30 September, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली राजकीय पक्ष प्रमुखांची बैठक, पदवीधर मतदारसंघासाठी मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे आवाहन
हिंगोली(जिमाका), दि.30: 1 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, यादृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.गुप्ता म्हणाले, पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक-18 भरुन देणे आवश्यक आहे. नमुना-18 सोबत पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज सादर करताना पदनिर्देशित अधिकाऱ्यास मूळ प्रमाणपत्र, गुणपत्रिका तपासणीसाठी दाखविणे आवश्यक आहे किंवा प्रमाणपत्र, गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित किंवा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली प्रत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठांतून 01 नोव्हेंबर, 2025 पूर्वी किमान 3 वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीची समकक्ष पात्रता धारण करणारा पदवीधर पात्र राहील. अर्ज मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे प्रत्यक्षपणे किंवा टपालाने सादर करता येईल. एक गठ्ठा पद्धतीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. कुटुंबातील एका सदस्यास कुटुंबातील इतर सदस्याचा अर्ज सादर करता येईल.
5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 36 मतदान केंद्र असून त्यावेळी 16 हजार 764 एवढे मतदार होते.
मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत. तर जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत.
कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरिक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. कोणीही पात्र मतदार मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असेही ते म्हणाले.
1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025, वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार दि. 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी शनिवार दि. 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 किंवा 19 द्वारे दावे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि. 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. 25 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे गुरुवार दि. 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment