12 September, 2025

मागासवर्गीय महिला बचतगटांनी अर्थसहाय्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

• ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिला बचतगटांना आवाहन हिंगोली(जिमाका), दि. 12 : जिल्हा परिषदेच्या सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिला बचतगटांना पॅकेजिंग मशीन खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरविणे या योजनेसाठी पात्र बचतगटांच्या अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ही योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिला बचत गटासाठी लागू असून बचत गटाची नोंदणी संबंधित अधिकृत विभागामार्फत झालेली असावी. बचत गटाला किमान 6 महिने ते एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेला असावा. बचत गटाचे आर्थिक व्यवहार नियमित असावेत. बचत गटाकडे हळद, मसाले, शेतीमाल, अन्नप्रक्रिया इत्यादी उत्पादन किंवा प्रक्रिया करणारे कार्य सुरू असावे. प्राप्त प्रस्तावामधून निवड केलेल्या बचतगटांने प्रकल्प उभारणी करुन अनुदानासाठी मुळ देयकासह प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर अनुदानाच्या किमतीच्या 90 टक्के किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिला बचतगटांनी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी प्रवर्गातील) आपले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती अथवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली या कार्यालयात दिनांक 25 सप्टेंबर, 2025 पर्यंत सादर करावेत. विलंबाने प्रस्ताव सादर केल्यास त्याचा विचार केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, व जिल्हा समाज कल्याण अधिकारी गिता गुट्टे यांनी केले आहे. *****

No comments: