29 September, 2025

युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना सलाम करण्यासाठी शौर्य दिनाचे आयोजन - निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड

हिंगोली (जिमाका), दि. 29 : कारगील युध्दात भारतीय सैन्य दलाने आपले शौर्य दाखवून दिले आहे. आपल्या देशासाठी अनेक जवान शहीद झाले आहेत. या युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना सलाम करुन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी आज केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा आणि माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुकाडे, संघपाल खराटे, कडूजी टापरे, बाबूराव जांबूतकर, पंडितराव हाके व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा, माजी सैनिकांच्या विधवा यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वीर जवान व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी वीर माता, वीर पिता, माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्थानिक परिस्थितीनुसार आणि आदेशाचे पालन करुन अत्यंत साधेपणाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. ******

No comments: