15 September, 2025

बालकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी ग्रामस्तरावर सक्रीय सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे मार्गदर्शन

• दोन दिवशीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण संपन्न हिंगोली, दि.15 (जिमाका) : बालकांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी ग्रामस्तरावर सक्रीय सहभाग आवश्यक आहे. बालविवाह निर्मूलनासाठी सर्वांनी सजग राहून काम करावे. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती मधील सर्व सदस्यांनी आपल्या गावात उत्कृष्ट कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दोन दिवशीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यक्रमास ग्राम बाल संरक्षण समिती मधील सदस्य, अंगणवाडी सेविका, शाळेचे मुख्याधापक, ग्रामसेवक, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष यांना मार्गदर्शन करताना दिल्या. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ‘मिशन वात्सल्य’योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात ग्राम बाल संरक्षण समित्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाची सुरुवात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी करत प्रशिक्षणाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या प्रशिक्षणात विविध विषयांवर संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये विधी सल्लागार वर्षा पराते यांनी "कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा 2013" याविषयी माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे आणि सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा पठाण यांनी ग्राम बाल संरक्षण समितींची भूमिका, जबाबदाऱ्या व बाल संरक्षण यंत्रणेचे कार्य स्पष्ट केले. तसेच ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन याबाबत महत्त्व स्पष्ट केले. गणेश मोरे यांनी "शिक्षणाचा अधिकार कायदा" याविषयी माहिती दिली. तालुका संरक्षण अधिकारी जगदीश राठोड यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 यावर प्रकाश टाकला. समुपदेशक सचिन पठाडे यांनी "बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012", बाल हक्क सुरक्षा अभियान, मुलांचे मूलभूत हक्क व जनजागृती यावर मार्गदर्शन केले. बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखान पठाण यांनी दत्तक विधान प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया व पात्रतेबाबत माहिती दिली. कायदा व परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कायदेशीर बाबी आणि प्रतिबंधात्मक उपायाबाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, प्रतिपालकत्व योजना, अनाथ प्रमाणपत्र, बालगृह, निरीक्षण गृह अशा विविध योजनाबाबत माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व धम्मप्रिया पखाले यांनी तात्काळ सेवा व फोन रिस्पॉन्स सिस्टीमची माहिती दिली. तालुका संरक्षण अधिकारी सखी वन स्टॉप सेंटरचे दिनेश पाटील यांनी सखी सेंटरची कार्यपद्धती स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.धाराशिव शिराळे व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील लेखापाल शीतल भंडारे यांनी केले. आभार प्रदर्शन क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत व शेख रफिक शेख जिलानी यांनी मानले. या दोन दिवशीय प्रशिक्षणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टोप सेंटर, चाईल्ड हेल्प लाईन 1098 मधील अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच कार्यालयाच्या कनिष्ठ लिपिक अमृता दुधारे, तालुका संरक्षण अधिकारी नितीश मकासरे, लेखापाल शितल भंडारे, समुपदेशक अंकुर पातोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, तथागत इंगळे, सुरज इंगळे यांचा सहभाग होता. ****

No comments: