12 September, 2025

हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त उद्योग स्थापन करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 12 : शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्मार्ट प्रकल्प यासह विविध योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त उद्योग स्थापन करावेत आणि हिंगोली जिल्ह्याच्या विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. भारतीय रिझर्व बँक व हिंगोली जिल्ह्यातील बँकर्सच्या वतीने री-केवायसी आणि आर्थिक समावेशन योजनांची पूर्ण अंमलबजावणीसाठी मोहीम आज हिंगोली येथे राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी यावेळी विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते. त्यामध्ये अविनाश कपूर, नागेश्वर राव, व्यंकटेश कुरुंदकर, कावेरी, सुजीत झोडगे यांचा समावेश होता. योजनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना, बचतगटांना कर्ज घेण्यासाठी बँकेत जाऊन री-केवायसी करावी लागत असत. बँकेने आयोजित केलेल्या अभियांनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊन री-केवायसी करण्यात येत आहे. री-केवायसी प्रमाणे कर्ज मेळावा घेऊन जास्तीत जास्त अर्ज एकाच दिवशी स्वीकारुन ते तात्काळ निकाली काढावेत. यापूर्वी इतर जिल्ह्यात 20 कोटी रुपयाचे कर्ज एका दिवसात रिलीज केल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी उद्योग वाढविले पाहिजेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचे निकष संबंधित संकेतस्थळावर दिलेले आहेत त्याची माहिती घेऊन प्रस्ताव सादर करावेत. ग्रामपंचायतीमध्ये योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कोणतीही अडचण असल्यास नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे सांगून या कार्यक्रमात सहभागाबद्दल नागरिकांचे आभार मानले. यावेळी रिझर्व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँक ग्राहकांना मार्गदर्शन केले. यावेळी अविनाश कपूर यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व सुजीत झोडगे यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत झोडगे यांनी केले तर कानेकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व सर्व बँकर्सनी परिश्रम घेतले. यावेळी विविध बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

No comments: