26 June, 2020

कोरोना:मधुमेही, रक्तदाब, ह्दयविकार आदी व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी नोंदणी करावी-- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

कोरोना:मधुमेही, रक्तदाब, ह्दयविकार आदी व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी नोंदणी करावी

-- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन

·   आरोग्याची विशेष काळजी घेत संसर्गापासून वाचण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

 

हिंगोली,दि.26: कोरोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत आहे, या पार्श्वभूमीवर मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, कर्करोग, दमा, किडनी विकार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. अशा व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वसाधारणपणे इतरांच्या तुलनेत कमी असते. अशा व्यक्तींनी आपली विशेष खबरदारी घेवून आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाला अशा रुग्णांची विशेष काळजी घेवून त्यांना वेळेत उपचार देण्याकरीता वरीलप्रमाणे व्याधी असणाऱ्या रुग्णांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्याने कोणत्याही वयातील व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होवू शकतो. सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा वाढता प्रादूर्भाव व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या पाहता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यात महत्वाचे म्हणजे, मधुमेहीं, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, दमा, कर्करोग, किडनी विकार रुग्णांनी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण अशा व्यक्तींची  रोग प्रतिकार शक्ती ही सर्वसामान्यांच्या तुलनेने कमी झालेली असते आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या आरोग्याबाबत अधिक समस्या उद्भवू शकते. तसेच गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी ही आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच श्वास घ्यायचा त्रास जाणवत असेल किंवा सर्दी-ताप व खोकला अधिक काळ असल्यास त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तसेच मधुमेहीं, रक्तदाब, ह्दयविकार, क्षयरोग, दमा, कर्करोग, किडनी विकार असलेल्या व्यक्तींनी आपल्या नजीकच्या हिंगोली तालुक्यातील सिरसम, नरसी, हाळेगाव, भांडेगाव, सेनगाव तालूक्यातील कवठा, गोरेगाव, साखरा, कापडसिंगी, औंढा तालूक्यातील शिरड शहापूर, जवळाबाजार, लोहारा, पिंपळदरी, वसमत तालूक्यातील हट्टा, हयातनगर, टेंभूर्णी, पांगराशिंदे, कुरुंदा, गिरगांव आणि कळमनुरी तालूक्यातील डोंगरकडा, रामेश्वर तांडा, पोतरा, वाकोडी, आखाडा बाळापूर, मसोड येथील  प्राथमिक आरोग्य केंद्र, तर सेनगांव, औंढा नागनाथ, आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालय, कळमनुरी किंवा वसमत येथील उप जिल्हा रुग्णालय आणि हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात आपली नोंदणी करावी असेही आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

तसेच सद्य:परिस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव सर्वत्र वाढत असून यापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आजारी व्यक्तींच्या संपर्कात राहणे टाळावे आणि स्वच्छ राहण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येत आहे. परंतू जिल्ह्यात अनेक ठिकाणी याबाबत विशेष काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. नागरिक बाहेर किंवा बाजारात फिरते वेळी, गरजूंना नागरिक, लोकप्रतिनीधी, सामाजिक संस्था मदत किंवा वितरण करते वेळी मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या करीता जिल्हा प्रशासनामार्फत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दोन  हजार रुपयांची दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे अन्यथा त्यांचे भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

*****


No comments: