14 September, 2025

लोकन्यायालयामध्ये १३ कोटी ३५ लाख रुपयांची ६९८ प्रकरणे निकाली

हिंगोली (जिमाका), दि. १४: सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालय मुंबई आणि हिंगोली जिल्हा न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली व न्यायिक जिल्हा हिंगोली अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांमध्ये शनिवार (दि. १३)रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली २ हजार ८७७ प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व १३ हजार २९२ प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. या लोकन्यालयामध्ये तडजोडी आधारे रक्कम ठरवून तब्बल १३ कोटी ३५ लाख ६ हजार ३३९ रुपयांची प्रलंबित ३८२ व वाद दाखलपूर्व ३१६ अशी ६९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा हिंगोली तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष टी. एस. अकाली यांच्या मार्गदर्शनानुसार हिंगोली जिल्हा व तालुका न्यायालयात न्यायिक अधिकारी तसेच विधिज्ञ समाविष्ठ असलेले एकूण १२ पॅनल करण्यात आले होते. यामध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ पी. जी. देशमुख, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ आर. एस. रोटे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. जी. महाळणकर, दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती डी. व्ही. भंडारी, तिसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर श्रीमती एस. एस. पळसुले यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. या लोक अदालतीला वकील संघाचे सन्माननीय सदस्य, सभासद, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. *लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय, पक्षकारास १ कोटी २७ लाखाचा दिला मावेजा* या लोकन्यायालयामध्ये अर्जदार गिता सुरेशराव बांगर यांचे पती सुरेश बळीराम बांगर हे अपघातामध्ये दिनांक ११ एप्रिल, २०२३ रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी २०२३ मध्ये दावा दाखल केला होता. तसेच अर्जदार जयश्री सुधाकर गिते यांचे पती सुधाकर रामराव गिते हे अपघातामध्ये दिनांक ०५ एप्रिल, २०२२ रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी २०२२ मध्ये दावा दाखल केला होता. ही दोन्ही प्रकरणे लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आली होती. या प्रकरणामध्ये उभय पक्षकारामध्ये तडजोड होवून तडजोडी अंती अर्जदार गिता बांगर यांना ५७ लाख रूपये व जयश्री गिते यांना ७० लाख रुपये तडजोड रक्कम ठरविण्यात आली. या प्रकरणामध्ये लोकअदालतच्या दिवशीच तात्काळ रॉयल इंशुरन्स व एच.डी.एफ.सी. इंशुरन्स कंपनीतर्फे पक्षकारांना रक्कमेचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस. अकाली व पॅनल प्रमुख तदर्थ जिल्हा न्यायाधीश-०१ पी.जी. देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. दिनांक १३ डिसेंबर, २०२५ मध्ये होणाऱ्या लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून जलद न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे. ******

No comments: