27 March, 2019

लोकसभा निवडणुक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात -निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर




लोकसभा निवडणुक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात
-निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर

हिंगोली,दि.27: येणाऱ्या 18 एप्रिल रोजी 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाकरीता होणारी सार्वत्रिक निवडणुक मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडाव्यात, असे प्रतिपादन निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. जे. रवीशंकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आयोजित  आढावा बैठकीत रवीशंकर हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील कापडणीस, अभिनय गोयल, महेश वडदकर, प्रविण फुलारी, प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
यावेळी श्री. रवीशंकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची 10 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक पारदर्शक पार पाडण्याकरीता मतदार संघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. निवडणुक होत असलेल्या गावात संपर्क करण्याची यंत्रणा तयार ठेवावी. मोबाईल कनेक्टीव्हीटी नसलेल्या भागात संपर्कासाठी पर्यायी नियोजन करण्यात यावे. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होईल याकडे सर्वांनी विशेष लक्ष द्यावे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब होणार नाही याकडे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. उमेदवाराच्या निवडणूक खर्चाबाबतही दक्ष राहण्याची गरज आहे. निवडणूक प्रक्रीया प्रभावित करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करावी. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुक तयारीचा आढावा घेण्यासाठी गावांना भेटी द्याव्यात. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये. निवडणूक निर्णय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी समन्वय ठेवावा, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा यांनी समन्वय राखून निवडणूका निपक्ष:पणे पार पडतील याची दक्षता घ्यावी. निवडणुकीमधील गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देशही श्री. रवीशंकर यांनी  यावेळी  दिले.
या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांचा मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अंमलबजावणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मतदान करण्यासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे असे ही श्री. रवीशंकर यावेळी म्हणाले.
यावेळी सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.


****

No comments: