14 August, 2025

सेनगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 25 क्षय रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप

हिंगोली, दि.14 (जिमाका): सेनगाव तालुक्यात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी उपचारादरम्यान निक्षय मित्र स्वखर्चातून पोषण आहार किट दिली जाणार आहे. आज या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते 25 क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार कीटचे सेनगाव येथे वाटप करण्यात आले. क्षय रुग्णांना पोषण आहाराचा आधार देऊन निक्षय मित्र होण्याचे आवाहन करून क्षयरोग हा समाजातून समूळ उच्चाटन होण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दोन आठवड्याचा खोकला असेल तर त्वरित डॉक्टराशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) अनिल माचेवाड, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गट विकास अधिकारी श्री. कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी 41 क्षय रुग्णांना पोषण आहार कीटबाबत दत्तक घेतले आहे. या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असून, त्यापैकी आज 25 क्षय रुग्णांना मोफत किट वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वखर्चातून वाटप करण्यात आले. या कीटमध्ये प्रत्येकी एक किलो तेल, शेंगदाणे, मूग डाळ, गहू, साखर आणि प्रोटीनचा डबा असा समावेश आहे. यावेळी बैठकीत सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, पंचायत समिती तसेच तालुका आरोग्य अधिकारी-कर्मचारी व तालुकास्तरावरील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. *****

अवयव दान मोहिमेअंतर्गत बहिर्जी विद्यालयात रांगोळी व पोस्टरद्वारे जनजागृती

हिंगोली, दि. 14 (जिमाका): सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘अवयवदान पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून वसमत येथील बहिर्जी विद्यालयात अवयव दानाबाबत जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रांगोळी व पोस्टर बनवून अवयवदानाचा संदेश दिला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम पार पडला. ग्रामीण व शहरी भागात अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमात बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. *****

डाक विभागातर्फे दीन दयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षेचे आयोजन

हिंगोली(जिमाका),दि.14 : परभणी डाक विभागातर्फे दीन दयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षा 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अंतिम गुरुवार, दिनांक 18 सप्टेंबर, 2025 आहे. परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे. ही स्पर्धा फक्त इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यासाठी असून स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पोस्टात फिलाटेली डिपॉझिट अकाउंट असणे आवश्यक आहे. हे खाते फक्त 200 रुपयात उघडता येईल. जर यापूर्वीच फिलाटेली डिपॉझिट अकाऊंट उघडलेले असल्यास नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही. ही स्पर्धा 2 टप्प्यांची असेल. पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी डाक विभागातर्फे 50 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि या परीक्षेचे मूल्यमापन राज्यस्तरावर केले जाईल. त्याआधारे इयत्ता 6 वी ते 9 वीच्या प्रत्येक इयत्तेच्या राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीनुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांना फिलाटेली प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कळविण्यात येईल. या फिलाटेली प्रोजेक्टच्या आधारे राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची अंतिम निवड होईल. अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 हजार रुपयाची शिष्यवृत्ती, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. गेल्या 2 वर्षांमध्ये परभणी डाक विभागामध्ये एकूण 11 विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकावलेली असून यावर्षीही दीन दयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना 2025-26 स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व शाळांनी सहभाग नोंदवून आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाची शिष्यवृत्ती पटकवण्याची संधी द्यावी, असे आवाहन परभणी विभागाचे डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक डाक अधीक्षक (मुख्यालय) पवन मोरे, व कार्यालयीन सहाय्यक श्रीपाद कुंभारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभाग परभणी तर्फे करण्यात आले आहे. ******

स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

हिंगोली(जिमाका),दि.14 :- भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.05 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहावे. इतर सर्व कार्यालये, संस्था यांना ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास, त्यांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 पूर्वी किंवा सकाळी 9.35 वाजल्यानंतर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

सार्वजनिक दसरा महोत्सव कार्यक्रमासाठी विविध पथक प्रमुखाची नियुक्ती

हिंगोली (जिमाका), दि. 14 : सार्वजनिक दसरा महोत्सव-2025 आगामी काळात हिंगोली येथील रामलीला मैदानावर साजरा होणार आहे. हा सार्वजनिक दसरा महोत्सव कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने राबविण्यासाठी व समन्वय ठेवण्यासाठी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी यांनी विविध कामकाजाचे वाटप करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय पथकासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय हिंगोली यांची, पोलीस बंदोबस्त कामी उपविभागीय पोलीस अधिकारी व हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, खाद्य पदार्थ तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त, दसरा महोत्सव कालावधीत विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, अवैध दारु विक्री व चोरटी वाहतूक इत्यादीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, समितीच्या निर्देशाप्रमाणे स्टॉलचे नियोजन गटविकास अधिकारी, रामलीला मैदानाची मोजणी, नकाशा आदी कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, साफसफाईसाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या जमा व खर्चाचे कामकाज करण्यासाठी अपर कोषागार अधिकारी यांची तर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे उप अभियंता यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त विविध पथक, समिती प्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या कामासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावेत. आवश्यक अधिकारी, कर्मचारी नेमणुकीबाबत त्यांच्या स्तरावरुन स्वतंत्र आदेश काढावेत. तसे नेमून दिलेल्या कामाचे योग्य नियोजन करुन वेळोवेळी समितीस अवगत करावे. या कामी हयगय अथवा टाळाटाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष समाधान घुटुकडे यांनी दिले आहेत. *****

सोयाबीनवरील किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी घ्यावी योग्य काळजी

हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यात आयोजित मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटी दरम्यान पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा व चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. रोगाची लक्षणे : पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे पट्टे दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुले आणि शेंगा कमी लागतात. दाण्यांचा आकार राहतो. शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. उपाययोजना : सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मुख्यत: पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून त्यांना जाळून किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीत. पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे प्रती एकरी 10 याप्रमाणे लावावेत. आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी अलिका, टॅगेटा, इरुका, अनोलिका, झपॅक यापैकी एका रासायनिक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच स्पेरटो, अरजित यापैकी एका रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 5 ग्रॅम साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच सोलोमन या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 7 मिली साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. चक्री भुंगा किडीची लक्षणे : या किडीची मादी भुंगा पानाचे देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करतो. यामध्ये मादी तीन छिद्र करते आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. त्यामुळे चक्राचे वरचा भाग वाळतो. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरुन पोकळ करीत आहेत. अळी 19 ते 22 मि.मी. लांब गुळगुळीत पिवळसर रंगाची असते. सुरुवातीला किडग्रस्त झाड इतर झाडासारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्रीभुंभा किडीमुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्याच्या संख्येत आणि वजनात 50 टक्केपर्यंत घट येऊ शकते. उपाययोजना : चक्री भुंग्याच्या नियंत्रणासाठी प्रोफेक्स, प्रोफेक्स सुपर, प्रोफेनोफॉस इत्यादी रासायनिक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच बेल्ट, काल्डन इत्यादी रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 15 मि.ली. साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच हॉस्टथॉक्स, ट्रायडेम या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 12.5 मिली साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. टॉर्नेडो, एथिऑन या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 15.30 मि.ली. साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. कोराजन या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 3 मि.ली. साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. वरील उपाययोजनांचा तात्काळ अवलंब करुन सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

मौजे कुरुंदवाडी येथील रास्तभाव दुकानासाठी आक्षेप आल्याने प्रक्रिया थांबवली

• वसमत तालुक्यातील उर्वरित गावातील रास्त भाव दुकानासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत हिंगोली (जिमाका), दि. 14 : वसमत तालुक्यातील 16 रास्तभाव दुकानासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी मौजे कुरुंदवाडी येथील मूळ परवानाधारकाने मा.उपआयुक्त (पुरवठा) छत्रपतीसंभाजीनगर यांच्या न्यायालयात आक्षेप/अपिल सादर केल्यामुळे कुरुंदवाडी येथील रास्त भाव दुकानाची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कुरुंदवाडी हे गाव वगळता उर्वरित गावातील रास्तभाव दुकानासाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. याबाबतचे जाहीर प्रगटन तहसील कार्यालयामार्फत गावात डकवण्यात आलेले आहे. यासाठी भरावयाचे अर्ज तहसील कार्यालय, वसमत येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने दि. 6 जुलै, 2017 च्या शासन निर्णयानुसार पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येतील. ही रास्तभाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानाचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाद्वारे करणे आवश्यक राहील. अधिकृत स्वयं सहाय्यता गटांना प्राधिकारपत्राच्या अटी शर्तीच्या पालनार्थ भरावयाच्या प्रतिभूती ठेवीच्या रक्कमा चलनाव्दारे बँकेत शासन जमा नियमानुसार कराव्या लागतील. रास्तभाव दुकान, किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यासाठी प्राथम्य सूची दि. 3 नोव्हेंबर, 2007 व दि. 25 जून, 2010 च्या शासन निर्णयानुसार विचारात घेतली जाईल. प्राथम्यसूचीनुसार गटांची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरीक्षण केलेल्या गटास प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटाचे हिशोब व लेखे अद्यावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान 80 टक्के असावे. आवेदन करणाऱ्या संस्थांनी दि. 3 नोव्हेंबर, 2007, दि. 6 जुलै, 2017 व 1 ऑगस्ट, 2017 या शासन निर्णयांचे वाचन करुन आवेदनपत्र अचूक भरावेत. अर्ज भरण्याची मुदत ही दिनांक 20 ऑगस्ट, 2025 पर्यंत तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत विहित नमुन्यात स्वीकारण्यात येतील. वरील दाव्याचे पृष्ठीकरिता लेखी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. स्वंय सहाय्यता बचत गटाची निवड करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी अध्यक्ष असलेली शासन नियुक्त समिती (त्या गावच्या महिला ग्रामसभेची शिफारस विचारात घेऊन) करील. या जाहिरनाम्यामध्ये अशंतः किंवा पूर्णतः बदल करण्याचे अधिकार निम्न स्वाक्षरीकाराने राखून ठेवले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******