14 September, 2025

जिल्ह्यातील ४ दिवसांच्या अतिवृष्टी नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि.१४ (जिमाका): जिल्ह्यात गुरुवारपासून ४ दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवित व वित्तहानीचा जिल्हा प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल तयार केला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात गुरुवार (दि.११) पासून सतत पाऊस सुरू असून, गेल्या चार दिवसात कळमनुरी तालुक्यातील २ आणि वसमत तालुक्यातील ७ गावे बाधित झाली आहेत. वसमत तालुक्यातील गुंडा येथील श्रीमती सखुबाई विश्वनाथ भालेराव आणि श्रीमती गयाबाई अंबादास सारोळे या दोन महिला शेतक-यांचा शुक्रवार (दि.१२) रोजी पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. जिल्हा प्रशासन त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचले असून, नैसर्गिक आपत्तीअंतर्गत सानुग्रह अनुदानाची तात्काळ मदत मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. हिंगोली तालुक्यातील दुधाळ मोठे १, लहान ४, कळमनुरी तालुक्यात मोठे २, तर वसमत‌ तालुक्यात मोठे ३ आणि ६० मेंढ्या अशी एकूण मोठी ६ आणि लहान ६४ दुधाळ जनावरे पावसामुळे दगावली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. हिंगोली तालुक्यातील ३ आणि वसमतमधील एक असे एकूण ४ बैल दगावले आहेत. वसमत तालुक्यातील ५ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. तर या पावसामुळे जिरायती आणि बागायती शेती पिकांचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे पावसाने उघडीप दिल्यानंतर वेगाने करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. *_जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील पाणीसाठा स्थिती_* जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३० पैकी एका मंडळात अतिवृष्टी झाली असून, सरासरी २७.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील येलदरी धरण ९६.५६ टक्के भरले असून, त्यातून २७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सिद्धेश्वर धरणात ९७.१८ टक्के पाणीसाठा असून, ४९३५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे तर इसापूर धरणात ९८.८१ टक्के पाणीसाठा असून, २६४६४ क्युसेक्स पाण्याचा धरणातून विसर्ग सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. ****

No comments: