29 March, 2019

राजकीय पक्षानी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे - निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर





राजकीय पक्षानी आदर्श आचार संहितेची काटेकोर
अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे
- निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर

            हिंगोली,दि.29: मा.भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 15-हिंगोली मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून, दूसऱ्या टप्प्यात दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान होत आहे. याकरीता आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक डॉ. जे. रवीशंकर यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाच्या बैठकीत श्री. रवीशंकर हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव,  विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनीधी उपस्थित होते.   
यावेळी श्री. रवीशंकर म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15-हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. त्यानुसार, दिनांक 19 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार दिनांक 26 मार्चपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक होती. तसेच दिनांक 29 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे. आजापासून सर्व उमेदवारांच्या खर्चाची नोंद घेतली जाणार असून, आयोगाच्या निर्देशनानुसार खर्चाचा हिशोब ठेवावा. खर्च निवडणूक निरीक्षक सर्व उमेदवरांच्या तीन वेळा खर्च नोंदवही तपासणार आहेत. 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. 1 हजार 989 आणि 8 सहाय्यकारी मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले. तसेच निवडणूक कालावधीत उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी आयोगाचे ‘सुविधा’ हे संकेतस्थाळ सुरु केले असून याद्वारे सर्व परवानगी ऑनलाईन मिळू शकणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे यंत्राची यापूर्वीच सर्व मतदान केंद्रस्तरावर आणि बुथ लेवल एजंट यांना प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले आहे. तसेच उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात देखील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र प्रात्यक्षीकासाठी ठेवले जाणार आहे. सदर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रथमस्तरीय रॅन्डोमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया 24 मार्च रोजी पार पडली असून, दूसरी रॅन्डोमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया ही 31 मार्च रोजी पार पडणार आहे. सदर प्रक्रियेस सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनीधीनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी श्री. जयवंशी यांनी केले.
 तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजेपूर्वी  मॉक पोल (मतदान) घेतले जाते. सदर मॉक पोल (मतदान) घेतल्यानंतर सदर मतदान  काढून (सीआरसी) डिलीट केले असल्याची बूथ लेवल एजंट यांनी खात्री करुन घ्यावी. मॉक पोल झाल्यानंतर व्हीव्हीपॅट मधील सर्व चीठ (पावत्या) काढून त्या सिलबंद पाकीटात ठेवून, नंतर व्हीव्हीपॅट यंत्र सिलबंद केल्याची ही खाली बूथ लेवल एजंटानी करावी. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियावर जाहिरत प्रसारीत करण्यापूर्वी सदर जाहिराती एम.सी.एम.सी. समितीकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच हि निवडणूक सर्वसमावेशक होणार असून, मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच मतदार संघातील सेक्टर निहाय दिव्यांग मतदारासाठी व्हील चेअर तसेच वृध्द आणि गर्भवती स्त्रियांसाठी वाहनांची व्यवस्था आणि उन्हाचा त्रास होऊ नये याकरीता शेडसह बसण्याची व्यवस्‍था प्रत्‍येक मतदान केंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक विषयक काही मदत किंवा माहिती हवी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती ही श्री. जयवंशी यांनी यावेळी दिली.
****

No comments: