18 September, 2025

कंजारा येथील जिल्हा परिषद शाळेत चाईल्ड हेल्पलाईन मार्फत बाल संसद स्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा चाईल्ड हेल्पलाईन 1098 सनियंत्रण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्या नियोजनानुसार हिंगोली चाईल्ड हेल्प लाईन 1098 कक्ष हिंगोली मार्फत औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत "बाल संसद" स्थापन करण्यात आली. "बाल संसद" म्हणजे मुलांची संसद, जिथे मुले त्यांच्या शाळा आणि समाजाशी संबंधित समस्यांवर चर्चा करतात आणि निर्णय घेण्यात भाग घेतात. बाल संसद मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे म्हणणे ऐकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. नेतृत्व क्षमता हे मुलांमध्ये नेतृत्व, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित करण्यास मदत करते. लोकशाही प्रक्रिया बाल संसद लोकशाही प्रक्रियेद्वारे कार्य करते, जिथे मुले त्यांचे प्रतिनिधी निवडतात. शाळा आणि समाजात हक्कांचे संरक्षण हा उपक्रम मुलांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याच्या अधिकाराचे संरक्षण करतो. उदाहरण : बाल संसदेत पंतप्रधान, शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री, आरोग्य मंत्री, कृषी मंत्री आणि पर्यावरण मंत्री अशा पदांवर मुलांची निवड केली जाते. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कडून जनजागृती करण्यात येत आहे. या बाल संसद स्थापन प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला व बाल संसद कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे उपस्थित होते. तसेच समुपदेशक अंकुर पाटोडे व केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी सहकार्य केले. यावेळी संबधित शाळेतील मुख्याध्यापक व्ही.यु.हालगे, एस. बी. खरात आर.बी. लडके शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: