04 September, 2025

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेत जाताना प्रकल्प तयार ठेवावा-सुजित झोडगे

हिंगोली, दि. 4 (जिमाका): दुग्ध व्यवसायातून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बँकेत कर्जासाठी अर्ज करताना नियोजित प्रकल्प तयार ठेवावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांनी यावेळी केले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे आयोजित दूध उत्पादक शेतकरी कर्जमेळाव्यात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. झोडगे यांनी शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन केले. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, बँक व्यवस्थापक शालिकराम जाधव, प्रदीप महाजन, श्रीपाद दैठणकर, राहुल बेंदोले, सहाय्यक आयुक्त (वसमत) डॉ. अजय मुस्तुरे, राजेसाब कल्यापुरे आणि पशुधन पर्यवेक्षक प्रवीण पंचलिंगे उपस्थित होते. उत्पादन वाढविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कर्ज मिळविण्यासाठी बँकेत अर्ज करताना त्यांचा नियोजित प्रकल्प सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे बँकेला कर्ज मंजुरी सोपी होते, तसेच शेतकऱ्याच्या कर्ज परतफेडीबाबत अधिक स्पष्टता येते, असेही श्री. झोडगे म्हणाले. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून दूध उत्पादन वाढविणे आणि दुग्ध व्यवसाय उद्योगाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश्य आहे. शासनाच्या मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन स्थानिक दुग्ध संकलन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमात शेतकऱ्यांना बँक कर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तसेच प्रकल्प लेखनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता स्वतः पुढाकार घेत आहेत. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना गायी, म्हशी किंवा शेळ्या खरेदीसाठी बँका कर्ज उपलब्ध करून देतात. मात्र शेतकऱ्यांनी प्रकल्प तयार ठेवणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे यांनी सांगितले. मेळाव्याला बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, शिरड शहापूर व चौंढी रेल्वे स्टेशन शाखा व्यवस्थापक, तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते. परिसरातील पांगरा शिंदे, लोहरा, वापटी, कुपटी आदी गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चेंडके यांनी केले तर संचालन प्रताप शिंदे यांनी केले. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सोपान मारकळ व साईनाथ शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. *****

No comments: