30 November, 2024

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हिंगोली (जिमाका),दि.३० : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 2 ते 9 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. सोमवारी सकाळी 8:45 वाजता जिल्हा रुग्णालय हिंगोली येथून निघणाऱ्या प्रभात फेरीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे. या प्रभातफेरीमध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक, युवती, एनएसएस, एनसीसी, रेड रिबन क्लब, लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता एचआयव्ही संसर्गित मुले व मुलींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे करण्यात आले आहे. यामध्ये 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना व मुलींना सहभागी होता येईल, यासाठी रुपये दीड हजार, एक हजार व पाचशे असे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक आहे. तसेच महाविद्यालयीन युवक, युवती व सर्वसामान्य नागरिकांसाठी सोशल मीडिया स्टॅटिक पोस्ट मेकिंग स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत. 1) मातेपासून बाळाला होणाऱ्या एचआयव्ही एड्सपासून संरक्षण, 2) एचआयव्ही एड्स संक्रमणाचे मार्ग व प्रतिबंधक उपाय. 3) एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017. 4) एचआयव्ही एड्स जनजागृती टोल फ्री क्रमांक 1097 यापैकी कोणत्याही विषयावर स्पर्धेमध्ये सहभागींना सोशल मीडियावर पोस्ट करून ती dpohingoli@mahasacs.org या मेलवर किंवा 9420464455 या क्रमांकावर दिनांक 5 डिसेंबर 2024 पर्यंत पाठवता येईल. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यास रुपये दीड हजार, एक हजार व पाचशे याप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण आठवडाभर तालुकास्तरावर सुद्धा प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही एड्सविषयी व्याख्यान, तपासणी शिबीर, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रक्तदान शिबिरे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच एनजीओमार्फत देहविक्री करणाऱ्या महिलांकरिता आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, इत्यादी गर्दीच्या ठिकाणी माहिती शिक्षण व प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे उपक्रम या आठवड्यात राबवण्यात येणार आहेत. सदरील उपक्रमामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवक युवती व सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी केलेले आहे. *******

स्वाधारचे अर्ज ऑनलाईन पोर्टलवर भरणे बंधनकारक * नूतनीकरणासाठी 16 डिसेंबरपर्यंत मुदत

हिंगोली (जिमाका), दि. ३० : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज www.hmas.mahait.org या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्सिस्टींग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा ऑप्शन निवड करावा व इयत्ता 11 वी, प्रथम वर्षासाठी नवीन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस ऑप्शन निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार येाजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधारचा लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्र अपलोड करावीत. गतवर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाजकल्याण कार्यालयात भरलेले विद्यार्थी 2024-25 या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात. त्यासाठी पोर्टलवर एक्सिस्टींग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज दिनांक 16 डिसेंबर, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करून सदर ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली कार्यालयात जमा करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

29 November, 2024

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त कळमनुरी तालुक्यात जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 29 : महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा केला जातो. या दत्तक महिना निमित्ताने कळमनुरी, आखाडा बाळापूर येथील पोलीस स्टेशन, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थितांना दत्तक इच्छुक पालकास कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दत्तक इच्छुक पालक Cara Central Adoption Resource Authority यांचे संकेतस्थळ www.cara.wcd.gov.in यावर रजिस्ट्रेशन करुन कायदेशिररित्या बालकास दत्तक घेऊ शकतात. तसेच Foster Care And Foster Care Adoption या बाबत प्रतिपालकत्व स्वीकारु इच्छिणाऱ्या पालकांसाठी बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांचे प्रतिपालकत्व स्वीकारणे तसेच जिल्ह्यात विधवा माता, कुमारी माता यांना नको असलेल्या नवजात बाळाचे सुखरुप समर्पण करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अनाथ, सोडून दिलेले, परित्याग केलेले बाळ इत्यादी बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली किंवा चाईल्ड हेल्प लाईन (1098) यांना संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. यावेळी महिला व बालविकास विभागाने तयार केलेले पोस्टर्स, जाहीर आवाहन संपर्क क्रमांकासह, भिती पत्रके लावण्यात आली. याप्रसंगी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे उपस्थित होते. *****

चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या माध्यमातून जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 29 : निराधार, अनाथ असल्यामुळे शिक्षणापासून वंचित असणा-या बालकांचे पुनर्वसन, त्यांना मदत करणे, त्यांना हक्काचा निवारा देण्यासाठी आणि त्यांचे बालपण जपण्यासाठी धडपणारी यंत्रणा म्हणजे चाईल्ड हेल्प लाईन आहे. जिल्ह्यात विविध भागात चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या माध्यमातून शाळा, वस्त्या वाडे, जनजागृती कार्यक्रम घेतले जातात, आपल्या आजूबाजूला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, पीडित, हरवलेली बालके, सोडून दिलेली बालके, बालविवाह संकट ग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना मदत करण्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले आहे. संकटग्रस्त बालकांना त्वरीत मदतीकरिता भारत सरकार महिला व बाल विकास नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत व संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही सेवा जिल्ह्यात कार्यरत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली. चाईल्ड हेल्प लाईन 1098 संकटग्रस्त बालकांना 24x7 हेल्प लाईन सेवा उपलब्ध आहे. 1098 वर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय असते. त्यामुळे एखाद्या संकटग्रस्त बालकास मदत करण्यासाठी संपर्क करावा. चाईल्ड हेल्प लाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, धम्मप्रिया पखाले, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, तथागत इंगळे यांनी जिल्ह्यात काळजी व संरक्षणाची गरज, संकटग्रस्त बालकांची तात्काळ मदत करण्यासाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध समस्या असणाऱ्या बालभिक्षेकरी, लैंगिक शोषणाला बळी पडलेली बालके, हरवलेली बालके, शैक्षणिक अडचणी असलेली बालके, वैद्यकीय अडचणी असलेली बालके, बालविवाह, भावनिक आधार, शारीरिक मानसिक त्रास असलेली, करियर मार्गदर्शन, एक पालक किंवा अनाथ बालकाच्या अधिकाराचे हनन होत असल्यास त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम हे चाईल्ड हेल्प लाईन हे 1098 च्या माध्यमातून केले जाते. त्यामध्ये बालकाप्रती काम करणाऱ्या यंत्रणा, विविध सण, उत्सव, समारंभ विविध धार्मिक स्थळ यांच्यासोबत समन्वय साधून रात्रंदिवस 24x7 जनजागृती व आउटरीचच्या माध्यमातून बालकांचे पुनर्वसन केले जात आहे, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे. *****

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 5 डिसेंबर रोजी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.शिवाजीराव देशमुख सभागृह, नगर परिषद, हिंगोली येथे दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देणे व त्यांना एक खुले व्यासपीठ करण्याच्या हेतूने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे, युवकांना विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणे, शिक्षण, उद्योग-व्यवसाय यासोबतच शेती या व्यवसायाशी युवकांची ओळख करुन देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्व युवकांना पटवून देणे, हा युवा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. युवा महोत्सवात खालील कला प्रकारांचा समावेश असणार आहे. 1) संकल्पना आधारीत स्पर्धा : विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना आधारित विज्ञान प्रदर्शन (सहभाग संख्या 5), 2) सांस्कृतिक कला प्रकार : समूह लोकनृत्य (सहभाग संख्या 10), लोकगीत (सहभाग संख्या 10), 3) कौशल्य विकास : कथा लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा. 4) युथ आयकॉन : जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित करणारे कार्य केलेले 15 ते 29 वयोगटातील 5 युवक. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील युवक व युवती सहभाग घेऊ शकतात. त्यांचे वय 12 जानेवारी 2025 या दिनांकापर्यंत परिगणना करण्यात येईल. यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, संगीत अकादमी, महिला मंडळ, महिला बचत गट, युवकांसाठी कार्य करणाऱ्या स्वंयसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) इत्यादी संस्थेतील युवक व युवती यांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. युवा महोत्सवामध्ये प्रत्येक कला प्रकारासाठी विजयी स्पर्धकांना आकर्षक रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर विजयी युवक-युवती स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटात असलेल्या 40 युवकांची नावे विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच विभागस्तरावरून 40 युवकांची नावे राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार असून राज्यस्तरावरून एकूण 40 युवकांना राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येणाऱ्या संघामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये युवांच्या भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेऊन युवांना राष्ट्र निर्माणामध्ये सहभागी करून, त्यांची दूरदृष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग अंतर्गत खालील संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत. टेक फॉर विकसित भारत, विकास भी विरासत भी, एम्पॉवरिंग युथ फॉर विकसित भारत, मेकिंग इंडिया फॉर विश्वगुरु, मेकिंग इंडिया दि स्टार्टअप कॅपिटल ऑफ दि वर्ल्ड, फिट इंडिया ए मीन्स टू विकसित भारत, मेकिंग इंडिया दि ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग पॉवरहाऊस, मेकिंग इंडिया एनर्जी एफिशियंट, बिल्डींग दि इन्फ्रास्ट्रक्चर फॉर दि फ्युचर, एम्पॉवरिंग वुमेन अँड इम्प्रुव्हिंग सोशल इंडिकेटर्स, यामध्ये सहभागासाठी खालील प्रमाणे टप्पे निश्चित केलेले आहेत. प्रथम टप्पा : विकसित भारत प्रश्नमंजुषेमध्ये वैयक्तिकरित्या युवांना सहभागी होता येईल. यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा ही सामान्यज्ञान व भारताची कामगिरी या बाबींवर होणार आहे. ‘माय भारत’ पोर्टलवर शैक्षणिक संस्था व कॉलेज यांनी सहभाग नोंदवावा. ही स्पर्धा 5 डिसेंबर 2024 पर्यंत होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवांनी सहभाग घ्यावा. यामध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. द्वितीय टप्पा : विकसित भारत यावर निबंध लेखन स्पर्धा घेतली जाईल यामध्ये १ हजार शब्द मर्यादा राहील. प्रथम टप्यात सहभागी होवून निवड झालेल्या युवांचा यामध्ये सहभाग राहील. वर नमूद केलेल्या विषयावर निबंध लेखन करता येईल. यामधील सहभागासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल. निबंध स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने 8 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे. तृतीय टप्पा : विकसित भारत पीपीटी चॅलेंजवर नमूद केलेल्या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातून 4 युवांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरून यासाठी राज्याचा संघ निवड करण्यात येणार आहे. निबंध माय भारत पोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत. चतुर्थ टप्पा : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना प्रथम 11 जानेवारी 2025 रोजी सादरीकरण करावे लागेल. यामधून अंतिम फेरी साठी निवड झालेल्या युवांना माननीय पंतप्रधान महोदय यांच्यासमोर संकल्पनांचे सादरीकरण करावयाचे आहे. 12 जानेवारी 2025 रोजी सदर सादरीकरण होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक युवक व युवतींनी आपले प्रवेश अर्ज व ओळखपत्र विहित नमुन्यात दि. 4 डिसेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे जमा करावेत. मुदतीनंतर येणारे व स्पर्धेच्या दिवशी वेळेवर येणारे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार यांनी कळविले आहे. ******

28 November, 2024

बाल संगोपन योजनेसाठी आधार सिडींग करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 28 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी बालकांचे बँक खाते आधार सिडींग करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर यांनी केले आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या व लाभ सुरु असलेल्या बालकाचे वय 10 वर्षाच्या आत असल्यास त्या बालकांचे त्यांच्या पालकांसोबत संयुक्त बँक खाते उघडून सदर खात्याशी बालकांचा आधार क्रमांक डीबीटी, सिडींग करावा. तसेच ज्या बालकांचे वय 10 वर्षापेक्षा जास्त आहे अशा बालकांचे स्वतंत्र बँक खाते उघडून आधार क्रमांक सिडींग करावा. बालकांचा आधार क्रमांक बँक खात्याशी सिडींग नसल्यास या योजनेचा लाभ जमा होणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच जर बालकांचे स्वतंत्र खाते किंवा त्यांचे पालकांसोबत संयुक्त बँक खाते पूर्वीपासूनच उघडलेले असतील तर ते खाते सद्यस्थितीत चालू आहे की बंद आहे याची खात्री करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ***

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 डिसेंबर रोजी

हिंगोली (जिमाका), दि. 28 : शासनाच्या आदेशानुसार डिसेंबर 2007 पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. डिसेंबर महिन्याचे जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि. 2 डिसेंबर, 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि, जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृतीचे निकष अर्ज विहित नमुन्यात व विहित वेळेमध्ये असावा. तक्रार, निवदेन वैयक्तीक स्वरुपाची असावी. अर्जदाराने विहित नमुन्यात तक्रार जिल्हाधिकारी यांच्या नावे लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर दोन प्रतीमध्ये पाठविणे आवश्यक राहील. त्या अर्जावर लोकशाही दिन अर्ज असे ठळक नमूद करावे. जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर विभागाशी संबंधित तक्रार असल्यास तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनांत अर्ज करता येईल. यापुढे प्रत्येक लोकशाही दिना दिवशी प्रत्यक्ष, थेट अर्ज स्वीकारला जाणार नाही. खालील बाबींचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसेल तर तसेच वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनासाठी स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आठ दिवसात पाठविण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देण्यात येईल. निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही. तसेच संबंधित विभागाने अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

तंबाखू जन्य व अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 28 : शहरातील नगर पालिका, आरोग्य विभाग व पोलीस यानी संयुक्त पथक तयार करून तंबाखू जन्य पदार्थ व अंमली पदार्थाला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक दि. 26 नोव्हेंबर, 2024 घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, समाज कल्याणचे ए. एम. वागतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोहन मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. बालाजी भाकरे, डॉ. निशांत मानका, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे, वन विभागाचे सचिन माने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी जिल्हा रुग्णालयांच्या तंबाखू नियंत्रण पथकाने पोलिसांचे सहकार्य घेऊन शाळा, विद्यालय, महाविद्यालय, रुग्णालयासमोर पानशॉपीवर गुटखा विक्री होत असल्यास त्यांच्यावर कोटपा कायद्यानुसार कार्यवाही करावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने मेडीकल स्टोअर्सवर अंमली पदार्थ किंवा नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्या ठिकणी डमी ग्राहक पाठवून कार्यवाही करण्यात यावी. सर्व सदस्यांनी आपापल्या कार्य क्षेत्रातील परिसरात गांजा, अंमली पदार्थ (N.D.P.S.) सदराखालील गुन्हे घडणार नाहीत याबाबत सर्वांनी लक्ष ठेवावे आणि तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. जिल्ह्यातील गांजा, अंमली पदार्थ (एन.डी.पी.एस.) संबंधाने जास्तीत जास्त कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी. तसेच ज्या गांजाची कार्यवाही झाली आहे, अशा गावातील माहिती न देणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यात गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तात्काळ गुन्हे दाखल केले आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात औंढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे आसोला शिवारातील शेत गट क्र 260 मध्ये 10 गांजाची झाडे व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे बोल्डावाडी शिवारातील शेत गट क्र 58 मध्ये 139 गांजाची झाडे मिळून आले आहेत. या दोन्ही गुन्ह्यात 149 लहान, मोठे गांजाची झाडे वजन 29.72 कि.ग्रॉम मिळून आली आहेत. याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे यानी मेडीकल स्टोअर्स तपासणीत कोठेही अंमली पदार्थ किंवा नशेची औषध मिळून आली नसल्याने कार्यवाही केली नाही. तसेच वसमत येथील एम.आय.डि.सी. मध्ये असलेली भुमीन्युट्रोसिटी कंपनीमध्ये नियमानुसार केमिकल वापरल्याने कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याची माहिती दिली. ******

'बाल विवाहमुक्त भारत' अभियानाअंतर्गत मसोड व खानापूर येथे जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 28 : बाल विवाह मुक्त भारत मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते नुकताच विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. या मोहिमेनिमित्त भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या संबंधित राज्य, केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याविषयी निर्देशित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विभाग व प्रत्येक गावात शपथ/प्रतिज्ञा घेण्याचे निर्देश शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील ग्रामपंचायत कार्यालय व हिंगोली तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयात बाल विवाहमुक्त भारत या अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे यांनी बाल विवाहमुक्त भारत करण्यासाठी जबाबदार यंत्रणा आणि त्यांचे योगदान या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकातील श्री. सरनाईक व आरती साळवे यांनी डायल 112 व पोलिसांची भूमिका याबाबत उपस्थितांना मागदर्शन केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व उपस्थित गावातील नागरिक व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत बाल विवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा घेतली, यावेळी गावातील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, आरोग्य क्षेत्रातील डॉ. पठाण उपस्थित होते. त्यानंतर विद्यासागर विद्यालय, खानापुर (चित्ता) येथे बाल विवाह मुक्त भारत अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण यांनी आंतरराष्ट्रीय दत्तक महिना नोव्हेंबर 2024 निमित्त उपस्थित गावकऱ्यांना कायदेशीर दत्तक प्रक्रिया, प्रतिपालकत्व, नको असलेल्या नवजात बाळाचे सुखरुप समर्पण कसे करता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनाथ, सोडून दिलेले परित्याग केलेले बाळ इत्यादी बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पोस्टर्स, जाहीर आवाहन संर्पक क्रमांकासह भिती पत्रके लावण्यात आले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, इसार संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, गावातील नागरिक व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

27 November, 2024

मेरा युवा भारत हिंगोलीच्या वतीने भारतीय संविधान दिवस साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील नेहरू युवा केंद्र व मेरा युवा भारत युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन जूनियर कॉलेज ऑफ एंट्रन्स ऑफ सायन्स अँण्ड आर्ट्स हिंगोली या ठिकाणी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गुरुसुडे रावसाहेब हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संविधानाची मूलभूत कर्तव्य ही आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अंगीकारली पाहिजेत व त्याचे आचरण सुध्दा केले पाहिजे, असे आवाहन प्राचार्य गुरुसुडे रावसाहेब यांनी यावेळी केले. संविधान दिनाच्या निमित्ताने 'भारतीय संविधानाचे महत्त्व' या विषयावर भाषण स्पर्धा घेण्यात आली. त्याचबरोबर संविधान पदयात्रा करण्यात काढण्यात आली. महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संविधान या विषयावर उत्तम रीतीने आपल्या भाषणातून मनोगत व्यक्त केले. भाषण स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेती समृद्धी कदम, द्वितीय पारितोषिक विजेते बजरंग कदम व तृतीय पारितोषिक विजेत्या ममता जैस्वाल यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार गजानन आडे यांनी केले आहे.यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानास 74 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 पासून संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड व परभणी येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव अर्चना ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26 नोव्हेंबर, 2024 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, हिंगोली व संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाचे वाचन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्रती वर्षाप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृहात संविधान दिन कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यु. डी. राजपूत, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, आर्थिकदृष्ट्या मागास व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल वर्षा घुगे, नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल सुलोचना ढोणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महामानवाच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संविधानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी 200 ते 250 विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ***

उल्लेखनीय दायित्वाच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करावेत - अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली (जिमाका),दि.27 : जिल्हा वार्षिक योजनेत चालू वर्षासाठी 40 टक्के तरतूद प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेतील उल्लेखनीय दायित्वाच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आयोजित आढावा बैठकीत दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. चालू वर्ष सन 2024-25 साठी निधी मागणी व प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. सन 2025-26 चे प्रारुप आराखडे परिपूर्ण स्वरुपात सादर करावेत. तसेच सदरचे आराखडे आयपासवर अपलोड करावेत. मागील वर्ष सन 2023-24 च्या दायित्वाचे प्रस्ताव विलंबाच्या सुस्पष्ट कारणासह सादर करावेत. ज्या विभागाचे उपयोगिता प्रमाणपत्र राहिलेले आहेत, त्यांनी तातडीने उपयोगिता प्रमाणपत्र सादर करावेत, अशा सूचना विभाग प्रमुखांना अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी यावेळी दिल्या . यासोबतच अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्यविभाग, वनीकरण विभाग, जलयुक्त शिवार, पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना, पाटबंधारे, पूरनियंत्रण, क्रीडा, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगरविकास, पर्यटन, ऊर्जा, महिला व बालकल्याण, रस्ते व पूल, पर्यटन विकास आदी विविध योजनांसह अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा घेऊन सूचना केल्या. यावर्षी संविधानाचा अमृत महोत्सव वर्षभर साजरा करण्यात येणार आहे. या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर संविधान अभियान' राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये यासह सर्व शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयात दर्शनी भागात संविधान उद्देशिका लावण्यात यावी. तसेच शाळा, महाविद्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करावेत. विविध स्पर्धा, व्याख्याने आयोजित करावेत. ही मोहिम लोकचळवळ स्वरुपात राबवून ही मोहीम यशस्वी करावी, अशा सूचना केल्या. तसेच मुख्य सचिव व विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे संविधान दिवस व अन्य कार्यक्रम घेणे, जिल्हा व तालुकास्तरावर संविधान भवन निर्माण करणे, पर्यटन विभागाच्या योजना, विकास कामे, जलयुक्त शिवार अभियान यासह जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले मोठे प्रकल्प, पाणीपुरवठा योजना, रस्ते, रेल्वे प्रकल्प, बंधारे, मनरेगा, सिंचन विहिरी, शेततळे, ग्रामसडक योजना, मागेल त्याला सौर पंप, सिंचन प्रकल्प, पिक विमा योजना, वार रुम प्रकल्प (भूसंपादन), सीएम डॅशबोर्ड, ई-ऑफिस, ग्रीव्हन्स रिड्रेसल आदी कामाचा मुद्देनिहाय माहिती तात्काळ सादर करावी, अशा सूचनाही श्री. परदेशी यांनी यावेळी दिल्या. *******

26 November, 2024

रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन पाळ्या देण्यास मान्यता

• पहिले आवर्तन दि. 01 डिसेंबर ते 22 डिसेंबर, 2024 या कालावधीत हिंगोली (जिमाका), दि. 26 : प्रतीवर्षी उर्ध्व पेनगंगा प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका-2024 ची आचारसंहिता लागू झाल्याने प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अधीन राहून दि.15 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या धरणातील (964.10 दलघमी) 100 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत रब्बी हंगामात तीन (03) पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामात चार (04) पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास मान्यता मिळालेली आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी तसेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7, 7-अ मध्ये भरून संबंधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. हंगामी व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. प्रकल्प क्षेत्रातील सर्व जनता व लाभधारकांनी पाणी मागणी अर्ज विहीत कालावधीत सादर करून, जलसंपदा विभागास सहकार्य करावे. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 01 डिसेंबर, 2024 रोजी सुरू करून पुढील पाणीपाळ्या खालीलप्रमाणे सुरू करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. सन 2024-25 च्या रब्बी हंगामासाठी तीन आवर्तनामध्ये पाणी सिंचनासाठी पाणीपाळी देण्याचे प्रस्तावित आहे. पहिले आवर्तन दि. 01 डिसेंबर ते 22 डिसेंबर, 2024 या कालावधीत 22 दिवस, दुसरे आवर्तन दि. 1 जानेवारी ते 22 जानेवारी, 2025 या कालावधीत 22 दिवस आणि तिसरे आवर्तन दि. 1 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत 22 दिवस इसापूर उजवा व डाव्या कालव्यातून सोडण्याचे प्रस्तावित आहे. पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनांच्या दिनांकात बदल होऊ शकतो. नमुना नं.7, 7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास खालील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल. लाभधारकांना त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. रब्बी हंगामी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे व अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प, अत्यल्प भूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सूचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल. सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरुस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या, अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे, त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घेऊन उपरोक्त सर्व अटी व नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन अ. बा. जगताप, कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1, नांदेड यांनी केले आहे. ******

"आजच सुरुवात करूया, पती-पत्नी मिळून कुटुंब नियोजनावर बोलूया "

• 4 डिसेंबर 2024 पर्यंत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडाचे आयोजन हिंगोली (जिमाका), दि. 26 : "कुटुंब कल्याण म्हणजे फक्त कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नसून कुटुंब नियोजनाच्या विविध साधनांचा वापर करणे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाड्याच्या निमित्ताने प्रत्येक कुटुंबाने "आजच सुरुवात करून, पती-पत्नी मिळून, कुटुंब नियोजनावर बोलायला सुरुवात केली पाहिजे. पुरुषांनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःची नसबंदी करून, कुटुंब कल्याण कार्यक्रमास हातभार लावायला हवा. कुटुंब नियोजन हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे धोरण आहे. मोठ्या प्रमाणात प्रगती होऊनही कुटुंब नियोजनाची जबाबदारी बऱ्याचदा स्त्रियांनाच पार पाडावी लागते. कुटुंब नियोजनात पुरुषांच्या सहभागाला चालना देण्यासाठी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढविण्याच्या हेतूने पुरुष नसबंदी पंधरवाडा संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे. कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी यावर्षी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवडा-2024 हा दि. 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा केल्याने पुरुष शस्त्रक्रियेबाबत समाजात जनजागृती होऊन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविण्यास मदत होईल. हा पंधरवाडा यशस्वीपणे राबविण्याचे सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुरुष नसबंदी पंधरवाडा हा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा संपर्क आठवडा म्हणून दि. 21 ते 27 नोव्हेंबर, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तर दुसरा टप्पा हा सेवा आठवडा म्हणून दि. 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा अत्यंत सोपी असून याकरिता रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नसते. शस्त्रक्रियेनंतर अगदी अर्ध्या तासात पुरुष स्वतः चालू शकतो. शस्त्रक्रियेनंतर पुरुषामध्ये पूर्वीसारखाच जोम असतो. त्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पुरुषांनी स्वतः शस्त्रक्रिया करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके यांनी केले आहे. *******

बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात उद्या दि. 27 नोव्हेंबर, 2024 रोजी बालविवाह मुक्त भारत मोहिमेचा शुभांरभ होणार आहे. या अनुषंगाने भारत सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याविषयी निर्देशित केले आहे. त्यानुसार राज्यभरात जिल्ह्यातील सर्व विभाग व प्रत्येक गावात उद्या, दि. 27 नोव्हेंबर, 2024 रोजी शपथ/प्रतिज्ञा घेण्यात यावी व यथावकाश देण्यात येणाऱ्या लिंकवर सहभाग होईल, असे निर्देश शासन स्तरावरुन देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, निवडून आलेले प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य क्षेत्रातील एएनएम, आशा, पीएचसी, सीएचसी, विधी सेवा प्राधिकरण-एसएलएसए, डीएलएसए, गृह विभागांतर्गत सर्व पोलीस स्टेशन, एडब्ल्यूडब्ल्यू, एसआरएलएम आणि एसएचजी यासह सर्व यंत्रणांनी बाल विवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा घ्यावी. त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन केले आहे. *****

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या आंतरराष्ट्रीय दत्तक महिन्याचा उद्देश "Foster care and Foster care Adoption" या निमित्त जिल्ह्यातील बालगृहात प्रवेशित अनाथ, निराधार, निराश्रीत इत्यादी प्राधान्याने मोठ्या वयोगटातील बालकांना प्रतिपालकत्व या योजनेचा लाभ मिळवून देणे हा आहे. या निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, प्रसुतीगृह, गर्दीचे ठिकाण व बसस्थानक अशा विविध ठिकाणी भेटी देवून आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त दत्तकासंदर्भात पोस्टर्स, बॅनर लावण्यात आले. कोणतेही बालक परस्पर दत्तक देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.wed.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून दत्तक इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील कुमारी माता, विधवा माता यांना नुकतेच जन्मलेले बाळ नको असेल अशा बाळाचे सुखरुप समर्पन करण्याविषयीची तसेच बालकांचे कायदे व दत्तक प्रक्रिये संदर्भात जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी माहिती दिली. तसेच बालहक्क सप्ताह व बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी, कर्मचारी व चाईल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व कर्मचारी उपस्थित होते. *******

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त औंढा नागनाथ येथे जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 26 : आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक येथे दि. 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली. नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प लाईन 1098 कडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी www.cara.wed.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतात, अशी माहिती चाईल्ड हेल्प लाईन (CHL) 1098 हिंगोलीचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकांच्या कायद्याविषयी तसेच दत्तक प्रक्रिये संदर्भात माहिती दिली. बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन 1098 बाबतची, बालहक्क सप्ताह व चाईल्ड हेल्प लाईन (CHL) 1098 ची माहिती समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी दिली. बालकांसाठी असलेल्या बाल संगोपन योजनेविषयीची माहिती राजरत्न पाईकराव यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. यावेळी चाईल्ड हेल्प लाईनचे पर्यवेक्षक श्रीकांत वाघमारे, केस वर्कर सुरज इंगळे, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नागरे व पोलीस कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. हरण, बसस्थानक प्रमुख वाकळे व प्रवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ******

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, नायब तहसीलदार संतोष बोथीकर, गोळेगावकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****

23 November, 2024

वसमत विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत नवघरे, कळमनुरी संतोष बांगर व हिंगोली मतदार संघातून तान्हाजी मुटकुळे विजयी

हिंगोली (जिमाका), दि.23: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत उर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे तान्हाजी सखारामजी मुटकुळे हे विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघ : 92-वसमत विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार चंद्रकांत उर्फ राजुभैय्या रमाकांत नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांना 1 लक्ष 7 हजार 655 मते पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार) यांना 78 हजार 067 मते मिळाली आहेत. तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. नागिंदर भिमराव लांडगे (बहुजन समाज पार्टी) यांना 806, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज (बापु) (जन सुराज्य शक्ती) यांना 35 हजार 219, जैस्वाल प्रिती मनोज (वंचित बहुजन आघाडी) यांना 14 हजार 027, मुंजाजी सटवाजी बंडे (राष्ट्रीय समाज पक्ष) 596 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार जगन्नाथ लिंबाजी अडकिणे यांना 2764, तनपुरे मंगेश शिवाजी यांना 269, बांगर रामप्रसाद नारायणराव यांना 402, रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी यांना 623, रामचंद्र नरहरी काळे यांना 569 आणि नोटाला 1423 मते मिळाली आहेत. 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघ 93-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर (शिवसेना) 1 लक्ष 22 हजार 016 मते पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. संतोष कौतिका टारफे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना 90 हजार 933 मते मिळाली आहेत. तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. विजय माणिकराव बलखंडे (बहुजन समाज पक्ष) यांना 925, अफजल शरीफ शेख (रिपब्लीकन सेना) यांना 1313, डॉ. दिलीप मस्के (नाईक) (वंचित बहुजन आघाडी) यांना 18 हजार 259, मुस्ताक ईसाक शेख (हिंदुस्तान जनता पार्टी) यांना 384, मेहराज अ. शेख मस्तान शेख (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए- मिल्लत) यांना 159, शिवाजी बाबुराव सवंडकर (महाराष्‍ट्र स्वराज्य पक्ष) यांना 474, डॉ. संजय तुळशीराम लोंढे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांना 168, तर अपक्ष उमेदवार अजित मगर यांना 4212, उद्धव बालासाहेब कदम 139, जाबेर एजाज शेख 134, टार्फे संतोष अंबादास 553, टार्फे संतोष लक्ष्मण 1966, देवजी गंगाराम आसोले 218, पठाण जुबेर खान जब्बार खान 1256, पठाण सत्तार खान 1220, प्रकाश विठ्ठलराव घुन्नर 192, इंजिनिअर बुद्धभूषण वसंत पाईकराव यांना 732 आणि नोटाला 432 मते मिळाली आहेत. 94- हिंगोली विधानसभा मतदारसंघ 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार तान्हाजी सखारामजी मुटकुळे (भारतीय जनता पार्टी) 74 हजार 584 मते पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रुपालीताई राजेश पाटील (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना 63 हजार 658 मते मिळाली आहेत. तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. प्रमोद उर्फ बंडू कुटे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांना 2287, ॲड. साहेबराव किसनराव सिरसाठ (बहुजन समाज पार्टी) यांना 1325, उत्तम मारोती धाबे (अखंड हिंद पार्टी) यांना 544, दिपक धनराज धुरिया (भारतीय जनसम्राट पार्टी) यांना 559, पंजाब नारायण हराळ (राष्ट्रीय समाज पक्ष) यांना 900, प्रकाश दत्तराव थोरात (वंचित बहुजन आघाडी) यांना 23 हजार 944, मुत्तवली पठाण अतिक खान ताहेर खान (मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी) यांना 488, रवि जाधव सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष) यांना 163, सर्जेराव निवृत्ती खंदारे (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) यांना 283, सुनील दशरथ इंगोले (भीमसेना) यांना 271, सोपान शंकरराव पाटोडे (बहुजन भारत पार्टी) यांना 510, तर अपक्ष उमेदवार ॲड. अभिजीत दिलीप खंदारे यांना 2124, आनंद राजाराम धुळे 919, अ. कदीर मस्तान सय्यद (गोरेगावकर) 718, गोविंद पांडुरंग वाव्हळ 497, गोविंदराव नामदेव गुठ्ठे 1551, भाऊराव बाबुराव पाटील 22 हजार 267, मुक्तारोद्दीन अजिजोद्दीन शेख 872, रमेश विठ्ठलराव शिंदे 19 हजार 336, विमलकुमार सुभाषचंद्र शर्मा 437, सुमठाणकर रामदास पाटील यांना 10 हजार 918 आणि नोटाला 665 मते मिळाली आहेत. ******

22 November, 2024

जात वैधता प्रमाणपत्रासाठी 28 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहीम

हिंगोली (जिमाका), दि.22 : येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात पडताळणीचे प्रलंबित अर्ज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 28 नोव्हेंबर, 2024 पर्यंत विशेष त्रुटी पूर्तता मोहीम आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव राजू एडके यांनी दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये अभियांत्रिकी , वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी व बी.एड या व्यावसायिक आरक्षित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात अर्जदार स्तरावर जात प्रमाणपत्राची त्रुटी पूर्ततेअभावी प्रलंबित असलेल्या अर्जदारांना त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर सीसीआयव्हीएस-2 प्रणालीद्वारे त्रुटी कळविल्या आहेत. त्याची पूर्तता न केलेल्या अर्जदारांनी त्रुटी व मूळ कागदपत्रासह शिबीर कालावधीत दुपारी 12 ते 4 या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव राजू एडके यांनी केले आहे. ******

जिल्ह्यात सोमवारपासून पशुगणना; पशुपालकांनी अचूक माहिती द्यावी -पशुसंवर्धन उपायुक्त

हिंगोली, (जिमाका) दि. २२: २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस सोमवार (दि.२५)पासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुट आदि प्रजातीच्या जाती, लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. पी. खुणे, सहायक आयुक्त डॉ. आर. ए. कल्यापुरे यांनी केले आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. सदर पशुगणना दि.२५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले असून ग्रामीण भागासाठी ७४ आणि शहरी भागासाठी ९ असे एकूण ८३ पशुगणनेसाठी प्रगणक, तर ग्रामीण भागाकरिता २२ आणि शहरी भागासाठी ५ असे एकूण २७ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणकाव्दारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासाठी महत्त्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावराची माहिती प्रगणकांना देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. *****

तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

> • सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात, प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल > • पोलिसांचा चोख बंदोबस्त > • ५३ उमेदवारांच्या भाग्याचा होणार फैसला हिंगोली, दि.२२ (जिमाका) : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२०) मतदान झाले असून मतमोजणी उद्या शनिवारी (दि.२३) होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्‍या मतमोजणीतून तीन विधानसभेच्या ५३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी १४ टेबल होणार आहे. *निवडणूक निर्णय अधिकारी* जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली)उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांना तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शारदा दळवी, हरिष गाडे, जीवककुमार कांबळे, श्रीकांत भुजबळ आणि सखाराम मांडवगडे यांच्यासह नायब तहसीलदार सहाय्य करणार आहेत. मतमोजणी ठिकाण याप्रमाणे : ९२-वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), परभणी रोड, वसमत, ९३-कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळमनुरी आणि ९४- हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), हिंगोली येथे होणार आहे. मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे : विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, मतदान केंद्राच्या संख्येनुसार फे-या होणार आहेत. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणीसाठी तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक, एक पर्यवेक्षक आणि एका सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रत्येक मतदारसंघासाठी ४२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. *विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची अंतिम टक्केवारी* जिल्ह्यात एकूण ७२.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदारसंघनिहाय ९२- वसमत ७५.०५, ९३- कळमनुरी ७३.६३ आणि ९४- हिंगोली विधानसभा मतदारसंघात ६८.१६ टक्के मतदान झाले आहे. *मतमोजणी निरीक्षकांनी घेतला आढावा* जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात होणा-या मतमोजणीसाठी नियुक्त मतमोजणी निरीक्षकांनी आपापल्या मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. उद्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचा-यांना प्रशिक्षण देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी निरीक्षक टी. एल. संगीता यांनी माध्यम कक्षाची पाहणी केली. तसेच ९२-वसमत विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक श्री. हिमांशु कुमार गुप्ता व ९४-हिंगोलीसाठी श्रीमती वंदना राव हे काम पाहणार आहेत. ****

21 November, 2024

तीनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी

• विधानसभा मतमोजणी केंद्र निश्चित • विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती हिंगोली (जिमाका), दि.21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीसाठी प्रती मतदार संघ 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिकासाठी वेगळे टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक पर्यवेक्षक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. *विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्र* 92-वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी रोड वसमत ता. वसमत जि. हिंगोली येथे होणार आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी जि. हिंगोली येथे होणार आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, एमआयडीसी, लिंबाळा मक्ता ता. जि. हिंगोली येथे होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी 1023 मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. *विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती* भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी हिमांशुकुमार गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती टी. एल. संगीता आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे. ******

हिंगोली जिल्ह्यात 72 टक्के मतदान

• वसमत विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान • हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक • पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी • तृतीयपंथीयाचे 50 टक्केच मतदान हिंगोली (जिमाका), दि.21: हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 72.24 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 75.05, कळमनुरी 73.63 आणि हिंगोली विधानसभा मतदार संघात 68.16 टक्के मतदान झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव, खर्च निरीक्षक श्री. अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. राकेशकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 40 हजार 737 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 26 हजार 818 पुरुष, 1 लाख 13 हजार 917 महिला तर 2 तृतीयपंथी मतदाराने मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 43 हजार 490 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 28 हजार 771 पुरुष, तर 1 लाख 14 हजार 718 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 2 लाख 27 हजार 202 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 19 हजार 750 पुरुष, 1 लाख 7 हजार 450 महिला आणि 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 92-वसमत विधानसभा मतदार संघ (75.05 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (68.16 टक्के) सर्वात कमी राहिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख तसेच जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. *******

20 November, 2024

निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांची विविध मतदान केंद्राला भेट

हिंगोली (जिमाका), दि. 20: जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी आज हिंगोली येथील सरजू देवी भिकुलाल आर्य कनिष्ठ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्र, सिटी क्लब येथील सखी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीमती वंदना राव यांनी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघ कार्यालयास व तेथे असलेल्या आदर्श आचारसंहिता कक्ष, प्रसार माध्यम कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, आदर्श आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी अरविंद मुंढे, प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी पंडित मस्के, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती राव यांनी 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील कळमनुरी, साळवा, आखाडा बाळापूर व शेवाळा येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले. ******

हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदान

• निवडणूक विभागाची 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर • पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त • आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून 9 मतदान केंद्रांचे संचलन हिंगोली, (जिमाका) दि.20: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 11, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 19 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 23 असे जिल्ह्यात एकूण 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सायंकाळी 7 वाजेनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदान सुरु असल्यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास वेळ लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 59.67, 93-कळमनुरी 63.20 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सरासरी 60.62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 लाख 84 हजार 764 मतदार असून, त्यामध्ये 5 लाख 10 हजार 393 पुरुष तर 4 लाख 74 हजार 361 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 10 मतदारांचा यात समावेश आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 20 हजार 765 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 64 हजार 931 पुरुष, 1 लाख 55 हजार 828 महिला व 6 इतर मतदारांचा यात समावेश आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 30 हजार 686 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 71 हजार 937 पुरुष, 1 लाख 58 हजार 747 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 33 हजार 313 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 73 हजार 525 पुरुष, 1 लाख 59 हजार 786 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव, निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेश कुमार बन्सल यांनी हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे भल्या पहाटेपासून ते दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी वेबकास्टींगच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन केले. तर निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहस्थित 515 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या वेब कास्टींग रुमला भेट देत पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तर जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) हे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पार पाडले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र-3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे. या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. प्रथम मतदान करणारे युवा-युवती, ज्येष्ठ मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा…! जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात प्रथम मतदान करणारे युवक-युवतींनी मतदान करणासाठी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सुरुवातीपासूनच मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष देत सर्व पथकप्रमुखांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देत वेळोवेळी आढावा घेतला. सर्व पथक प्रमुखांचा सहभाग विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी 22 पथक प्रमुखांच्या समिती स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, निवडणूक साहित्य, वाहतूक व्यवस्था, तांत्रिक कक्ष, स्विप, कायदा व सुव्यवस्था, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्थापन, उमेदवारांचे खर्चविषयक व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका व सर्व्हीस व्होटर, प्रसार माध्यम व संदेशवहन, संपर्क आराखडा, मतदार यादी व्यवस्थापन, मदत कक्ष व तक्रार निवारण, दिव्यांग व्यक्तीसाठी मदत कक्ष व सोयीसुविधा पुरविणे, वेब कास्टींग, परवानगी कक्ष, अवैध मद्यवाटपास प्रतिबंध, सी-व्हीजील ॲप, निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली, निवडणूक निरीक्षकांचे नोडल अधिकारी आदी समिती प्रमुखांनी या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. ******

वसमत व कळमनुरी विधानसभा मतमोजणीसाठी हिमांशू कुमार गुप्ता व श्रीमती टी. एल. संगीता निरीक्षक

• हिंगोलीसाठी श्रीमती वंदना राव यापूर्वीच दाखल हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी हिमांशू गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती संगीता यांची तर 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती वंदना राव ह्या यापूर्वी हिंगोली जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून काम करत आहेत. 92-वसमत विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी निरीक्षक श्री. गुप्ता हे 2013 उत्तर प्रदेश कॅडरचे एससीएस सेवेचे अधिकारी असून 8604015479 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी निरीक्षक श्रीमती टी. एल. संगीता तेलंगाणा कॅडरच्या 2022 च्या एससीएस बॅचच्या अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 9515678010 असा आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी निरीक्षक श्रीमती वंदना राव या सन 2015 च्या दिल्ली कॅडरच्या आयएएस अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 7820869248 असा आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आलेल्या मतमोजणी निरीक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक विभागाकडून प्राप्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

• जिल्हाधिकारी यांनी घेतली सेल्फी • लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्यासाठी केले आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल व त्यांच्या सुविद्य पत्नी शुभी गोयल यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे. तेंव्हा आपणही आपले मतदान करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी व त्यांच्या पत्नीनी येथील मतदान केंद्रावर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांसह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत. या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ******

19 November, 2024

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

• हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील पथके मतदान केंद्राकडे रवाना • ‘है तय्यार हम’ निवडणूक कामी नियुक्त पथकांची भावना हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाची मतदानासाठी जय्यत तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या, दि. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील पथके आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आली आहेत. वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते आणि हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या नियंत्रणाखाली ही पथके आज सकाळपासून रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात उद्या होणाऱ्या‍ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी नियुक्त पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘है तय्यार हम’ची भावना व्यक्त केली. 92-वसमत विधानसभा मतदार संघ 92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 1702 मतदान अधिकारी, 656 पोलिस कर्मचारी व होमगार्ड, 328 शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्तरावरील पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात येणार आहे. समन्वय करण्यासाठी 38 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या 18 पथकामार्फत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे. सशस्त्र सेना बलाचे 90 जवान मतदार संघात गस्तीवर असतील. सर्वांनी निर्भयपणे व न चुकता मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेऊन त्यांना मतदान यंत्र व मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य देऊन 352 मतदान केंद्रावर 36 क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पथके रवाना करण्यात आली. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 352 मतदान केंद्राध्यक्ष, 1056 मतदान अधिकारी, 95 महिला कर्मचारी, 704 पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण 2207 अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहेत. या कामी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या सहाकार्याने मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पाठविण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघ 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी 343 मतदान केंद्रांवर 1524 अधिकारी व कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी 35 मतदान केंद्रावर महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही सर्व पथके हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केद्रांकडे रवाना करण्यात आली आहेत. त्यासाठी 25 बस, 6 मिनीबस, 108 जीप व्यवस्था करण्यात आली आहे. समन्वय करण्यासाठी 41 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे. ******

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली, दि.19 (जिमाका): भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार संतोष बोथीकर, सचिन जोशी यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बोधवड यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. ******

आपल्या अमूल्य मताची किंमत जाणा अन् मतदान करा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका) दि. 19 : लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा महत्त्वाचा अधिकार आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला सारखेच महत्व आहे. त्यामुळे आपल्या अमूल्य मताची किंमत जाणून उद्या सर्वांनी विधानसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. उद्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडून 92- वसमत, 93- कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदान केंद्रावर जाऊन लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मत अत्यंत अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असेही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे. 20 नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनामार्फत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदाराला आपले मतदान केंद्र कुठे आहे हे माहित करून घेण्यासाठी 'वोटर हेल्पलाईन' अँप डाउनलोड करून त्यावरून ते शोधता येईल. या सर्व निवडणुकीसाठी आपण सर्वांनी लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावावा. सर्व मतदारांच्या पुढाकारामुळे मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. ******

मतदारांनो, मतदानासाठी हे 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य

हिंगोली (जिमाका), दि. 19 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. *****

मतदानासाठी आज सुट्टी अथवा दोन तासांची सवलत

हिंगोली (जिमाका), दि. 19 : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी कामगारांना सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता की स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणसाठी नोडल अधिकारी टि. ई. कराड सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली (मो.नं. 7218161627) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******

हिंगोली जिल्ह्यात 515 मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका) दि.19: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकूण 1 हजार 23 मतदान केंद्र असून, त्यापैकी निम्मे म्हणजेच 515 मतदान केंद्रांवर वेब कास्टींगद्वारे करडी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ही भयमुक्त, खुल्या वातावरणात आणि पारदर्शी पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन काम करत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोग जिल्ह्यातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींगद्वारे देखरेख ठेवणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 92-वसमत 328, 93-कळमनुरी 352 आणि 94-हिंगोली 343 अशा एकूण तीन विधानसभा मतदारसंघामध्ये 1 हजार 23 मतदान केंद्र आहेत. 92-वसमत विधानसभा मतदार संघात 164 मतदान केंद्रावर, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 180 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 171 मतदान केंद्रावर वेबकास्टींगची सुविधा तयार करण्यात आली असून, या सर्व मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. *******