12 October, 2020

अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागा…!

 

अस्वच्छतेच्या मागे हात धुवून लागा…!

 

            हिंगोली, दि.12: माणूस आणि इतर प्राण्यात दोन गोष्टींत महत्वाचे फरक आहे. तो म्हणजे माणसाचा मेंदू हा प्राण्यापेक्षा अतिविकसीत आहे आणि माणसाला हात आहेत. या दोन गोष्टींमुळे माणूस निसर्गातील सर्वात श्रेष्ठ बनण्याचा सतत प्रयत्न करत असतो. अगदी हिंस्त्र व माणसापेक्षाही शक्तीमान प्राण्यावर मात करण्याची तयारी माणसाची असते ती याच दोन गोष्टींमुळे. पण याच दोन गोष्टी माणसासाठी घातकही आहेत. मेंदू आणि हात ही ! त्या एवढ्या घातक आहेत की याच विशेषतेमुळे हिंस्त्र किंवा अवाढव्य दिसणाऱ्या प्राण्यावर मात करणारा माणूस नजरेने न दिसणाऱ्या अतिसुक्ष्म विषाणू, जिवाणू व जंतुंना अगदी सहज बळी पडतो.

            कोरोना या अतिसुक्ष्म विषाणूने संपूर्ण जगाला एकाच वेळी हादरा दिला. हा विषाणू वाऱ्यासारखा पसरला असला तरी तो वाऱ्याने पसरत नाही किंवा कोणा प्राण्यामार्फत पसरत नाही. तो पसरतो केवळ माणसामुळेच ! तो ही माणसाच्या ज्या दोन शक्ती आहेत त्या शक्तीमुळेच ! माणसाच्या ज्या सवयी आहेत त्यांचे नियंत्रण मेंदूमध्ये असते. नकळत तो त्या सवयीप्रमाणे वागून जातो. त्याने मनात आणल तर त्यात बदल घडवू शकतो. स्वच्छ राहण प्रत्येकाला आवडत आणि प्रत्येकाची स्वच्छतेची स्वत:ची अशी व्याख्या असते. त्यामुळे कुणी स्वच्छतेबद्दल सांगू लागल की वाईट वाटत. आम्ही काय अस्वच्छ आहोत का ? अस बोलल जातं. परंतु कोरोनाने आता सर्वांनाच दाखवून दिल आहे की,  काही तरी चुकत आहे !  माणसाला अजून बरंच काही शिकायचं आहे !’

            कोरोनापासून रक्षण व्हावे म्हणून मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये कमीत-कमी 2 मिटर अंतर ठेवणे या नवीन गोष्टी कराव्या लागत आहेत. परंतु हात साबणाने वारंवार स्वच्छ करणे, अस्वच्छ हाताने डोळ्याला, नाकाला व तोंडाला स्पर्श करु नये हे काही सांगण्याची गरज पडायला नको होती. हे तर शालेय  शिक्षणापासूनच सांगितले जाते की, हात-पाय  धुवून जेवायला बसा !’ तरीही हे सांगायची वेळ आलीय याचाच अर्थ असा की माणसाने त्यांच्या मेंदुला हात स्वच्छ ठेवण्याचे शिकवलेच नाही. आपल्याला हे जाणून दु:खच वाटलं पाहिजे की भारतासारख्या देशात 0 ते 5 वर्ष वयोगटातील दररोज 1000 बालकं डायरियासारख्या आजाराने दगावतात. असंही संशोधनात समोर आलं आहे की केवळ साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतल्यामुळे डायरियापासून 48 टक्के तर श्वसनाशी संबंधित 20 टक्के आजारापासून बचाव होवू शकतो. हात म्हणजे काय हे ही माहिती व्हायच्या अगोदर दुसऱ्या कुणातरी जाणत्याच्या हातामुळे बालकांचा घात होतो, हे अत्यंत गंभीर आहे.

            हात धुण्याबाबत आपण एवढे निष्काळजी झालोय की कोरोना येईपर्यंत आपण त्याला जास्त गंभीर घेतलच नव्हत. यापूर्वी Ebola, Shigellosis, SARS व Hepatitis E या आजारावेळी ही हात धुणे ही अत्यंत महत्वाची सवय मानली गेली होती. मात्र त्याला तेवढ गांभीर्याने घेतल नव्हत. एक अभ्यास अस सांगतो की नियमीत हात धुण्याच्या सवयीमुळे कोरोनापासून होणाऱ्या कोव्हीड-19 या आजारापासून 36 टक्के रक्षण होवू शकते मात्र आताही अनेक महाभाग असे आहेत की, ते कधी-मधी लोक लाजेस्तव हात धुतात !

           

 

 

 

 

 

 

 

पान क्र.2

भारताचा विचार केला तर 97 टक्के निवाससंस्थांमध्ये हात धुण्यासाठी व्यवस्था असते परंतु केवळ 60 टक्के कुटूंबाकडेच हात धुण्यासाठी पाणी आणि साबण उपलब्ध आहे. (NFHS 4 (2015-16)), तर केवळ 36 टक्के लोकच जेवणापूर्वी साबण व पाण्याने हात धुतात. 74 टक्के लोक शौचाला जावून आल्यानंतर हात धुतात. (76th round NSSO (2018) तर केवळ 50 टक्के महिला स्वयंपाकापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, जेवण वाढताना साबण व पाण्याने हात धुतात. (Spotlight on handwashing in rural India, WaterAid (2017). कोरोनाच्या काळात यात बदल निश्चीत झाला आहे. Migration & COVID Brief, Population Council (2020) यांनी 1237 प्रवाशी कामगारांच्या कुटूंबाचा सर्वे केला तर त्यातील 75 लोकं वारंवार हात धुताना आढळून आले. याचाच अर्थ असा की कोरोना आला नसता तर हात धुण्याला तेवढस गांभिर्याने घेतल गेल नसत.

            हात हे असे अंग आहे की त्याच्या माध्यमातून आपण कोणत्याही रोगराईला निमंत्रण देवू शकतो. जर रोगराईला टाळायचं असेल तर मग हाताची स्वच्छता हवीच. आपल्या हातावर असंख्य अतिसुक्ष्म जंतु असतात पण ते डोळ्याने दिसत नाहीत, त्यामुळे आपली फसगत होते.  मात्र कोरोनाने आता सर्वांचे डोळे उघडले आहेत. स्वयंपाक करण्यापूर्वी, वाढण्यापूर्वी, जेवणापूर्वी, पाणी हाताळण्यापूर्वी, मास्क लावण्यापूर्वी, नाकाला, डोळ्याला व तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी, शौचाला जावून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर, ‍शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर, कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे, तसेच वारंवार मास्कला हात लावू नये,  इकडे तिकडे अनावश्यक स्पर्श न करणे, हस्तांदोलन न करणे या गोष्टी ही पाळणे आवश्यकच आहे.

            सन 2008 पासून 15 ऑक्टोबर हा ‘जागतीक हात धुणे दिवस’ (Global Hand washing day) म्हणुन जगभर साजरा केला जातो. उद्देश हाच आहे की माणसांचे हातावरील असंख्य जीवघेण्या विषाणू, जीवाणू व जंतुंपासून रक्षण व्हावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी. आज याला 12 वर्षे झाली तरी ही कोरोना येईपर्यंत माणूस खडबडून जागा झाला नव्हता. यावर्षीची ‘Hand Hygiene for All’ अशी थीम असुन प्रत्येकाने या रोगराईच्या विरोधात केवळ पाण्याने नाही तर साबणाने हात धुवून अस्वच्छतेच्या मागे लागुन आपले आणि इतरांच्या आरोग्याचे संरक्षण करायचे आहे. 

00000

                                                                                                                  --अरुण सुर्यवंशी,

                                                                                                                  जिल्हा माहिती अधिकारी

      जिल्हा माहिती कार्यालय

हिंगोली

 

No comments: