05 November, 2020

मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन आस्थापना, उद्योग, व्यापार सुरु करण्यास परवानगी.

 

        हिंगोली,दि. 05 : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मिशन बिगीन आगेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी दि. 31 नोव्हेंबर, 2020 चे मध्यरात्री पर्यंत वाढविण्यात आला असून या  आदेशात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आस्थापना, उद्योग, व्यापार सुरु करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आस्थापना, उद्योग, व्यापार सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील प्रतिबंधीत व प्रतिबंध मुक्त करावयाचे सुधारित आदेश अटीसह निर्गमित केले आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्र :

शाळा, महाविद्यालये,शैक्षणीक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस (खाजगी शिकवणी वर्ग)ई. बंद राहतील.ऑनलाईन शिकवणी साठी परवानगी राहील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा विषयक, करमणूक विषयक, शैक्षणीक, सांस्कृतिक, धार्मिक व मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन साजरे होणारे कार्यक्रम घेण्यावर बंदी राहील. परंतु विवाह विषयक कार्यक्रम मोकळी मैदाने, लॉन्स व वातानुकुलीत नसलेल्या हॉल मध्ये सामाजिक अंतर, मास्क या बाबीचे पालन करुन जास्तीत जास्त 50 लोकांचे मर्यादे पर्यंत साजरे करण्यास परवानगी राहील, वेगळ्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांचे मर्यादेपर्यंत हजर राहण्याची परवानगी राहील. परंतु सामाजिक अंतर राखणे तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे सर्व नागरिकांसाठी व धार्मिक कार्यक्रमासाठी बंद राहतील.

प्रतिबंध मुक्त क्षेत्र :

            सर्व खाजगी व सार्वजनिक वाहतूक करताना दोनचाकी वाहन 1+1 व्यक्तींसाठी (हेल्मेट सह), तीन चाकी वाहन 1+2 व्यक्तीसाठी व चारचाकी वाहन 1+3 व्यक्तींसाठी वापर करता येतील. प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.   65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले तसेच ज्यांना अनेक दिवसापासून गंभीर आजार आहेत जसे कि मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे विकार, अस्थमा, अर्धांगवायू इत्यादी गंभीर स्वरूपाचे आजार असणारे रुग्ण हे अत्यावश्यक व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.   अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कारणासाठी सामाजिक अंतराचे पालन करून,मास्कचा वापर करून,वयक्तिक स्वच्छता तसेच शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाचे पालन करून हालचाली, कार्य, प्रवास करण्यासाठी मुभा राहील. बाह्य व्यायाम प्रकारातील हालचालीसाठी बंधने राहणार नाही. व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगीराहील परंतु भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून स्वतंत्रपणे प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार कार्यप्रणालीचा अवलंब करणे संबंधितांना बंधनकारक असेल.

जलतरण तलाव हे दि. 05 नोव्हेंबर, 2020 पासून फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सराव करण्याकरिता शासनाच्या क्रिडा व युवक कल्याण विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा अवलंब करून चालू करण्यास मुभा राहील. परंतु प्रतिबंधीत क्षेत्र लागू असणाऱ्या भागातील जलतरण तलाव चालू करण्यास परवानगी राहणार नाही. योगा शिकवणी वर्ग  हे दि. 05 नोव्हेंबर, 2020  पासून शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा अवलंब करून चालू करण्यास मुभा राहील. परंतु प्रतिबंधीत क्षेत्र लागू असणाऱ्या भागातील योगा शिकवणी वर्ग चालू करण्यास परवानगी राहणार नाही. सर्व इनडोअर स्पोर्ट्स जसे  कि बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शुटींग रेंजेस. इत्यादी इनडोअर खेळ प्रकार सामाजिक अंतर व सॅनिटायझेशन इत्यादीचा अवलंब करून दि. 05 नोव्हेंबर, 2020 पासून सुरु करण्यास मुभा राहील. सिनेमा गृह, नाट्यगृह, थेटर व मल्टीप्लेक्स दि.05 नोव्हेंबर, 2020 पासून 50 टक्के आसन क्षमतेच्या मर्यादेत शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या सूचनांचा अवलंब करून चालू करण्यास मुभा राहील. परंतु सदर ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीसाठी परवानगी राहणार नाही. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र लागू असणाऱ्या भागातील सिनेमा गृह, नाट्यगृह, थेटर व मल्टीप्लेक्स चालू करण्यास परवानगी राहणार नाही. या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याची व सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधीत मालक,चालक यांची राहील.

लॉजेस पूर्णपणे सुरु करण्यास शासनाकडून स्वतंत्रपणे प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार चालू करण्यास मुभा राहील. हॉटेल्सआणिबार केवळ 50 टक्के क्षमतेनुसार सुरु करण्यास परवानगी राहील. परंतु पर्यटन विभागाकडून स्वतंत्रपणे प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार कार्यप्रणालीचा अवलंब करणे संबंधितांना बंधनकारक असेल. जिल्ह्याबाहेर प्रवास करणासाठी तसेच मालवाहतूक करण्यासाठी नागरिकांना यापुढे बंधन राहणार नाही. तसेच प्रवास करण्यासाठी वेगळ्याने परवानगी, मान्यता, ई-पासची आवश्यकता राहणार नाही. खाजगी बस,मिनी बस व इतर वाहनाने प्रवास करण्यासाठी परवानगी राहील. परंतु परिवहन आयुक्त महाराष्ट्र शासन यांनी ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब करणे वाहनधारकाला बंधनकारक राहील.

प्रतिबंधीत क्षेत्रामधील गावे व भाग व वरील प्रतिबंधीत वगळून जिल्हा अंतर्गत सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय, आस्थापना दररोज सकाळी 09.00 ते रात्री 09.00 या वेळेत खालील अटीच्या अधीन राहून सुरु ठेवता येतील. परंतु शासनाकडून यापूर्वी वेळोवेळी निर्गमित झालेल्या व होणाऱ्या प्रमाणित कार्यप्रणाली (SOP)मधील निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील.

दुकानातील मालक, कर्मचारी, ग्राहक व इत्यादी यांच्या चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवास करते वेळेस सामाजिक अंतराचे पालन करुन मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी, दुकानाच्या व आस्थापनाच्या परिसरात व इतर ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणे तसेच दुकानाच्या परिसरात सामाजिक अंतर राहणे बंधन कारक असेल. तसेच एकावेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. व दुकानाबाहेर एक मीटर अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी गोल, चौकोन आखून द्यावे. आवश्यकतेनुसार टोकन तसेच घरपोच सुविधा उपलब्ध करून द्यावी. सर्व व्यावसायिक, विक्रेते यांनी आपले दुकान,आस्थापना येथे थर्मल गन व पल्स ऑक्सीमीटर ठेवणे बंधनकारक असेल. त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची थर्मल गन व पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करून नोंद घेणे बंधनकारक असेल. नागरिकांनी खरेदीसाठी शेजारच्या,जवळच्या बाजारपेठेचा वापर करावा व शक्य असल्यास पायी अथवा सायकलचा वापर करावा. तसेच अत्यावश्यक नसलेल्या वस्तू, लांबच्या अंतरावर जाऊन खरेदी करण्यास बंदी असेल.  खरेदीसाठी जाताना दुचाकी,चारचाकी वाहनाचा वापर प्रतिबंधीत असेल. सार्वजनिक ठिकाणी तसेच दुकानच्या परिसरात मद्यपान, तंबाकू, गुटखा, पान इत्यादीचे सेवनास प्रतिबंध असेल. कामाच्या ठिकाणी, दुकानात प्रवेशापूर्वी हॅण्डवाश,सॅनिटायझर्सचा वापर करणे दुकानातील मालक, कर्मचारी, ग्राहक व इत्यादीना बंधनकारक असेल. दुकान,आस्थापना व उद्योग इत्यादी ठिकाणी मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू, ठिकाणाचे वेळोवेळी नियमित निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. ग्राहकाकडून खरेदी नंतर पैशाची देवाण घेवाण आरबीआयच्या सुचनेनुसार ई-वॅलेट्स व स्वाईप मशीन द्वारे करण्यास भर द्यावा. वरील सर्व दुकाने, आस्थापना, उद्योग याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ असे दुकाने, आस्थापना, उद्योग बंद करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

यानुसार या आदेशाची आवज्ञा करणाऱ्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

****

No comments: