17 May, 2020

हिंगोलीत 8 नवीन कोरोना बाधीत रुग्ण


·   जिल्ह्यात एकुण 15 कोरोना बाधीत रुग्ण

हिंगोली, दि.17: मुंबई येथून वसमत तालूक्यात परतलेल्या 08 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे आज प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या सर्व बाधीत रुग्णांना वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 99 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असून त्यातील 84 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 कोरोना बाधीत रुग्ण असून या सर्व रुग्णांवर तज्‍ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****

15 May, 2020

दिलासा : कोरोनामुक्त 33 रुग्णांना डिस्चार्ज


·   आजपर्यंत एकूण 81 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आलेल्याना दिला डिस्चार्ज.
·   बाधीत 10 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर.

हिंगोली,दि.15: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयतील आयसोलेशन वार्डमधून राज्य राखीव बलाचे 32 जवान तर जिल्हा सामान्य रुग्णालयामधील 01 अधिपरीचारीका कोरोनामुक्त झाल्याने आज एकूण 33 रुग्णांना डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. तसेच आज रोजीपर्यंत जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 10 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****





आज ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’


राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी करण्याचे आवाहन

हिंगोली,दि.15: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 16 मे (आज) हा दिवस राज्यात सर्वत्र ‘राष्ट्रीय डेंग्यु दिन’ म्हणुन साजरा करण्यात येणार आहे. डेंग्यु ताप हा विशिष्ट विषाणूमूळे होतो. डेंग्युचा प्रसार हा एजिप्टाय नावाच्या डासामूळे होतो. सदर डासाची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवू नये, याची सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सद्यस्थितीत उन्हाळा सुरु असून राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पुरेश्या प्रमाणात पाणी पुरवठा न झाल्याने नागरिक पाणी साठवून ठेवतात. अशा साठलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डास उत्पत्ती होते. सदर डासाची उत्पत्ती कमी करणे / नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असून लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही.
राष्ट्रीय डेंग्यू दिन दि. 16 मे रोजी डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होवून प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
केंद्र शासनाने डेंग्यु संबंधी मोबाईल ॲप्लीकेशन तयार केले असून ॲन्ड्राईड मोबाईलवर प्ले-स्टोर मध्ये जावून ‘India Fights Dengu’ हे ॲप शोधून मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतल्यास डेंग्यु विषयी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
कोवीड-19 सोबत गृह भेटीद्वारे जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, डास उत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम व एक दिवस कोरडा पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती  निर्माण करण्यात येणार आहे. ‘राष्ट्रीय डेंग्यु दिन’ यशस्वी होण्यासाठी आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, यांनी ‘राष्ट्रीय डेंग्यु दिन’ साजरा करण्यात बाबतचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****



आपत्तीच्या कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे - अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार



हिंगोली,दि.15: आगामी मान्सुन ऋतूत आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित मान्सून-2020 पुर्वतयारी आढावा बैठकीत श्री. मिणियार हे बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. मिणियार म्हणाले की, सद्यपरिस्थितीत आज आपण कोरोना सारख्या आपत्तीचा सामाना करत आहे. परंतू येणाऱ्या मान्सुनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा देखील आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांना पूर्वनियोजन करावे लागणार आहे. याकरीता उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. तसेच याठिकाणी अन्सरींग मशीन ठेवून येणाऱ्या सर्व कॉलची नोंद ठेवावी. या आराखड्यात जिल्ह्यातील 72 पुरप्रवण गावांचा समावेश करावा. तसेच प्रत्येक गावातील तीन जबाबदार नागरिकांचे नेहमी सुरु असणारे संपर्क क्रमांकांची यादी तयारी ठेवावी. जिल्ह्यात सर्व मंडळातील पर्जन्यमापक यंत्र कार्यरत असून ते सुस्थितीत असेल याची खात्री करुन आवश्यक असल्यास पर्जन्यमापक यंत्र त्वरीत खरेदी करावेत. नागरी व ग्रामीण भागातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घ्यावेत. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहीत नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करावेत.
यावेळी उपजिल्हाधिकारी चंदक्रांत सूर्यवंशी म्हणाले की, वसमत आणि कळमनुरी तालूक्यात काही दिवसापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहे. सदर भूकंपाचे धक्के हे सौम्य असले तरी वारंवार जाणवत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत आहे. याकरीता पूर्वनियोजन करणे आवश्यक असून, संबंधीत यंत्रणांनी या परिसरातील घरांची तपासणी करुन देखभाल दूरुस्तीची गरज असल्यास संबंधीतास ते करण्यास सांगावे. अथवा घर कमकुवत असल्यास त्यास घर बदलण्याच्या सूचना देण्यात याव्या. तसेच ज्या घरांच्या पत्रावर दगड ठेवले असतील तर ते संबंधीतास तात्काळ काढून घेण्यास सांगून पत्रे बांधून घेण्यास सांगणे. तसेच या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचित करावे.
तसेच पाठबंधारे विभागाने जिल्ह्यातील ' नद्या आणि पाणी साठे, मध्यम आणि लघु प्रकल्प तसेच सर्व जल संस्थाचे सर्वेक्षण करुन आवश्यक ती देखभाल दूरुस्ती करुन घ्यावी. तसेच जिल्ह्यातील ज्या जल संस्था आहेत त्या कोणत्या यंत्रणेच्या अधिपत्याखाली आहेत, तसेच त्याचे नियंत्रण अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची सविस्तर माहिती आठ दिवसात सादर करावी. तसेच गावांना नदी पाणी पातळीचा धोका होवू नये याबाबत उपाययोजना करत इशारा पातळीबाबतची माहिती दैनंदिनरित्या सादर करण्याच्या सूचना श्री. सूयवंशी यांनी दिल्या.
महावितरणने जिल्ह्यातील सर्व रोहित्रांची व लोंगकळणाऱ्या तारांची तपासणी करुन त्याची देखभाल दूरुस्ती करुन घ्यावी. तसेच यामुळे अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज पुरवठ्याचे नियोजन कसे करणार याची माहिती सादर करावी.
            आरोग्य विभागानेही नियंत्रण कक्ष स्थापन करुन आपत्ती व्यवस्थापन करिता समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करावा. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना वेळीच थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग पावडरची साठवणूक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग व्यवस्थापन कृती आराखडा अद्ययावत करावा. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या  आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचनाही श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.
            नगरपालीका प्रशासनास सूचना देतांना श्री. सुर्यवंशी म्हणाले की, नगरपालिका प्रशासनानेही नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करुन, अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवून आपत्ती व्यवस्थापनकरीता समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच शहरातील नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. शहरातील वस्तीमध्ये पाणी शिरणार नाही याकरीता योग्य ते नियोजन करुन शहरातील नाल्याची दुरुस्ती करावी जेणेकरुन शहरामध्ये पाणी तुंबणार नाही व पाण्याचा विसर्ग होण्यास मदत होईल.
            सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या काढून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वृक्ष उन्मळून पडल्यास ते तात्काळ हटविण्याची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व शाळांचे सर्वेक्षण करुन त्यांची देखभाल दूरुस्ती वेळेतच करुन घ्यावी. तसेच  रेल्वे प्रशासन, राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाटबंधारे विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, भारत संचार निगम लिमिटेड, राज्य राखीव पोलीस दल क्र. 12, गृहरक्षक दल, पंचायत समिती या बरोबरच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत असणाऱ्या सर्व विभागांनाही आप-आपल्या यंत्रणांची पूर्वतयारी करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी दिल्या. तसेच आपत्ती व्यवस्थापाना संबंधीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून दुरध्वनी क्रमांक 02456-222 560 वर संपर्क साधण्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी बैठकीस उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी तहसीलदार गजानन शिंदे, जीवककुमार कांबळे, पांडुरंग माचेवाड, उप विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उप मुख्याधिकारी नितीन दाताळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, हिंगोली नपचे मुख्याधिकारी रामदास पाटील, सेनगाव नपचे शैलेश फडसे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांची उपस्थिती होती.
****



14 May, 2020

निगेटिव्ह अहवाल आलेल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज


·   आजपर्यंत एकूण 48 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आलेल्याना दिला डिस्चार्ज.
·   बाधीत 43 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर.

हिंगोली,दि.14: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयतील आयसोलेशन वार्डमधून राज्य राखीव बलाच्या 02 जवानांचा  अहवाल निगेटिव्ह आल्याने आज एकूण 02 रुग्णांना डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. तसेच आज रोजीपर्यंत जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 43 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय पथकाने घेतला जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा



हिंगोली,दि.14: कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, तसेच प्रतिबंधीत क्षेत्रात लॉकडाउनच्या कालावधीत प्रतिबंधीत आदेशाची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरीता आज उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर, उप आयुक्त पराग सोमण यांनी साई रिसॉर्ट आणि राज्य राखीव पोलीस दल येथे क्वॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आलेले जवान तसेच जिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या जवानांची भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारणा करुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच हिंगोली येथील मुलांच्या वसतीगृहात तयार करण्यात आलेल्या कोवीड रुग्णालय आणि औंढा येथील कोवीड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करुन काही त्रूटींची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी केलेल्या  पूर्वनियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण यांनी जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत विविध बाबींचा आढावा घेवून सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. नागरिकांनी घरामध्ये राहूनच सुरक्षितता बाळगावी, सार्वजनीक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी करण्यात येत आहे. बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्यात कामासाठी स्थलांरीत मजूर व कामगार हे आता जमेल त्या पध्दतीने आप-आपल्या गावाकडे परत येत आहेत. परत येणाऱ्या सर्व नागरिकांची जिल्ह्याच्या सिमेवर तयार करण्यात आलेल्या तपासणी नाक्यावर सतर्क राहून तपासणी करावी. या नागरिकांना कुठल्याही आजरासंदर्भात शंका वाटल्यास त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करावेत. तसेच जिल्ह्यात परत येणाऱ्या प्रत्येक मजूर व कामगारापासून कोरोनाचा प्रार्दूभाव होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घेणे आवश्यक आहे. तपासणी नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचाऱ्याची नाक्यावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच याठिकाणी तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि तालूका आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी देवून योग्यरित्या तपासणी होत असल्याची खात्री करावी. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची योग्यरित्या तपासणी न झाल्यास त्यांच्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दूभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता जिल्ह्याच्या सिमेवरील सर्व तपासणी नाक्यावर नागरिकांची तपासणी योग्यरितेने होणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेर जिल्ह्यातील किंवा राज्यातील ज्या नागरिकांना आपल्या गावी जायचे असल्यास त्यांना सहकार्य करा. तसेच इतर आजाराच्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी खाजगी रुग्णालये सुरु करण्याचा प्रयत्न करावा. तसेच विशेष करुन गर्भवती महिलांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळेल याकरीता विशेष नियोजन करा.  
जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्यास किराणा आणि भाजीपाला विक्रेत्यांची बैठक घेवून त्यांना नियमाचे पालन करण्याबाबत निर्देश द्यावे. तसेच नियमाचे पालन होत असल्याचे प्रत्यक्ष जावून तपासणी करण्याच्या सूचना उप आयुक्त वर्षा ठाकूर आणि उप आयुक्त पराग सोमण यांनी आज दिल्या.
यावेळी विभागीय पथकाने कोरोना विषयक उपाययोजनांची पाहणी करुन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा आणि पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांची भेट घेूवन चर्चा केली. तसेच करण्यात आलेल्या उपाययोजना बाबत ज्या काही आवश्यक सुधारणा करावयाच्या आहेत. त्याबाबत संबंधीत विभागांना सूचना देवून त्याची पूर्तता करुन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत यावेळी उप आयुक्त वर्षा ठाकूर, उप आयुक्त पराग सोमण, प्रभारी विकास उप आयुक्त वीणा सुपेकर, विभागीय आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, उप मुख्याधिकारी धन्वंतकुमार माळी, उप मुख्याधिकारी नितीन दाताळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जायभाय, हिंगोली नपचे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि सेनगाव नपचे शैलेश फडसे यांची उपस्थिती होती. 
****


13 May, 2020

निगेटिव्ह अहवाल आलेल्या आठ रुग्णांना डिस्चार्ज


 ·   आजपर्यंत एकूण 46 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आलेल्याना दिला डिस्चार्ज.
·   बाधीत 45 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर.

हिंगोली,दि.13: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयतील आयसोलेशन वार्डमधून राज्य राखीव बलाचे 07 जवान तर सेनगाव येथील 01 रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज एकूण 08 रुग्णांना डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. तसेच आज रोजीपर्यंत जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 45 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
****