इत्यादी सर्व संस्था, आस्थापनांना आपणाकडील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, कामगारांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अवगत करण्यात यावे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक असणाऱ्या उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देऊन दिनांक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02456 - 224574 यावर किंवा कार्यालयाचा पत्ता : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, 3 रा माळा, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment