05 April, 2024
निवडणूक निरीक्षकांकडून खर्च पथक प्रमुखांचा आढावा
निवडणूक कालावधीत खर्चाची अचूक नोंद ठेवा
- निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली
हिंगोली (जिमाका),दि. 05 : निवडणूक कालावधीत प्रत्येक उमदेवाराचा विधानसभा मतदारसंघ निहाय खर्चाची अचूक नोंद ठेवावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी दिल्या.
निवडणूक विषयी खर्चाचा आढावा घेण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक खर्च निरीक्षक श्री. अन्वर अली यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हास्तरीय खर्च समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिंगबर माडे, श्री. अन्वर अली यांचे संपर्क अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, माध्यम व प्रमाणिकरण सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, वसमत, कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघाचे खर्च पथक प्रमुख, आयकर व व्यवसाय कर विभागाचे प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री. अन्वर अली म्हणाले, सर्व नोंदवही व अभिलेखे अद्ययावत ठेवावेत. विनापरवानगी बैठक, सभा घेत असतील तर त्यावर लक्ष ठेवून त्याचे चित्रीकरण करावे व खर्चाचा हिशोब ठेवून त्याचा अहवाल सादर करावा. व्हीएसटी, व्हीव्हीटी, एसएसटी पथकांनी निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्चाची अचूक नोंद ठेवण्याचे काम करावेत. सर्व उमेदवारांचे लोकसभा निवडणुकीच्या खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडल्याची खात्री करावी. या बँक खात्याद्वारेच सर्व व्यवहार होत असल्याची खात्री करावी. उमेदवार व त्यांचे स्टार प्रचारक यांची सभा होत असल्यास त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करावे. त्या सभेचा खर्चाचा हिशोब अभिरुप नोंदवहीमध्ये नोंदवावा. याबाबत काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
निवडणूक आयोगाकडून निर्धारित करण्यात आलेले वृतपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मिडियावर येणाऱ्या जाहिराती, पेड न्यूजवर बारकाईने लक्ष ठेवून त्याची उमेदवारनिहाय दैनंदिन माहिती जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण समितीने अहवाल सादर करावा. येत्या 9 एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या बैठकीसाठी पोलीस विभागाचे निवडणूक निरीक्षकांनाही बोलाविण्यात येणार आहे. या बैठकीतही सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडूया, असेही श्री. अन्वर अली यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे यांनी दैनंदिन हिशेबाची नोंदवही दररोज भरा. खर्च निरंक असला तरीही त्यांची नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी, रोख रकमेबाबतही तशाच प्रकारचा अहवाल नोंदवहीत ठेवावा. उमेदवाराने नामनिर्देशन पत्रामध्ये निवडणूक खर्चासाठी नवे बँक खाते अनिवार्य असून, त्याच्या खर्चाचा, ताळमेळाचा पूर्ण तपशील या वहीमध्ये नोंदवून ती अद्ययावत ठेवावी. नोंदणीकृत, मान्यताप्राप्त राजकीय पक्ष 40 स्टार प्रचारक ठेवू शकतात. त्यांच्यावर केला जाणाऱ्या खर्चाचा हिशेब अचूक नोंदवावा अशी माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
तसेच जिल्हा खर्च नियंत्रण समितीचे दिगंबर माडे यांनीही प्रत्येक उमेदवाराचा एकूण एक खर्च अभिरुप नोंदवहीत नोंदवा. स्टार प्रचारकाचा खर्च उमेदवाराच्या खात्यात नोंदवा. याकडे प्रत्येक खर्च पथक प्रमुख किंवा अधिकारी, सहायकाने बारकाईने लक्ष ठेवावे. निवडणूक विभागाकडून अधिकृत माहिती मिळताच सर्वांना कळविले जाईल, असे सांगितले.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment