09 April, 2021

प्रशासनाने योग्य नियोजन करुन कोरोनाची रुग्ण संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड

 


हिंगोली,(जिमाका)दि.09: मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असुन मृत्यू पण जास्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत रुग्ण संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी दिल्या.

       आज झुम ॲपद्वारे हिंगोलीचे पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या झुम बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.  

यावेळी बोलताना पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जात आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावे व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. खाजगी रुग्णांलयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरज असल्यासच रेमडिसिवीर द्यावी. बसस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजन तपासणी करावी. तसेच गंभीर स्वरुपाचे लक्षणे आढळल्यास RTPCR तपासणी करावी.

 तसेच जिल्ह्यात रेमडिसिवीर इंजेक्शन जास्त दरांने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याकरीता या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती जिल्ह्यात उपलब्ध असुन त्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. लसीकरणांसाठी आरोग्य विभागाने लसीची मागणी करुन मुबलक साठा ठेवून लसीकरण करावे. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण करण्यात येत असुन ग्रामीण भागातून यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. याकरिता ग्रामीण भागात लसीकरणांबाबत जनजागृती करुन जनतेला लसीकरण करुन घेण्याबाबत प्रोत्साहित करावे अशा ही सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. तसेच तपासणीचे प्रमाण, कोविड सेंटर, ऑक्सिजन पुरवठा, लसीकरणाची आणि जिल्ह्यात राबविण्यात उपक्रमांची व सुविधांची माहिती घेऊन जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले .

             यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी जिल्ह्यात मागील पूर्ण वर्षभरात 4 हजार पाझिटीव्ह रुग्ण आढळून होते. परंतु टेस्टींगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दि. 1 फेब्रुवारी ते 8 एप्रिल, 2021 पर्यंतच्या कालावधीत 4 हजार 240 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आढळून आली असून रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती दिली. रुग्णामंध्ये वाढ होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहेत. तसेच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध आहेत. कोविडचे सर्व केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तसेच खाजगी दोन डीसीएचसी व दोन सीसीसी सेंटर सुरु करण्यात आले आहेत. आक्सिजनचा साठा मुबलक आहे. आयसीयूमध्ये दाखल रुग्णांनाच रेमडिसिवीर इंजेक्शनचा वापर करायचा असताना इतर रुग्णांनाही रेमडिसिवीरचे इंजेक्शन देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या असून रेमडिसिवीर इंजेक्शनचा विनाकारण वापर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे सांगितले .

            रुग्णांची तपासणीसाठी नवीन आरटीपीसीआर मशीन मागविली आहे. ही मशीन उपलब्ध झाल्यावर आरटीपीसीआरचे टेस्ट वाढणार आहेत.

            तसेच जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी 58 हजार 920 व्हॅक्सीन उपलब्ध झाले होते. त्यापैकी 47 हजार 515 लसीकरण करण्यात आले असून शिल्लक असेलेले व्हॅक्सीन दोन दिवस पुरेल, असे सांगितले. सध्या दररोज दीड ते दोन हजार व्हॅक्सीन  देण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील वसमत व कमळनुरी मध्ये कोरोनाबाधिताचे प्रमाण जास्त आहे. जी गावे जास्त प्रभावित आहेत ती गावे कंटोन्मेंट झोन घोषित करुन त्या गावातील संपूर्ण नागरिकांचे तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावेळी दिली.   

****

No comments: