25 September, 2025

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

हिंगोली, दि.25 (जिमाका): हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या परिस्थितीत शासन आपल्यासोबत असून आपणास मदत मिळवून देण्यासाठी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज आढावा बैठकीत दिले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. त्यावेळी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मागच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन सर्व मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने आज हिंगोली जिल्ह्यातील कन्हेरगाव नाका, आंबाळा, माळहिवरा, भिरडा, डोंगरगाव पूल येथे भेट देऊन पाहणी केली आहे. यावर्षी राज्यावर मोठे नैसर्गिक संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ऑगस्टपर्यंत बाधित झालेल्या 3 लाख 8 हजार पात्र शेतकरी बांधवांचे 2 लाख 71 हजार 586 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यासाठी 231 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे. येत्या आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चालू महिन्यात झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्याची मदत मिळविण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये 13 लोक मयत झाले आहे. त्यांच्या वारसांना नियमानुसार सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच 237 पशुचीही तात्काळ मदत देण्यासाठी 2 कोटी 73 लक्ष रुपयांचा निधी लागणार आहे. आतापर्यंत 120 पशुपालकांना 35 लाख 88 हजाराचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच वाहून गेलेल्या व शोध न लागलेल्या जनावरांचीही भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. नदीनाल्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत, सोलर पंप, रस्ते, विद्युत खांब, घरांचे नुकसान झाले आहे, याचेही पंचनामे करुन मदत देण्याची कार्यवाही करण्यात येईल. संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचून आपणास मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच त्यांनी शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *****

No comments: