05 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघात 48 उमेदवारांचे अर्ज वैध • विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर हा पहिला तृतीयपंथी उमेदवार
हिंगोली (जिमाका), दि.05: हिंगोली लोकसभा मतदार संघात 55 उमेदवारांनी एकूण 78 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज शुक्रवारी (दि.05) छाननीअंती 55 उमेदवारांपैकी 7 जणांचे नामनिर्देशन अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरले आहेत. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात आजघडीला 48 उमेदवार वैध ठरले आहेत. येत्या सोमवारी (दि.08) उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असून, या दिवशी मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठीची अर्ज छाननीची प्रक्रिया आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह याकामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
हेमंत श्रीराम पाटील यांनी शपथ पत्र आणि पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या वसंत किसनराव पाईकराव यांच्या नामनिर्देशन अर्जासोबत एबी फॉर्म व 10 प्रस्तावक नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. धनेश्वर गुरु आनंद भारती यांचा एक अर्ज अवैध ठरला आहे. शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष) यांचा एक तसेच शिवाजी नथू शिंदे (अपक्ष) यांनी शपथपत्र न जोडल्यामुळे एक अर्ज अवैध ठरला. विजय माणिका बलखंडे यांनी बहुजन समाज पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्यामुळे व दुसऱ्या अर्जासोबत 10 प्रस्तावक नसल्यामुळे त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले आहेत. शंकर सिडाम यांच्या फॉर्मसोबत भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचा एबी फॉर्म न जोडल्यामुळे आणि 10 प्रस्तावक नसल्यामुळे अवैध ठरला आहे. गजानन काळबा घोंगडे (अपक्ष) यांच्या अर्जासोबत शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत न जोडल्यामुळे अर्ज अवैध ठरला आहे. उत्तम मारोती धाबे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. तर श्रीमती सरोज नंदकिशोर देशमुख यांचाही अर्ज अवैध ठरला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराने अपक्ष म्हणून नामनिर्देशन अर्ज दाखल केला असून, त्यांचा हा अर्ज आज झालेल्या छाननीअंती वैध ठरला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली होती. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 55 उमेदवारांनी 78 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांचे 11 अर्ज आज छाननीअंती अवैध ठरले आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment