11 September, 2025
पीक प्रात्यक्षिकासाठी नोंदणीकृत शेतकरी गटांनी 26 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 11 : रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून पीक प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर दि. 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अणि पोषण अभियान कडधान्य (हरभरा) व पौष्टिक तृणधान्य-उपअभियान (श्रीअन्न) (रब्बी, ज्वारी) तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया (करडई) व आरकेव्हीवाय महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य (रब्बी, ज्वारी) राबविण्यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2025-26 मध्ये कार्यक्रमाची अंमलबजाणी करावयाची आहे. त्यानुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादीसाठी हे पीक प्रात्यक्षिके करण्यात येणार आहेत. यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
शेतकरी गट हा 31 मार्च 2024 पूर्वी नोंदणी केलेला असावा. यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर दि. 31 मार्च 2025 पूर्वी नोंदणी केलेल्या शेतकरी गटांनी विद्यमान शेतकरी गट पर्याय निवडून युजरनेम आणि पासवर्ड वापर करुन लॉगिन करणे अपेक्षित आहे. शेतकरी गट आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्नोती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नोती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल. पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात 25 पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने एकाच गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करावी. पीक प्रात्यक्षिकासाठी महाडिबीटी पोर्टलव्दारे नोंदणीकृत शेतकरी गट, कंपनी, संस्थाची निवड प्रथम अर्ज करण्याऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येईल. गटातील शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करुन फार्मर आयडी क्रमांक असणे बंधनकारक आहे.
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादीनी महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर दि. 26 सप्टेंबर, 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे .
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment