15 September, 2025

गोवर व रुबेला लसीकरण अभियान यशस्वी करावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 15 : भविष्यातील पिढी तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्व आश्रमशाळा व मरदशांनी गोवर व रुबेला लसीकरण अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज गोवर व रुबेला विशेष लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी सतीश रुणवाल, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्यासह जिल्ह्यातील आश्रमशाळा व मदरशाचे प्रमुख, महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील मदरसा व आश्रमशाळेतील 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी दि. 15 ते 30 सप्टेंबर, 2025 या कालावधीत गोवर व रुबेला विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत आपण सर्वांनी 100 टक्के सहभाग घेऊन जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी याप्रसंगी केले. यावेळी डॉ. सय्यद मुजीब यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देताना म्हणाले, गोवर हा विषाणूमुळे होणारा साथीचा आजार आहे. बहुतेक मृत्यु हे गोवर संबंधित गंभीर गुंतागुंतीमुळे होतात. ज्यामध्ये अंधत्व, मेंदुज्वर, अतिसार, कान व श्वसन संक्रमण जसे की निमोनिया यासोबत रुबेला संसर्गाचे रुग्ण देखील आढळून येतात. ज्यामध्ये गरोदर मातांना परिणाम करुन बाळामध्ये सी. आर. एस. होण्याची शक्यता असते. सी.आर.एस. हे जन्मजात विकारांचे एक गुंतागुंतीचे घटक असून ते वेगवेगळ्या अवयव प्रणालीवर परिणाम करु शकते, ज्यामुळे गर्भपात तसेच बाळामध्ये अपंगत्व होऊ शकते. गोवर व रुबेला या दोन्ही आजारांवर विशिष्ट उपचार नसले तरीही गोवर रुबेला लसीमुळे या आजारांवर रोख लावली जाऊ शकते. या अनुषंगाने जिल्ह्यांतील आश्रमशाळा व मदरशांमध्ये गोवर व रुबेला प्रतिबंधात्मक विशेष लसीकरण मोहीम 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरशा(अनुदानित, विना अनुदानित) मधील 5 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांचे गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत प्रत्येक आश्रमशाळा व मदरसा येथे लसीकरण सत्र आयोजित केले जाणार आहेत. तेव्हा गोवर रूबेला लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद मुजीब, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा, धर्मगुरू अल्पसंख्याक हापीस सालार खान, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर. एम. भडके, गट शिक्षणाधिकारी सी. एम. टेकाम, एस. डी. मेथेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी आर. एम. धापसे, व्ही. आर. वाकडे, श्रीमती व्ही. आर राठोड, एस. डी. पावडे, विजय बोराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गजानन गजानन चव्हाण, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदिप काळे, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. इनायतुला खान व मनिषा वडकुते आदी उपस्थित होते. ******

No comments: