05 November, 2020

निवडणूक कालवधीत ध्वनीक्षेपकांच्या वापरास निर्बंध

 


 हिंगोली, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणुक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हिंतचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजात प्रचार केल्यास ध्वनीप्रदुषण होणे, सर्व सामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशिरा रात्रीपर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याने जिल्‍हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पुढीलप्रमाणे निर्बंध घालण्यात येत आहेत.

यात ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानीशिवाय करता येणार नाही, सकाळी 9.00 वाजण्यापूर्वी आणि रात्री 9.00 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधीत निवडणुक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.

हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: