24 September, 2025

सांगलीचे तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात पहिले महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर

• कळमनुरीच्या श्री ओमसाई गणेश मंडळाला मिळाला जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार हिंगोली (जिमाका), दि. 24 : महागणेशोत्सवः महाराष्ट्राचा राज्य उत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या, 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चा निकाल जाहीर झाला असून सांगलीच्या विटा तालुक्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. लातूरचे वसुंधरा वृक्षारोपी गणेशोत्सव राज्यात दुसरे व सुवर्णयोग तरुण मंडळ अ.नगर यांनी राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. यासोबतच जिल्हास्तरीय प्रथम द्वितीय व तृत्तीय विजेत्यांची घोषणा करण्यात आली असून तालुकास्तरापर्यंत विस्तारित केलेल्या या स्पर्धेअंतर्गत विजेत्या झालेल्या तालुकास्तरीय मंडळांची घोषणा शासनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील श्री ओमसाई गणेश मंडळाने प्रथम, आजेगाव येथील पर्यावरण पुरक गणेश मंडळाने द्वितीय तर हिंगोलीच्या राजा गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. 25 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून या समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या शुभहस्ते विजेत्या मंडळांचा पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे. *****

No comments: