29 September, 2025
औंढा नागनाथच्या लोकसंचलित साधन केंद्राची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 29 : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय हिंगोली अंतर्गत औंढा नागनाथ लोकसंचलित साधन केंद्राची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 26 सप्टेंबर, 2025 रोजी औंढा नागनाथ येथील मारोती मंदिर सभागृहात उत्साहात पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी रेणुका ढगे या होत्या. तर उदघाटक म्हणून एचडीएफसीचे बँक व्यवस्थापक नागेश सरोदे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एसबीआय आरसेटीच्या प्रशिक्षिका संगीता मुळे, जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर, माविमचे लेखाधिकारी मुकुंद जहागीरदार, कन्सलटंट गजानन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत विविध उपप्रकल्पाची माहिती देऊन जास्तीत जास्त कुटुंबांना प्रकल्पात सामावून घेऊन सर्व बचत गटातील महिलांचे उपजिविकेचे प्रश्न सोडवावे, असे आवाहन केले. तसेच जास्तीत जास्त निधी औंढा नागनाथ तालुक्यासाठी खेचून आणून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचा मानस असून सर्व बचत गटांनी पुढाकार घेऊन स्वतःचे व्यवसाय आणि उत्पादित मालाला लेबलिंग आणि पॅकेजिंग करून मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम माविमने हाती घेतल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्यवस्थापक विलास पंडित यांनी मागील वर्षाच्या आर्थिक व भौतिक प्रगतीचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर चालू वर्षातील क्रेडीट प्लान, बिजनेस प्लान मंजुरीबाबत ठराव पारित केला. तसेच मागील वर्षाचे इतिवृत्त सभेपुढे वाचून कायम केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर संस्थेच्या अध्यक्षा रेणुकाताई ढगे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय संस्थेचे सचिव सुनिता नांगरे यांनी केले.
यावर्षी सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षी जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील उत्कृष्ट गट, व्यवसाय करणारे गट, व्यवसाय करणाऱ्या महिला, उत्कृष्ट ग्रामसंस्था, उत्कृष्ट सहयोगिनी, उत्कृष्ट सीआरपीचा मान्यवरांच्या हस्ते शाल, ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी केले.तसेच अध्यक्षीय समारोप सौ. रेणुका ढगे यांनी केले. तर आभार उपजीविका सल्लागार समाधान पाईकराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता चौरे, रेखा मुळे, अनिता गुंगे, मीरा तायडे, अनिता वायकोस, वंदना धवसे, सुनिता पुंडगे, पूजा कुरील, ललिता नरवाडे, वंदना धाबे, नसरीन शेख, शीतल मेश्राम यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व कार्यक्षेत्रातील एकूण 1 हजार 146 महिला सभासदांची उपस्थिती होती.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment