23 September, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, दिव्यांग व्यक्ती सल्लागार समिती, अपंग पुनर्वसन केंद्राची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गिता गुठ्ठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, महिला व बालविकास अधिकारी एस.आर. दरपलवार, पोलीस विभागाचे अधिकारी यांच्यासह सर्व बैठकीचे समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा दक्षता व समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रस्तावावर चर्चा करुन पात्र प्रकरणाला मंजुरी देण्यात आली. तसेच दोषारोपाची प्रलंबित प्रकरणे पोलीस विभागानी तातडीने निकाली काढावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. तसेच सर्व शासकीय कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी सुगम्य करण्यासाठी दिव्यांगासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे, त्यांना विविध योजनेचा लाभ मिळवून देणे, शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित तपासणी करुन दिव्यांग विद्यार्थी शोधणे व त्यांना योग्य उपचार उपलब्ध करुन देणे,आयुष्यमान भारत अंतर्गत दिव्यांगाना लाभ, युडीआयडी कार्ड देणे यासाठी सर्व संबंधित विभागानी नियोजन तयार करावे. अपंग पुनर्वसन केंद्राच्या लिफ्टच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्रादारावर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. यावेळी दिव्यांगाचे पालकत्व देण्याच्या प्रस्तावाला तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रासाठी थेरपीस्ट नेमण्यासाठी व त्याच्या अनुदानासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत बैठकीत मान्यता देण्यात आली. *****

No comments: