04 November, 2019

नवीन उद्योग/सेवा उद्योग उभारण्यासाठी युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन


नवीन उद्योग/सेवा उद्योग उभारण्यासाठी
युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.4: राज्यातील युवक-युवतींना नवीन उद्योग सेवा उद्योग उभा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत  प्रक्रीया व निर्मिती प्रकल्पासाठी कमाल रुपये 50 लाख व सेवा उद्योग प्रवर्गातील प्रकल्पासाठी कमाल रुपये 10 लाखाची मर्यादा केली आहे.
या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वगुंतवणूक 10 टक्के व एस.सी., एस.टी. महिलांसाठी 5 टक्के असे राहील. तसेच उर्वरित बँकेचे कर्ज असेल. मंजूर प्रकल्प किंमतीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी 15 ते 25 टक्के अनुदान तसेच एस.सी., एस.टी. महिलांसाठी 25 ते 35 टक्के अनुदान देय आहे. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा वय 18 ते 45 व एस.सी., एस.टी. महिलांसाठी 5 वर्षाची अट शिथिल राहील. रुपये 10 लाखांवरील प्रकल्पासाठी  किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व 25 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे. सदरील योजना पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील  इच्छूक युवक-युवतींनी  https://maha-cmegp.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावा. सदर अर्जासोबत टी.सी., आधार कार्ड , प्रोजेक्ट रिपोर्ट, जातीचा दाखला, अंडरटेकींग फॉर्म अपलोड करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, हिंगोली  यांनी केले  आहे.

****


No comments: