26 September, 2025

जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी नव उद्योजकांनी पुढे यावे -- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगवाढीसाठी नव उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत केले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात आज उद्योग विभागाच्या अडी-अडचणी एकाच छताखाली सोडविण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उद्योजक, व्यापारी संघटना यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. एमआयडीसीच्या बाजूला असलेल्या नाल्यातून पावसाचे पाणी येत आहे. त्या नाल्याचे रुंदीकरण करुन पावसाचे पाणी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच उद्योगाविषयी उद्योजकांच्या तक्रारी एक खिडकीद्वारे सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा नोडल अधिकारी यांच्याकडे आपले निवेदन सादर करावे, अशा सूचनाही दिल्या. या बैठकीस उद्योजक नितीन राठोर, प्रविण हेडा यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. नगर पालिका क्षेत्रातील विविध विकास कामाचा जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतीतील दलितवस्ती सुधार योजना, नगरोत्थान योजना, घरावर सोलार पॅनल बसविणे, प्रत्येक घरात 5 वृक्षाची लागवड करणे, शहराचा पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेतील बांधकामाची परवानगी सर्वांना एकदाच देऊन बांधकाम परवानगीचे प्रकरणे आठवडाभरात निकाली काढावेत, असे सांगून प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर निवास, पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावरील कामे याच्या सद्यस्थितीचा तसेच शहरातील स्वच्छतेचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी आढावा घेऊन सूचना केल्या. सर्व नगर पालिकांना देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे. काम न करणाऱ्या नगर पालिकेवर कार्यवाही करावी, अशा सूचनाही श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस नगरपालिका प्रशासनाचे प्रदीप जगताप, सर्व नगर पालिका, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले सोलार पंपाची दसऱ्यापूर्वी दुरुस्ती करावी-जिल्हाधिकारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या सोलार पंपाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज घेतला. या नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरुस्त झालेले सोलार पंप, पॅनल व इतर अनुषंगीक दुरुस्ती सोलार पंप पुरवठादारांनी दसऱ्यापूर्वी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आयोजित बैठकीत दिल्या. या बैठकीस महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश चव्हाण, महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत गायकवाड यांच्यासह पुरवठादाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. *****

No comments: