26 May, 2022

 

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी साधणार लाभधारकांशी संवाद

संवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर




हिंगोली (जिमाका), दि. 26 : विविध विकास योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, उज्जवला योजना, पोषण अभियान, मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन आणि अमृत, स्वनिधी योजना, वन नेशन वन रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना, जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ दुर्गम भागातील लाभार्थ्यांपासून शहरातील लाभार्थ्यांपर्यंत देण्यात आला आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या योजनांच्या लाभार्थ्यांशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 31 मे रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. हा संवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण धरमकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, अनंत कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हाती घेतलेल्या अमृत सरोवर योजना,  येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर ‘हर घर झेंडा’ मोहिमेअंतर्गत ध्वज लावणे यासह  इतर योजनांचाही आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना विविध लोकोपयोगी व पर्यावरण संतुलनाशी निगडीत असलेल्या योजनांमध्ये लोकांचाही सहभाग घ्यावा. यानिमित्त दररोज विविध योजनेची प्रसिध्दी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

******

25 May, 2022

 



पीक कर्जाचे 60 टक्के उद्दिष्ट जून अखेर पर्यंत पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 25 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2022-23 च्या खरीप पी कर्जाचे 60 टक्के उद्दिष्ट जून अखेर पर्यंत पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, आरबीआयचे संदीप कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कदम, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले,  विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, दर पंधरा दिवसाला पीक कर्जाचा आढावा घ्यावा. प्रत्येक गावात जाऊन बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे नुतनीकरणाचे व नवीन अर्ज भरुन घ्यावेत. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण करावे आणि आपणास देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावेत. तसेच विविध योजनेचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. यात हयगय करणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले.

तसेच दहा रुपयाची व इतर नाणी कालबाह्य झालेली नाहीत. ती अद्याप चलनात आहेत. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करुन ती  चलनात आणावेत. तसेच सर्व बँकेच्या दर्शनी ठिकाणी नाणी व फाटक्‌या , तुटक्या नोटा बदलून मिळतील असे फलक लावावेत, अशा सूचना केल्या.

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त लिड (जिल्हा अग्रणी) बँकेच्या वतीने  दि. 6 जून ते 12 जून या कालावधीत आयकॉनिक वीक साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आठवडा भर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत. यामध्ये दि. 8 जून रोजी मा.पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विविध योजनेच्या लाभार्थ्याना धनादेशाचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व बँकानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लिड बँकेचे व्यवस्थापक श्री.सावंत यांनी यावेळी केले. 

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने तयार केलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

******

 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'माहिती भवन' इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार

 

'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 25 - पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले.  सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दैनिक सामनाचा मी देखील काही काळ संपादक होतो, त्यामुळे राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मी मोठा झालो, त्यामुळे पत्रकारितेशी माझे कायम ऋणानुबंध आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये बराच बदल झाला असून खिळ्यांच्या ब्लॉकच्या टाईपसेटिंगपासून मोबाईलपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास थक्क करणारा आहे. आता एका क्षणात जगभरात माहिती पाठवता येते आणि हे काम करण्यासाठी पत्रकारांना एका ठिकाणी बसता यावे याकरिता माहितीभवन निश्चितच उपयुक्त ठरेल. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतात, त्या बातम्यांची वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक आहे. माहिती भवनची संकल्पना महत्त्वपूर्ण असून येथे सुरु करायच्या उपक्रमांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. नवी मुंबईतील नेरूळ येथे माहिती भवनाची अत्याधुनिक इमारत विभागाच्या कामकाजास उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. या माहिती भवनामध्ये पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच महासंचालनालयाकडील असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करुन डिजिटल ग्रंथालय लवकरच सुरु होईल. असा विश्वास व्यक्त करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे बळकटीकरणाची ग्वाही यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिली.

माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. ते म्हणाले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय वृत्तसंकलनाबरोबरच माहितीचे विश्लेषण देखील करीत असते. अलिकडच्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार विभागाने केल्यामुळे कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. या बदललेल्या कामाच्या पद्धतीसाठी माहिती भवनाची संकल्पना उपयुक्त ठरेल. माहिती भवनसाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांचे आणि सिडकोचे श्री. कपूर यांनी आभार मानले. या माहिती भवनामध्ये माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचेही श्री. कपूर यांनी सांगितले.

यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. सिडकोची ही इमारत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आता ही इमारत प्रत्यक्ष आज हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगून या इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डॉ. मुखर्जी यांनी सांगितले.

या कार्यक्रमास संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्रिया रातांबे यांचेसह माहिती व जनसंपर्कचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी तर संचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी यांनी आभार मानले.

असे आहे माहिती भवन...

नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती भवन

सिडको इमारतीच्या  सुमारे 6 हजार 883 चौरस फुट क्षेत्रफळाच्या भव्य जागेत माहिती भवन सुरु होणार.

तळमजला आणि पहिला मजला असे स्वरुप असलेल्या या इमारतीत कॉन्फरन्स रुम, कार्यालये, बहुद्देशीय सभागृह, अतिथी कक्ष, प्रतिक्षा कक्ष, स्वयंपाकघर, वाहनतळ आदी सुविधा.

इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २.५८ कोटी रुपये खर्च.

अद्ययावत स्टुडिओ, लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा, राज्यस्तरीय माध्यम प्रशिक्षण केंद्र, पत्रकार कक्ष, ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय, विविध प्रकाशनांचे दालन, प्रदर्शन दालन, दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, दुर्मिळ दृकश्राव्य दालन, समाजमाध्यम कक्ष, पत्रकार परिषद कक्ष, माध्यम प्रतिसाद केंद्र आदींचा माहिती भवनात समावेश

******

 

प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष मोहिम राबवावी

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर



 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचा वापर बंद करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये आठवड्यातून दोन दिवस विशेष मोहिम राबवून प्लास्टिक निर्मूलन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.    

            एकल वापर प्लास्टिक निर्मूलनासाठी व त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एस. आर. कुलकर्णी, हिंगोलीचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी व्ही.आर.अंभोरे, क्षेत्र अधिकारी एन. पी. दारसेवाड यांची उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, प्लास्टिक निर्मूलनासाठी विशेष मोहिम राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. विविध माध्यमातून जनजागृती करावी. तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यामार्फत जनजागृती करावी. शहरी भागात आठवड्यातून दोन दिवस विशेष मोहिम राबवून प्लास्टिक निर्मूलन करावे. तसेच ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची बैठक घेऊन प्लास्टिक निर्मूलनाची अंमलबजावणी करावी , असे निर्देश दिले.

            एकल वापर प्लास्टिक निर्मूलनासाठी कृती दल स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलात इतर आठ सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व नगर पालिका/पंचायतचे मुख्याधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा पर्यटन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करणे, प्लास्टिक कचऱ्यांचे मूल्यांकन करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करणे, कचऱ्याचे विलगीकरण, संकलन, साठवण आदी कामे या कृती दलाच्या माध्यमातून केली जाणार आहेत, अशी माहिती  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एस. आर. कुलकर्णी यांनी बैठकीत दिली.

******

 

उद्योजकतेला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा 1 जून रोजी हिंगोली जिल्ह्यात

युवक-युवती व नवउद्योजकांनी सहभागी व्हावे-डॉ.रा.म.कोल्हे

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : राज्यात लघु व सुक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

            ही यात्रा 1 जून, 2022 रोजी हिंगोली येथे येणार आहे. दि. 1 ते 3 जून दरम्यान युवक-युवती व नवउद्योजकांना विनामूल्य उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे तीन दिवशीय मोफत उद्योजकता प्रशिक्षण सामाजिक न्याय भवन, जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी https://forms.gle/or8bgAHJQZDvF25V6 या गुगल फॉर्मवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

            या प्रशिक्षणामध्ये तज्ञ प्रशिक्षक सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करुन त्यांच्याशी जोडून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, व्यवसायासाठी बाजारात संधी कशा प्रकारे शोधल्या पाहिजेत याबाबत माहिती देणे, जिल्हा उद्यमिता विभागाला त्यांना जोडून देणे अशा अनेक महत्वाच्या विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

            ही उद्यमिता यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये दि. 1 जून रोजी येणार असून या यात्रेमध्ये जिल्ह्यातील नव उद्योजकांनी तसेच व्यवसाय करण्यास इच्छूक असणाऱ्या व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा. नोंदणी करताना काही समस्या आल्यास युथ एड जिल्हा समन्वयक दत्तप्रसाद रहाटे मो.8766932413 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

****

 

रासायनिक खताची एमआरपीपेक्षा जास्त किंमत सांगणाऱ्या

कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगाम-2022 ची पूर्वतयारी सुरु असून खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते, किटकनाशके यांची बाजारात उपलब्धता झालेली आहे. शेतकऱ्यांकडून हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांची खरेदी सुरु आहे. मागील काही दिवसात समाज माध्यमावर जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना रासायनिक खताची विक्री करतांना खताच्या एमआरपीपेक्षा अधिक दर सांगत असल्याची तसेच खतासोबत अन्य निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचे व्हिडिओ क्लीप, बातम्या आढळून आल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कृषि सेवा केंद्राची तपासणी केली असता तपासणी अहवालात आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथील प्रगती कृषि केंद्र , शेतकरी कृषि केंद्र, ठाकरे कृषि केंद्र या तीन कृषि केंद्राचे रासायनिक खत किरकोळ विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.   

            तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कृषि निविष्ठांची खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावी. निविष्ठा खरेदीचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावेत. खते खरेदी करताना आधारकार्ड घेऊन जावे. एमआरपी पेक्षा जास्त दराने कोणत्याही कृषि निविष्ठांची खरेदी करु नये. खरेदी केलेल्या बियाण्याचे रिकामी पिशवी, टॅग, खरेदीची पावती, त्यातील थोडे बियाणे जतन करुन ठेवावे. तसेच कृषि निविष्ठासंदर्भातील आपल्या तक्रारी, समस्याबाबत 9527494578 या क्रमांकाशी तसेच कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.ए.घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एन.आर.कानवडे यांनी केले आहे.

******

24 May, 2022

 

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या

निवड चाचणीसाठी 25 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 24 : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे ॲथलेटिक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे राज्य निपुणता केंद्र ( खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) कार्यान्वित करण्यात आले आहे.  

            खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणी दि. 30 मे ते 31 मे, 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यासाठी खेळाडूंचे अर्ज मागविण्यात येत आहेत. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत ॲथेलेटिक्स-18, सायकलींग-14, शुटींग-24 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

            वरील संबंधित खेळाबाबतची खेळाडूंची चाचणी तंत्र समितीमार्फत घेऊन गुणानुक्रमे खेळ बाबीमध्ये निश्चित केली जाणार आहे.

            सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाचे राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग , प्राविण्य प्राप्त खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत प्रवेशासाठी दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी परिशिष्ट-अ नुसार मानके निश्चित केलेली आहेत. खेळाडूंना दि. 25 मे, 2022 पर्यंत परिशिष्ट-ब नुसार माहिती अर्ज kiscepune@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.

            शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा. चाचणीस येताना खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत व मूळ प्रत सोबत आणावी. चाचणीस येतांना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी.

            शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथील राज्य निपुणता केंद्रात ( खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) प्रशिक्षण घेण्यासाठी दि. 30 मे ते 31 मे, 2022 या कालावधीत होणाऱ्या निवड चाचणीसाठी वरील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या खेळाडूंनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

******