01 November, 2019

पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणी करा -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी






पदवीधर मतदार संघासाठी नाव नोंदणी करा
    -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली, दि.१ : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार केल्या जात असून पदवीधरांनी आपली नाव नोंदणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले. 
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजीत बैठकीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजु नंदकर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर-2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पदवीधरांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आज येथे सांगितले. 1 नोव्हेंबर, 2019 ची अर्हता म्हणजे ज्या पदवीधरांची पदवी ही 1 नोव्हेंबर, 2016 पुर्वी प्राप्त झाली आहे. त्यांना नोंदणी करता येणार आहे. 
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी पुढे म्हणाले की, जिह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील सर्व पदवीधर कर्मचाऱ्यांचे नमुना-18  क्रमांकाच्या अर्जात संबंधीत कर्मचाऱ्यांकडून माहिती भरुन घेवून तहसिलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावयाचे असून याबाबत सर्वस्वी जबाबदारी ही कार्यालय प्रमुखांची असणार आहे. पुर्वी मतदार असलेल्या मतदारांनीही नव्याने नोंदणी करायची आहे, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले. 
महाविद्यालयीन पदवीधर विद्यार्थी तसेच पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनी पदवीधर मतदारसंघात नोंदणी करण्याचे आवाहन करावे. तसेच  शहरी भागात पदवीधर मतदार संख्या जास्त असून त्यांना पदवीधर मतदार यादीत समावेशीत होण्यास येणारी समस्या जाणून घेवून त्याचे निरसन करत त्यांना 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या यादीत समावेशीत होण्याचे आवाहन करण्यात यावे. प्रास्ताविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नंदकर यांनी सर्व विभागप्रमुखांना पदनिर्देशित अधिकारी नेमण्यात आल्याचे सांगून नमुना-18 भरण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  ०१ ऑक्टोबर, 2019 पासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी 1 ऑक्टोबर, 2019 ते 6 नोव्हेंबर, 2019 या कालावधीत पात्र पदवी अर्हता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना-१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर-२०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पदवी पात्र अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणाऱ्या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना-१८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे. 
                                                                  *****


No comments: