04 September, 2025
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
हिंगोली, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील कापूस पिकावर वाढत्या गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश कृषि विभागाला दिले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. कदम, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, तालुका कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
विषय विशेषज्ञ अजय सुगावे यांनी गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी लागवड करतेवेळी, लागवडीनंतर व हंगाम संपल्यानंतर या तिन्ही टप्प्यातील उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले. वेळेवर फेरोमोन ट्रॅपचा वापर, योग्यवेळी शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी, एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळणे तसेच शेतातील अवशेष नष्ट करणे यावर भर देण्यात आला.
याशिवाय पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व क्रॉपसॅप सल्ल्यानुसार उपाययोजना सुचविल्या. प्रादुर्भावग्रस्त व गळालेली पाने व बोंडे गोळा करून नष्ट करावीत. गुलाबी बोंडअळीमुळे डोमकळ्या दिसल्यास त्या तोडून अळ्या नष्ट कराव्यात. प्रति हेक्टर 4 ते 5 कामगंध सापळे तर नर पतंग पकडण्यासाठी 25 सापळे लावावेत. हेक्टरी 25 पक्षीथांबे उभारून पक्ष्यांद्वारे अळ्यांचे नियंत्रण करावे. ट्रायकोग्रॉमाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी किडीचे कार्ड पिकावर लावावेत. निंबोळी अर्क किंवा अँझाडीरॅक्टीन 5 टक्के वापरून फवारणी करावी. आर्थिक नुकसान पातळी गाठल्यानंतरच शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा. पायरेथ्रॉईड गटातील कीटकनाशकांची फवारणी नोव्हेंबरपूर्वी करू नये, अन्यथा पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित विभागांनी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, तसेच जनजागृती करावी, अशा सूचना दिल्या.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment