05 November, 2020

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यास प्रतिबंध

 


 हिंगोली, दि. 5 : भारत निवडणूक आयोगाने दि. 2 नोव्हेंबर, 2020 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित केल्‍याच्‍या दिनांकापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते , हितचिंतक यांच्यामार्फत निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर लावण्यात येणारे पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे इत्यादी बाबीसाठी बंधन घालणे आवश्यक असल्याने जिल्‍हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता1973 चे कलम 144 अन्‍वये त्यांना प्रदान करण्‍यात आलेल्‍या शक्‍तीचा वापर करुन प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

फिरत्या वाहनावर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या  टपापासून दोन फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकांच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनावर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.

हे आदेश दि. 7 डिसेंबर, 2020 रोजीच्या 23.00 वाजेपर्यंत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लागू राहतील, असे जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: