09 September, 2025

जलेश्वर तलावातील मत्स्यव्यवसायासाठी 18 सप्टेंबर रोजी लिलाव

हिंगोली (जिमाका), दि. 09 : हिंगोली तालुक्यातील सर्व्हे क्र. 3 मध्ये असलेल्या जलेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आवक झाला आहे. यापूर्वी महसूल उत्पन्न वाढ होण्याकामी जलेश्वर तलावात मत्स्य उत्पादनासाठी लिलावाद्वारे ठेक्याने देण्यात येत होता. यावर्षी देखील परंपरेनुसार पुढील 5 वर्षासाठी जलेश्वर तलाव जाहीर लिलावाद्वारे ठेक्याने देण्यात येणार आहे. या कामी ग्रामविकास विभागाच्या दि. 30 डिसेंबर, 2020 च्या परिपत्रकान्वये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.) हिंगोली यांच्या दि. 20 ऑगस्ट, 2025 च्या पत्रानुसार तहसील कार्यालयास ठेक्याची वार्षिक सरासरी रक्कम कळविली आहे. त्यानुसार सर्व्हे क्र. 03 जलक्षेत्र 13 हेक्टर जलेश्वर तलावाची मत्स्यव्यवसायासाठी माहे सप्टेंबर 2025 ते सप्टेंबर 2030 पर्यंत या 5 वर्षे कालावधीसाठी हिंगोली तहसील कार्यालयात दि. 18 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता लिलाव घेण्यात येणार आहे. या तलावासाठी ज्याची उच्चतम बोली जास्त असेल त्यास लिलाव अंतिम करण्यात येईल. या लिलावात केवळ नोंदणीकृत संस्थांनाच भाग घेता येईल. यासाठी दि. 15 सप्टेंबर पर्यत हिंगोली तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करता येईल. प्राप्त अर्जाची छाननी दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून प्रत्यक्ष लिलाव दि. 18 सप्टेंबर , 2025 रोजी हिंगोली तहसील कार्यालयात होणार आहे. या ठेक्याची आधारभूत किंमत 2 लाख 48 हजार 625 आहे. तर अनामत रक्कम 25 हजार रुपये असणार आहे. याबाबतच्या अटी व शर्ती तहसील कार्यालय हिंगोली व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय हिंगोली यांच्या कार्यालयात वाचनासाठी नोटीस बोर्डावर डकविण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *******

No comments: