25 September, 2025
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी
* एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे
* बांधावर जावून जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद
हिंगोली, दि.25 (जिमाका): जिल्ह्यात सतत पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी येथील शेतक-यांना आज दिला. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आज जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यात शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात शिक्षण मंत्री भुसे यांनी हिंगोली तालुक्यातील कन्हेरगाव नाका, आंबाळा, माळहिवरा, भिरडा, कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावांना भेट दिली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी शिक्षण मंत्री श्री. भुसे यांच्यासमोर सोयाबीन, कापूस, तूर आदी हानी झालेली पिके दाखवत वास्तव चित्र मांडले.
शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी या वेळी प्रशासनाला राहिलेल्या क्षेत्राचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी शासनाच्या विविध मदत योजनांतर्गत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. "शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे आहे. त्यामुळे मदतीपासून कुणालाही वंचित ठेवले जाणार नाही," असेही त्यांनी सांगितले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)




No comments:
Post a Comment