28 November, 2019

विविध शासकीय क्रीडा स्पर्धा योजना



विविध शासकीय क्रीडा स्पर्धा योजना
शारीरिक शिक्षण व खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे असलेले क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी लाभत असते. खेळविषयक प्रशिक्षणात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता वाढते. ही शारीरिक सुदृढता त्यांना भावी जीवनात क्रियाशील राहून रचनात्मक कार्य करण्यास लाभदायी ठरते. खेळामुळे त्यांच्या सांघिक भावना, खेळाडूवृत्ती, आव्हानास सामोरे जाण्याची शक्ती वाढते. याहीपेक्षा खेळाद्वारे विद्यार्थी धर्मभेद, वंशभेद व जातीभेद विसरुन संघटित होवून राहण्यास शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. खेळाद्वारे राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवण्यास महत्वपूर्ण योगदान लाभते. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, युवती, खेळाडू, क्रीडासंस्था व शैक्षणिक संस्था यांना विविध क्रीडाविषयक माहिती, योजना या विषयीची माहिती मिळावी, यादृष्टीने माहितीचा ऊहापोह करणारा लेख…
शासनाच्या नवीन क्रीडा व युवा धोरणामुळे क्रीडा क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे खेळाडू व युवकांमध्ये आमुलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. विभागाच्या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल, तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल, खुल्या जीमची सुविधा उभारण्यात येत आहे. तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडा सुविधा अनुदान योजना, युवक कल्याण अनुदान योजनेच्या माध्यमाने स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे, क्रीडा मंडळे, महिला मंडळे यांना क्रीडा विकासासाठी व युवा विकासासाठी आर्थिक सहाय्यक दिले जाते. त्यामुळे खेळाडूंना खेळांच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थी, खेळाडूंनी व युवकांनी घ्यावा.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान तीन खेळात सहभाग घ्यावा. शासनाच्या वतीने खेळाडूंसाठी व युवक-युवतींसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण, 11 वी प्रवेशासाठी 3 टक्के आरक्षण, शासन सेवेत नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण, शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येतात. युवकांकरिता युवक युवती प्रशिक्षण शिबीर, स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबीर, युवा महोत्सव, युवा दिन, युवा सप्ताह, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सायकल शर्यत, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे आयोजन शासनातर्फे करण्यात येते.
शालेय, महानगरपालिका स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे असते.
  • शाळेची एकूण पटसंख्या 500 पेक्षा कमी- 250 रूपये
  • शाळेची एकूण पटसंख्या 500 पेक्षा जास्त- 350 रूपये
प्रवेश फी खालीलप्रमाणे असते.
सांघिक खेळ प्रति खेळ (वयोगटनिहाय वेगवेगळे)- 50 रूपये (मुले व मुली स्वतंत्र)

वैयक्तिक खेळ (प्रति खेळ बाब)- 25 रूपये (मुले व मुली स्वतंत्र)

खेळनिहाय क्रीडा प्रकार
मैदानी खेळ

रोप स्किपिंग, फुटबॉल, टेनिस, पिकलबॉल, फील्ड आर्चरी, रस्सीखेच, जम्परोप, कयाकिंग व केनोइंग, वुशू, कराटे, किक बॉक्सिंग, कबड्डी, धनुर्विद्या,गोळा फेक, थाळी फेक, हातोडा फेक, भाला फेक, 100 मी., 200 मी. 400 मी. 600 मी. धावणे, 80 मी. हर्डल, उंच उडी, लांब उडी, 800, 1500, 3000, 5000 मीटर धावणे, 100 मी.हर्डल, तिहेरी उडी, बांबू उडी, 3000, 5000 मी. चालणे, 110 मी.हर्डल, 400 मी. हर्डल, 4X100 मी. रिले, 4X400 मी.रिले, 5 कि.मी. क्रॉसकंट्री, 3 कि.मी. क्रॉसकंट्री.

जलतरण

50, 100, 200, 400 मी. फ्रीस्टाईल, 50, 100, 200 मी. बॅकस्ट्रोक, 50, 100 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 50,100, 200 मी. बटरफ्लाय, 200 मी. इंडि.मिडले, हायबोर्ड, हायबोर्ड 1 मी., स्प्रींगबोर्ड 3 मी., 4X100 मी.फ्री रिले, 4X100 मी. मिडले रिले, 800 मी. फ्री स्टाईल, 400 मी.इंडी.मिडले, स्पिंगबोर्ड 1 मी., 1500 मी. फ्रीस्टाईल.

इतर
सिकई मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, कुस्ती, स्केटींग, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, रायफल शुटींग, पॉवर लिफ्टिंग, चायक्वांदो (फक्त डिफेन्स ड्रील), तलवारबाजी, जित कुने डो, थांग ता मार्शल आर्ट, योगासन, सीलम्बन, बॉक्सिंग, सायकलिंग.

युवा महोत्सव
केंद्र शासनाच्या वतीने 1994 पासून 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी युवा महोत्सवाचे जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर आयोजन केले जाते. जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करण्यात येते. या युवा महोत्सवात माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, युवक मंडळे, महिला, सांस्कृतिक मंडळ तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येते. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (हिंदी-इंग्रजी), शास्त्रीय गायन हिंदुस्थानी शैली, कर्नाटकी शैली, शास्त्रीय वाद्यवादन सोलो तबला, सितार, बासरी, वीणा, मृदंग, गिटार, हार्मोनियम लाईट, शास्त्रीय नृत्य, (मणिपुरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी), स्वयंस्फूर्त वक्तृत्व (हिंदी-इंग्रजी) या कार्यक्रमांची निवड करण्यात येते.

या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका, जन्मतारीख, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक असते. प्रवेशिकेसोबत वास्तव्याचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. सर्व कला प्रकारातील कलाकारांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000000
                                                        -अरुण सुर्यवंशी
                                                                  जिल्हा माहिती अधिकारी
                                                हिंगोली

1 comment:

Dnyaneshwar Honmane said...

Dhangar samajasathi dindayal swayam yojana ya baddal mahiti pahije