14 September, 2025

हिंगोलीत "संडेज ऑन सायकल" उपक्रम सुरु

हिंगोली (जिमाका),दि.१४: शहरात "संडेज ऑन सायकल" या उपक्रमास आज रविवार, (दि. १४) रोजी सकाळी येथील तालुका क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. तसेच या रॅलीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सहभाग घेतला. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी हिंगोली जिल्ह्याचा उद्योन्मुख राष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण राठोड यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. सायकल चालविणे हा प्रकार सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. परंतु अलीकडच्या काळात हा प्रकार काही प्रमाणात दुर्मिळ होत असताना दिसून येत आहे. पूर्वीच्या काळात सायकल चालविणे हा प्रकार आवडीचा व छंद असलेला दिसून येत होता. सायकल चालविणे या प्रकारास चालना देण्याकरिता देशाचे केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या संकल्पनेतून डिसेंबर, २०२४ पासून देशव्यापी "संडेज ऑन सायकल" हा उपक्रम सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात "संडेज ऑन सायकल" या रूपात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात सायकल चालविणे यांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा हौशी सायकल असोसिएशन, एकता युवा स्पोर्टस फाऊडेंशन व स्विस सीबीएससी अकादमी यांच्याकडून "संडे ऑन सायकल" ग्रुप हिंगोली निर्माण करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये ५ मास्टर ट्रेनर, १५ मुले व १५ मुली अशा एकूण ३५ जणांचा संघ तयार करण्यात आला आहे. हा संघ दर रविवारी सकाळी ८.३० वाजता शहरातील विविध नगरात सायकल रॅलीव्दारे सायकल चालविणे यासह शहरात व्यायाम, पर्यावरण व स्वच्छताबाबत घोषणा देऊन जनजागृती करणार आहेत. या प्रसंगी छत्रपती पुरस्कार्थी प्रा. बंकट यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा अँथेलेटीक्स संघटनेचे सचिव रमेश गंगावणे, हिंगोली जिल्हा हौशी सायकलिंग असोसिएशनचे सचिव शिवाजी इंगोले, क्रीडाधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा मार्गदर्शक निळकंठ श्रावण, स्विस अकादमीचे प्रा. डी. जी. कवडे, क्रीडाशिक्षक अनिता कांबळे व बॅडमिंटन प्रशिक्षक कार्तिक यादव उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशिक्षक गजानन आडे, प्रशिक्षक विजय गव्हाणे, प्रशिक्षक विजय जाधव व क्रीडाशिक्षक रावसाहेव गेंडाफळे यांनी सहकार्य केले. ******

No comments: