24 September, 2025
औंढा नागनाथ तहसीलमध्ये जनता दरबार
• प्राप्त अर्जावर संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 24 : छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस (दि.17) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (दि.2)दरम्यान सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयात आमदार संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले. यामध्ये महसूल विभागाची 16, पंचायत समितीची 04, औंढा ना. नगरपंचायतीची 03, राज्य परिवहन महामंडळाचे 02, भूमी अभिलेख, महिला व बालविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ व मंदिर प्रशासनाचे प्रत्येकी एक असे एकूण विविध विभागाचे 30 अर्ज प्राप्त झाले होते. सर्व प्राप्त अर्जावर सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकण्यात आले. तसेच सर्व संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
या जनता दरबारामध्ये नवीन लोकांना ई-रेशनकार्ड, मराठा कुणबी जातीचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, एमआरईजीएस वर्क ऑर्डर, 155चे आदेश, जिवंत सातबारा इत्यादीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे, पोलीस निरीक्षक गणेश राहीरे, मुख्याधिकारी महादेव घुगसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. कलटेवाड, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक एस. के. इंगोले, तालुका कृषी अधिकारी एस. एस. संगेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे, गटशिक्षणाधिकारी रवि कवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. टाक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले, महावितरणचे उपअभियंता रणवीर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजूसाहेब नरवाडे, आगार प्रमुख बांगर आदी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment