20 September, 2024

हिंगोली जिल्ह्यातील सहा आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ

हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्यातील एक हजार महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वर्धा येथून ऑनलाईन पध्दतीने झाला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांतील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा समावेश आहे. आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्राची कार्यक्रम आयोजित करून सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिनकरराव माने, दिलीप मस्के उपस्थित होते. तर जुनियर कॉलेज ऑफ एन्ट्रॉस ऑफ सायन्स ॲन्ड आर्ट्स येथे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, आशिष वाजपेई, राहूल मेने यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील हिंगोली येथील संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, जुनियर कॉलेज ऑफ एन्ट्रॉस ऑफ सायन्स ॲन्ड आर्ट्स, वसमत येथील श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब पतंगे आर्ट्स कॉलेज, कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथील सरस्वती इन्टेलेट्यूट ऑफ फार्मसी, कळमनुरी येथील कै. देवरावजी कल्याणकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या सहा महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे उपस्थित होते. ******

सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजनेच्या लाभार्थ्यांची 24 सप्टेंबर रोजी होणार लॉटरी पध्दतीने निवड

• निवड प्रक्रियेस लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 20 : येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना (एनएसएफडीसी) 5 लाख व महिला समृध्दी (एमएसवाय) 1.40 लाख या योजनेचे कर्ज मागणीचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड दि. 24 सप्टेंबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजता निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठीद्वारे लॉटरी पध्दतीने होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील वरील योजनेच्या अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी या निवड प्रक्रियेस स्वखर्चाने उपस्थित राहावेत. पात्र अर्जदारांची यादी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातील सूचना फलकावर लावण्यात आली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) हिंगोली यांनी केले आहे. *******

ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बाल विवाह निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवावेत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• जिल्हा संरक्षण कक्षाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा हिंगोली, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करावी किंवा असलेल्या समितीचे पुन:र्गठन करावेत. तसेच ग्राम बाल संरक्षण समितीची दरमहा बैठक घ्यावी. तसेच बालविवाह निर्मूलनासाठी निवडण्यात आलेल्या 50 गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी महिला व बालविकास आणि पंचायत विभागाला दिल्या. बालविवाह निर्मूलन कृती दलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, पोलीस निरीक्षक शालिनी नाईक, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. आर. हापगुंडे, युनिसेफ एसबी-3 चे नंदू जाधव, मोनाली धुर्वे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा संरक्षण अधिकारी माया सूर्यवंशी, परीविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल न्याय मंडळ सदस्य वर्षा कुरील, बाल न्याय मंडळाचे प्रतिनिधी अशोक खुपसे, उज्वल पाईकराव धनेंद्र कांबळे, संदीप कोल्हे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील निवडक 125 शाळेत बालविवाह निर्मूलनासाठी घेण्यात येत असलेल्या विद्यार्थी सक्षमीकरण व पालक जागरुकता सत्रास केंद्रप्रमुख, गट शिक्षणाधिकारी यांनी भेटी द्याव्यात. सक्षम युवा शक्ती कार्यक्रमासाठी निवड केलेल्या 50 गावात ग्राम बाल संरक्षण समिती सक्षम करून कार्यान्वित करण्यात यावी. तसेच या 50 गावासाठी एकात्मिक बालविकास विभाग, शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग यांनी एकत्रित सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करावा. महिनानिहाय विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे. ग्राम बाल संरक्षण समितीकडून याची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन घ्यावी. ही 50 गावे तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांना दत्तक द्यावी. तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे बालविवाह निर्मूलन कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण आयोजित करावे. स्थलांतरित कामगारांसाठी गावात रोजगार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अति जोखिम कुटुंबातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणातून युवा प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती द्यावी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने या 50 गावात जनजागृती करण्यात यावी. शाळेत जाण्यासाठी मुलींना वाहनाची सुविधा उपलब्ध नसलेल्या गावांची माहिती घेऊन त्या ठिकाणी मानव विकास मिशन बस सुरु करण्यासाठी काम करावे, असे निर्देशही श्री. गोयल यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी बाल संरक्षण कक्षाने राबविलेले विविध उपक्रम, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, मिशन वात्सल्य, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व योजनाचा लाभ, बालसंगोपन योजना, चाईल्ड हेल्पलाईन, वन स्टॉप सेंटरच्या कामकाज आदी विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. ******

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त पथक प्रमुखांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• निवडणूक पथक प्रमुखांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा हिंगोली, दि.20(जिमाका) : जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथक प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघाचे सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणेचे अधिकारी यांच्यासह सर्व पथक प्रमुख, सहायक पथक प्रमुखांची‌ यावेळी उपस्थिती होती. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक पथकाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी समजून घेऊन ती काळजीपूर्वक पार पाडावी. निवडणूकविषयक कामाला प्राधान्य देत आपल्या पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापासूनच आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी, असे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी पथके नेमण्यासाठी दूरसंचार नेटवर्कचा विचार करुन ठिकाणे निश्चित करताना ती योग्य जागेवर निवडावीत. कारण त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी संवाद साधणे सोयीचे होईल, असे सांगितले. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनीही विधानसभेच्या आदर्श आचारसंहिता पालनाबाबत सूचना केल्या. नियुक्त सर्व पथक प्रमुखांनी नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडताना अतिशय दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सर्व पथक प्रमुख अधिकारी यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक पथक प्रमुख अधिकारी यांनी आपल्याला आवश्यक मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. *****

19 September, 2024

नुकसानग्रस्त खरीप पिकांच्या विमा दाव्याची पुर्वसूचना दाखल क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे विमा कंपनीला आदेश

हिंगोली (जिमाका), दि. 19 : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2024 राबविण्यासाठी शासनाने दि. 26 जून, 2023 अन्वये मान्यता दिली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 4 लाख 72 हजार 15 शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी अतिवृष्टी झाल्यानंतर 4 लाख 54 हजार 71 शेतकऱ्यांनी विमा दाव्याची पूर्वसूचना कंपनीकडे दाखल केल्याचे कंपनीने कळविले आहे. केंद्र शासनाच्या दि. 17 ऑगस्ट, 2020 च्या मार्गदर्शक सूचनेतील तरतुदीप्रमाणे जिल्ह्यातील तूर, कापूस इत्यादी सर्व पिकामधील दिलेल्या पूर्वसुचनांचे 30 टक्के सॅम्पल सर्वे करुन झालेल्या नुकसानीच्या व क्षेत्राच्या प्रमाणात मदत देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत. या सर्वेक्षणासाठी क्षेत्रीय स्तरावर संबंधित कृषि सहाय्यक, विमा प्रतिनिधी व शेतकरी यांची उपसमिती नेमली असून त्यांच्या कामाचे सनियंत्रण संबंधित मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व तालुकास्तरीय विमा प्रतिनिधी यांनी करावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले आहेत. ******

18 September, 2024

दिव्यांगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 18 : लहान मुलांमध्ये असलेल्या दिव्यंगत्वाचा शोध घेऊन त्याच्यावर वेळेत उपचार केल्यास 90 टक्के मुले यातून दुरुस्त होऊ शकतात. याचे योग्य नियोजन केल्यास आगामी काळात आपला जिल्हा दिव्यांगमुक्त होण्यास मदत होणार आहे. यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत देशातील 75 आकांक्षित जिल्ह्यात एडिप योजनेतून दिव्यांगाना विविध साहित्याचे मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. विरेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्वांना ऑनालाईन मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, भारतीय कृति अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपूरचे किरण पावरा, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनीष बगडीया, मधुकर राऊत, लक्ष्मण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. गोयल म्हणाले, अपंग अधिनियमान्वये 21 प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. अपंगत्वाचे प्रामुख्याने दोन भागात वर्गीकरण करावे. यामध्ये पहिल्या भागात ओळखलेले किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांगाना उपकरण उपलब्ध करुन देऊन सक्षम करणे तर दुसऱ्या भागामध्ये दिव्यांगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी शोध मोहिम राबविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य केंद्र तसेच विविध स्वयंसेवी संघटना यांनीही जिल्हा प्रशासनास दिव्यांगमुक्त हिंगोली जिल्हा करण्यास मदत करावी. शासनाने दिव्यांगासाठी 5 टक्के निधी राखून ठेवला आहे. तसेच त्यांना विशिष्ट ओळख म्हणून युडीआयडी कार्डाचेही वितरण करण्यात आले आहे, त्यामुळे या क्षेत्रात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी केले. यावेळी प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी जिल्ह्यात 1069 दिव्यांगांना विविध उपकरण साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींवर विविध उपचार, तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी वंचित दिव्यांगांना याबाबत आपण सर्वांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख मान्यवराच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील 111 दिव्यांगांना तीन चाकी, सायकल, बॅटरी ऑपरेटेड सायकल, कानाची मशीन, अंधाची सेंसर काठी, कुबडी, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव, चष्मे इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील लाभार्थ्यांना पुढील कालावधीत तालुकास्तरावर साहित्य वाटप शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. या कार्यक्रमास दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

जिल्हा प्रशासनाकडून ‘ई-पीक पाहणी’साठी अधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

• गावातील युवकांची मदत घेण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश हिंगोली (जिमाका),दि.18 : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीने शेती आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या शेती आणि पिकांच्या नुकसानीचे सर्व्हे करण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत. या विशेष मोहिमेत कमीत कमी वेळेत ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गावातील शिक्षित युवकांची मदत घ्यावी. या युवकांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी कळमनुरी तालुक्यातील शिवनी खुर्द तर वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी तालुक्यातील गिरगाव येथे या विशेष मोहिमेमध्ये शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची प्रात्यक्षिके करून दाखवत मार्गदर्शन केले. सप्टेंबरच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यामुळे हिंगोलीसह ग्रामीण भागात नदी-नाल्यांच्या काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतकरी-शेतमजूर पुराच्या पाण्यामुळे शेती-आखाड्यावर अडकून पडले होते. वेळीच जिल्हा प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत मिळाल्यामुळे त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या अतिवृष्टीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि त्यानंतर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी पुरबाधित गावांचा दौरा करून बाधितांना धीर देत पंचनामे पूर्ण होताच शासनाकडून तात्काळ मदत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे सांगितले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी चमूसह ‘ई-पीक पाहणी’ करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्याचे दिसून येत आहे. यावेळी गिरगावच्या मंडळ अधिकारी प्रियंका खडसे, वसमतचे राजु क्षीरसागर, तलाठी वंदना म्हस्के, पालीस पाटील श्री. शिवनकर, सरपंच श्रीमती पी. पी. नागरे यांच्यासह शेतकरी बांधवांची यावेळी उपस्थिती होती. *******

‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान’ बाबीअंतर्गत सोयाबीन पिक विम्यासाठी 25 टक्के अग्रीम

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याने संबंधित विमा धारकांना पिक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश सोमवारी पारित केले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे. तर तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात 50 टक्के पेक्षा जास्त घट दिसून आली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2023 ते रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविण्याबाबत दि. 26 जून, 2023 च्या शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल. उपरोक्त बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एचडीएफसी ईरगो कंपनी लि. यांना जिल्हास्तरीय संयुक्ती समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. ******

सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरतीसाठी संधी

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत 136 इन्फंट्री बटालियन (टीए)(इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यातून 53 पदे भरावयाची आहेत. यासाठी छत्रपती संभाजीनगर मिल्ट्री कॅम्प (सर्वत्र स्टेडियम) येथे दि. 23 ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीअंतर्गत उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर मिल्ट्री कॅम्प (सर्वत्र स्टेडियम) येथे दि. 23 ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत शारीरिक पात्रता तपासणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बटालियनमध्ये सोल्जर जीडी सामान्य कर्तव्य 42 पदे, लिपिक 6 पदे, घरकाम करणारी व्यक्ती 1 पद, लोहार 1 पद, मेस किपर कारागीर 1 पद, आर्टेशियन 1 पद, तसेच स्टीवार्ड 1 पद असे एकूण 53 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी माजी सैनिकांचा सेवानिवृत्त झाल्याचा कालावधी 5 वर्षाच्या आतील असावा. माजी सैनिक 50 वर्षापर्यंत सेवा करु शकतात. तसेच वैद्यकीय श्रेणी SHAPE-1 उमेदवार असावा. वजन 50 किलो, छाती माजी सैनिकासाठी 82 सें.मी. (किमान विस्तार 5 सें.मी.) असावा. माजी सैनिकांसाठी पीपीओ, डिस्चार्ज बूक, अलीकडील पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्राच्या 8 प्रती, शिक्षण प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, आधार व पॅन कार्ड आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्ती चाचणी केवळ पुरुषांसाठी : निर्धारित वेळेत 1.6 किमी धावणे, 8 ते 9 फूट खंदक (वयानुसार) उडी मारुन पार करण्यास सक्षम असावा. पूल अल्पस स्वत:ला पातळीपर्यंत खेचण्यास सक्षम असावा. झिगझॅग शिल्लक-उंच प्लॅटफॉर्मवर चालण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. मेळाव्याचे आयोजन करणारे अधिकारी भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना झालेल्या अपघात, दुखापतीस जबाबदार राहणार नाहीत. उमेदवारांसाठी 9168168136 हा संपर्क क्रमांक आहे. अधिक माहितीसाठी तसेच अटी व शर्तीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे संपर्क साधावा. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली यांनी कळविले आहे. *******

जिल्ह्यातील 6 महाविद्यालयात शुक्रवारी होणार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरु

• प्रधानममंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात ऑनलाईन प्रारंभ हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्यातील एक हजार महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 6 महाविद्यालयांना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये कौशल्याधारित प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे. ******

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये नियुक्तीसाठी रोजगार मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 18 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी आस्थापनांमध्ये त्यांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून 6 महिन्यासाठी नियुक्ती मिळणार आहे. त्यासाठी दि. 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात 2 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खाजगी आस्थापना व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून आयोजित रोजगार मेळाव्यात इच्छूक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ या योजनेद्वारे 6 महिने कालावधीसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यातील खाजगी (उद्योग, कंपनी, कृषी उद्योग, गोदाफार्म, व्यवसाय, खाजगी अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, विद्यालय, महाविद्यालय) या आस्थापनांमध्ये हे प्रशिक्षणार्थी काम करू शकणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि. 20 सप्टेंबर, 2024 रोजी वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, नर्सी नामदेव ता. हिंगोली व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, गोरेगाव ता. सेनगाव येथे रोजगार मेळावा होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथे 24 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत, येथे 25 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सेनगाव येथे होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आखाडा बाळापूर ता. कळमनुरी, येथे 30 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढा नागनाथ व वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, जवळा बाजार ता. औंढा नागनाथ येथे होणार आहे. दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी वायव्हीएस, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, कुरुंदा ता. वसमत येथे रोजगार मेळाव्याचे अयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांसाठी पात्रता : उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. महाराष्ट्राचा अधिवासी असावा. आधार नोंदणी, बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अद्ययावत नोंदणी केलेली असावी. बँक खात्याविषयीची कागदपत्रे अपलोड करावीत. या कार्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे 12 वी पास शैक्षणिक अर्हतेसाठी 6 हजार, आयटीआय व पदविका शैक्षणिक अर्हता असलेल्यांना 8 हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता असलेल्यांना 10 हजार याप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील 12 वी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर या शैक्षणिक अर्हतेनुसार सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in येथे नोंदणी करावी. आपले आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरील माहिती भरुन कागदपत्रे अपलोड करावीत व सदरील आस्थापनेस ऑनलाईन अर्ज करावा. तसेच आपल्याकडील कागदपत्रे सोबत घेऊन जवळच्या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखतीस उपस्थित रहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 99767213394, 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी केले आहे. *******

17 September, 2024

महिला लोकशाही दिनाचे आज आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे सप्टेंबर, 2024 च्या तिसऱ्या सोमवारी व 17 सप्टेंबर, 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे माहे सप्टेंबर, 2024 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन उद्या बुधवार,दिनांक 18 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

मोबाईल ॲपवर ई-पीक नोंदणीसाठी बुधवार, गुरुवारी विशेष मोहिम

हिंगोली (जिमाका), दि. 17 : खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी ई-पीक पाहणीला अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे येत्या बुधवारी व गुरुवारी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, शेतक-यांनी आपल्या पिकांची नोंदणी ई पिक अँपवर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यात सन 2024 मध्ये खरीप सर्व साधारण क्षेत्र 4 लाख 25 हजार 358 हेक्टर आर पैकी 2 लाख 14 हे.आर क्षेत्राची शेतकऱ्यांनी अँप डाऊनलोड करून नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी सुध्दा त्यांचा पीकपेरा ई-पीक पाहणी मोवाईल अँपव्दारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने दि. 18 व 19 सप्टेंबर, 2024 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यात 1 लाख 40 हजार 200 शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. त्याबाबतची सर्व जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली व उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली व उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यासाठी तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करून सदर मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. ******

दिव्यांगमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 17 : लहान मुलांमध्ये असलेल्या दिव्यंगत्वाचा शोध घेऊन त्याच्यावर वेळेत उपचार केल्यास 90 टक्के मुले यातून दुरुस्त होऊ शकतात. याचे योग्य नियोजन केल्यास आगामी काळात आपला जिल्हा दिव्यांग मुक्त होण्यास मदत होणार आहे. यामुळे या क्षेत्रात काम करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देशातील आकांक्षीत तालुके व इतर ठिकाणी असे 75 जिल्ह्यात अपंगांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे मंत्री डॉ. विरेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संबोधन केले. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, भारतीय कृति अंग निर्माण निगम (एलिम्को) कानपूरचे किरण पावरा, अस्थिरोग तज्ञ डॉ. मनीष बगडीया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. गोयल म्हणाले, अपंग अधिनियमान्वये 21 प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. अपंगत्वाचे प्रामुख्याने दोन भागात वर्गीकरण करावे. यामध्ये पहिल्या भागात ओळखलेले किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांगाना उपकरण उपलब्ध करुन देऊन सक्षम करणे तर दुसऱ्या भागामध्ये दिव्यांगमुक्त जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी शोध मोहिम राबविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व आरोग्य केंद्र तसेच विविध स्वयंसेवी संघटना यांनीही जिल्हा प्रशासनास दिव्यांगमुक्त हिंगोली जिल्हा करण्यास मदत करावी. शासनाने दिव्यांगासाठी 5 टक्के निधी राखून ठेवला आहे. तसेच त्यांना विशिष्ट ओळख म्हणून युडीआयडी कार्डाचेही वितरण करण्यात आले आहे, त्यामुळे या क्षेत्रात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी केले. यावेळी प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी जिल्ह्यात 1069 दिव्यांगांना विविध उपकरण साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींवर विविध उपचार, तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी वंचित दिव्यांगांना याबाबत आपण सर्वांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख मान्यवराच्या हस्ते जिल्ह्यातील दिव्यांगांना प्रातिनिधीक स्वरुपात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार केशव ठाकरे यांची जयंती साजरी

हिंगोली (जिमाका), दि. 17 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस., निमजे यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीही प्रबोधनकार केशव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. *****

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण

हिंगोली (जिमाका), दि. 17 : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाल, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. *****

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान अमूल्य - पालकमंत्री अब्दुल सत्तार

• अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच तातडीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल • महत्वपूर्ण योजनांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न • अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 45 हजार 920 पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख रुपये अनुदान स्वरुपात बचत खात्यामध्ये जमा हिंगोली (जिमाका), दि. 17 : स्वातंत्र्यानंतरही देशात तीन संस्थाने विलीन झाली नव्हती. काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद या संस्थानांनमुळे भारतीय संघराज्य पुर्णत्वास गेले नव्हते. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे आंदोलन सतत 13 महिने सुरु होते. या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अखेर 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कै. अण्णासाहेब टाकळगव्हाणकर उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी श्री. सत्तार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय श्रीमती रुक्मिणीबाई देवकते, श्रीमती मालती पैठणकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा 76 वा वर्धापन दिन आज मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. निजामाच्या हुकूमशाही विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाडा मुक्त केला. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. महाराष्ट्र शासन स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि जनतेच्या याच त्यागाबद्दल कृतज्ञ राहून कार्य करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुलींना शिक्षणात 50 ऐवजी 100 टक्के शुल्कमाफी योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना यांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 05 हजार 499 बहिणींची नावनोंदणी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 98 हजार 118 बहिणी पात्र ठरल्या आहेत. या योजनेतून हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 219 पात्र लाडक्या बहिणींना दोन महिन्याची रक्कम 44 कोटी 76 लाख 57 हजार रुपये डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आली आहे. तसेच उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यांचे 3 हजार रुपये जमा झाले असल्याने याचा मनस्वी आनंद होत असल्याचे सांगून लाडक्या बहिणींच्या नावनोंदणीला सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच युवक-युवतींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना 6 महिने शासकीय कार्यालयात कामाचा अनुभव आणि त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार किंवा 10 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 859 युवक-युवतींना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून 1 हजार 846 युवक-युवतींनी प्रत्यक्षात रुजू होऊन कार्य प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाल्याचा आनंद आहे. धार्मिक अधिष्ठान असलेल्या आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. देशातील विविध धार्मिक स्थळे ज्येष्ठ नागरिकांना याची देही याची डोळा पाहता यावीत, त्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली आहे. हे ज्येष्ठ नागरिक या योजनेत पात्र ठरावेत, प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने आरोग्य तपासणी शिबिरही घेतले. यामध्ये जिल्ह्यातील किमान 1 हजार लाभार्थ्यांना तीर्थदर्शनासाठी 30 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. राज्यातील एकही व्यक्ती सणसुदीला आणि एरव्हीही उपाशीपोटी झोपू नये, त्यासाठी आवश्यक असणारा आनंदाचा शिधा आणि मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेच्या माध्यमातून तो शिजवण्यासाठी त्या मायमाऊलीला वर्षात 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार इतक्या माता-भगीनी या योजनेच्या लाभार्थी असून, त्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला आणि मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतून सिलेंडर मिळत आहेत. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपयांपर्यंत साहित्य खरेदीसाठी त्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील किमान 20 हजार ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे, असल्याचे पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असून, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून 236 गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात 80 हजार शेतकऱ्यांपैकी 40 हजार शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून जवळपास 15 कोटी रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात लाभाचे वितरीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्ते बांधणीला प्राधान्य देण्यात आले असून, 2015-16 ते 2023-24 या सात वर्षांमध्ये 850 किमी लांबीचे 249 रस्ते मंजूर झाल आहेत. त्यापैकी आतापर्यंत 227 कामे पूर्ण झाली असून, 20 कामे प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला. याशिवाय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि मा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे ब्रँडींग आणि विपणन करण्यासाठी, उद्योग उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नुकतीच वसमत तालुक्यातील पार्डी बुद्रक येथील 40 हेक्टरवर औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना कृषी विज बिल भरण्याची गरज राहणार नसल्याचेही श्री. सत्तार यांनी यावेळी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 2 लाख 86 हजार 144 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तर 2 हजार 153 घराची अंशत: पडझड झाली आहे. याचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्यात असून आतापर्यंत 98 टक्के काम झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच या अतिवृष्टीमध्ये 2 व्यक्ती मयत झाले असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 213 पशुधनाचे मयत झाले असून त्यांनाही तालुकास्तरावर सानुग्रह अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिली. वित्तीय संस्थांकडून 3 लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या व या कर्जाची प्रति वर्षी दि. 30 जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक 3 टक्के दराने व्याज सवलत अनुज्ञेय आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये व्याज सवलत योजनेच्या 45 हजार 920 पात्र लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख रुपये अनुदान स्वरुपात त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. येथील जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागास मुस्कान कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावरचे मानांकन मिळाले आहे. ही अभिनंदनाची बाब आहे. जिल्हा रुग्णालयातील एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, सिमेंट रोड व शेड, हृदयरुग्ण असणाऱ्या लाभार्थ्यासाठी कार्डियाक कॅथेटेरायझेशन प्रयोगशाळा, सहा मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी दिली. अनुसूचित जाती उपयोजनेतून समाजातील दुर्बल, वंचित घटकाला समान न्याय व समान हक्क या भूमिकेतून त्यांना उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी शासनाने विशेष घटक योजना 1980 पासून सुरु केली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती उपयोजनेमध्ये 18 विविध विभागांमार्फत 59 योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरु करण्यात आली आहेत. त्यांच्यासाठी विविध शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेतून आतापर्यंत 84 जणांना लाभ दिला आहे. तसेच मिनी ट्रॅक्टर, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाही राबविण्यात येत असल्याची माहिती श्री. सत्तार यांनी यावेळी दिली. प्रारंभी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी श्री. सत्तार यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय रुक्मिनीबाई देवकते, मालतीबाई पैठणकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच श्री. सत्तार यांनी लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या लोकांना आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून मोलाची कामगिरी बजावणाऱ्या बाबाराव रामरावजी पडोळे यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 'स्वच्छता ही सेवा अभियाना'चा जिल्ह्यात प्रारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याचा जिल्हास्तरीय प्रारंभ आज राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबविण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. यावेळी पत्रकार, नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. **

14 September, 2024

मराठवाडा मुक्तीदिनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

हिंगोली(जिमाका), दि. १४ :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ८.४० वाजता हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नांदेड रोड देवडा नगर जवळील स्वातंत्र्य सैनिक कै. अण्णाराव टाकळगव्हाणकर नगर परिषद उद्यान येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभास हिंगोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल व त्यानंतर तेथेच सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वजवंदन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार आदीनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. ******

जिल्ह्यात ईद-ए-मिलाद सणाची १६ सप्टेंबरची सुटी कायम

हिंगोली(जिमाका), दि. १४ :- राज्यात ईद-ए-मिलाद सणानिमित्त सोमवार, दि.१६ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली सुटी कायम ठेवावी अथवा रद्द करावी व त्या बदल्यात दि.१८ रोजी सुटी जाहीर करावी किंवा कसे याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, अशी अधिसूचना शासनाने जारी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी दिनांक २२ सप्टेंबर, २०२४ रोजी व इतरत्र १८ सप्टेंबर रोजी किंवा वेगळ्या तारखेस सदरील सण साजरा केला जात असल्यामुळे जिल्ह्यात सोमवार दि.१६ सप्टेंबर रोजी असलेली सुटी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ******

13 September, 2024

कृषि सुवर्ण समृध्दी आठवडा निमित्त तोंडापूर कृषि विज्ञान केंद्रामध्ये 23 सप्टेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रात दि. 23 सप्टेंबर, 2024 रोजी कृषि सुवर्ण समृध्दी आठवडा साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते होणार असून या मेळाव्याला वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डॉ. इंद्रमणी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि वि‌द्यापीठाचे सचालक संशोधन डॉ. खिजर बेग, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. एन. जावळे, मिलेट मिशन नवी दिल्ली येथून श्री राकेश सिन्हा, मिलेट मॅन ऑफ आंध्र प्रदेश श्री वीर शेट्टी व भारतीय अन्न संशोधन संस्थान, हैदराबाद येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र चापके यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी प्रदर्शनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये भरड धान्याच्या बियाण्याची विक्री सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भरड धान्यापासून तयार होऊ शकणाऱ्या पदार्थाचे प्रदर्शन सुद्धा लावले जाणार आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून भरडधान्याचे महत्त्व मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करून सांगण्यात आलेले आहे. त्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण दशक हे भरड धान्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरे करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे. या कार्यक्रमास सर्व शेतकरी आणि शेती विषयक काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये हळद सोयाबीन आणि हरभरा या पिकांसोबतच रब्बी ज्वारीचा पेरा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे. ******

छत्रपती संभाजीनगर येथे 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : मराठवाडा पर्यावरण बटालियन, 136 इन्‌फंट्री बटालियन टीए इको, महार (एमओइएफ आणि सीसी) आणि महाराष्ट्र राज्य व विभागाच्या माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांच्या (अकाली निवृत्तीसह) भरतीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील मिल्ट्री कँट येथे दि. 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत माजी सैनिक आणि माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (समाविष्ट महिला) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 136 इन्फंट्री बटालियन टीए इको, महामध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवा करणारे सर्व पात्र उमेदवार दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. 23 सप्टेंबर, 2024 रोजी संभाजीनगर मिलट्री कैंट (सर्वत्र स्टेडियम) येथे 5.30 वाजता शारीरिक फिटनेस चाचणीसह भरती सुरु होणार आहे. संभाजीनगर मिलट्री कैंट (सर्वत्र स्टेडियम) येथे दि. 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, 2024 या कालावधीत सोल्जर जीडी, क्लार्क, हाऊस कीपर, ब्लॅकस्मिथ, मेस कीपर, आर्टीशियन (डब्ल्यूडब्ल्यू), स्टेवार्ड अशी एकूण 53 पदे भरण्यात येणार आहेत. सोल्जर जीडी या पदासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. तर उर्वरित सर्व पदासाठी संपूर्ण भारताचा रहिवाशांना सहभागी होता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांसाठी संपर्क क्रमांक 9168168136 हा आहे. तसेच या भरतीच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधता येईल. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी अटी व पात्रता पाहून भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******

महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या प्रलंबित पात्र लाभार्थ्यांनी 18 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 13 : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या ) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाआयटी यांनी दि. 12 ऑगस्ट ते दि. 7 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. अद्यापही 251 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक असल्यामुळे दि. 18 सप्टेंबर, 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा सुरु राहणार आहे. या काळात संबंधित शेतकरी बांधवानी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. यादीतील पात्र शेतकरी आधार प्रमाणिकरण कालावधीत मयत झाले असल्यास त्यांच्या वारसांची नोंदी संबंधित बँकेत तातकाळ करुन घ्यावेत. याबाबत बँकानी यापूर्वी पोर्टलवर अपलोड केलेल्या मयत खात्यांच्या डिलीशेनची सुविधा दि. 17 सप्टेंबर, 2024 पर्यत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच मयत खातेदारांच्या वारसांची नोंद घेऊन बँकाना खाती अपलोड करण्याची सुविधा दि. 18 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर, 2024 या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणिकरण प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी केले आहे. *******

12 September, 2024

कळमनुरी आयटीआयमध्ये तासिका तत्वावर निदेशक पदासाठी मुलाखतीचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 12 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी जि.हिंगोली या संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रीकल, वायरमन या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरींग मधील पदवी, पदविका, आयटीआय मधील पदवी, पदविका तसेच इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, वायरमन हा व्यवसाय घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या व त्यानंतर सीआयटीएस पूर्ण केलेल्या पात्रताधारक व शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांची तासिका तत्वावर (Clock Hour Basis) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पद भरण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी संस्थेत येऊन बायोडाटासह अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. मुबलक प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास दि. 18 सप्टेंबर, 2024 रोजी मुलाखतीचे आयोजन करुन निवड करण्यात येणार असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे. ******

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 08 ऑक्टोबर रोजी मुलाखतीचे आयोजन

हिंगोली (जिमाका),दि. 12 : भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक येथील नाशिक रोडच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 58 आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी हिंगोली जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दि. 8 ऑक्टोबर, 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. मुलाखतीस येताना डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील एसएसबी-58 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावेत. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत. उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com अथवा 0253-2451032 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9156073306 या व्हॉटसअप क्रमांकावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *****

प्राधान्यक्रम ठरवून उल्लेखनीय कामांचे प्रस्ताव सादर करावेत - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

* जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा हिंगोली (जिमाका),दि.12: प्रत्येक विभागाने जिल्हा वार्षिक योजनेची कामे प्राधान्यक्रम ठरवून उल्लेखनीय कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयोजित आढावा बैठकीत दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथे विकास कामांची आढावा बैठक घेणार असून, सर्व विभागप्रमुखांनी महत्त्वाच्या योजनांचे विभागामार्फत नाविन्यपूर्ण तसेच विशेष ओळख निर्माण करणाऱ्या बाबींसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केल्या. जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने तयार झालेल्या नवीन इमारतीमध्ये कार्यालय सुरु करावे. तसेच नवीन पशुसवंर्धन दवाखाने व पशुवैद्यकीय चिकित्सालये तयार करण्यासाठी योग्य नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करावेत. वन विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी आदर्श वन उद्यान उभारण्यासाठी आराखडा सादर करावा. तसेच शाळेच्या वर्ग खोल्या दुरुस्त्या, नवीन बांधकाम, शाळेत मुलींसाठी शौचालय, सीसीटीव्ही, तसेच आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधाची कामे प्राधान्याने करावेत. प्रत्येक शाळेत कोणत्या सुविधा आवश्यक आहेत याची यादी तयार करुन प्रत्येक शाळेला द्यावी. त्यामुळे सर्व शाळांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करता येतील. तसेच क्रीडा विभागाने जिल्ह्यातील सर्व मोठ्या शाळांमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध करुन द्यावेत. कौशल्य विकास विभागाने मागणीनुसार विविध विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करावे. सन 2023-24च्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करावे तसेच झालेल्या कामांचे छायाचित्र आयपास प्रणालीवर अपलोड करावेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर ‘आयुष्यमान भारत’च्या निकषानुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना केल्या. यासोबतच जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन, मत्स्य विभाग, वनीकरण विभाग, जलयुक्त शिवार, पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना, पाटबंधारे, पूरनियंत्रण, क्रीडा, पाणीपुरवठा, स्वच्छता, नगरविकास, पर्यटन, ऊर्जा, महिला व बालकल्याण, रस्ते व पूल, पर्यटन विकास आदी विविध योजनांसह अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनांचा आढावा घेऊन सूचना केल्या. आकांक्षित तालुका अंतर्गत संपूर्णत: अभियानांतर्गत ठरवून दिलेल्या 6 निर्देशांकाचे दिलेले उद्दिष्ट 30 सप्टेंबर अखेर पूर्ण करावेत. तसेच आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावेत. यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नेमून दररोज पोर्टलवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती पाहून त्यानुसार कार्यवाही करावी. तसेच वयोश्री योजनेचे प्राप्त अर्ज अपलोड करण्याचे काम तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना केल्या. *******

11 September, 2024

मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत

• मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम वेगवेगळे • 13 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार • 13 सप्टेंबर नंतर निवड प्रक्रिया होईल जिल्ह्यात कोणाचीही सध्याच निवड नाही हिंगोली दि.११(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी शुक्रवार (दि.१३) हा ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारला जाणार आहे. कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज देऊ नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. योजनादूत उपक्रमाला हिंगोली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आज बुधवारी २४२९ जणांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. तथापि, जिल्ह्यातील काही युवकांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत योजना यामध्ये गोंधळ करुन घेऊ नये. दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच मुख्यमंत्री योजनादूत योजनेतील नियुक्ती समजली जात आहे. युवकांनी हा गोंधळ करू नये, अद्याप मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची निवड प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर आहे. *ऑफलाइन अर्जाची गरज नाही* योजनादूत कार्यक्रमासाठी कोणत्याही ऑफलाइन अर्जाची अर्थात दस्ताऐवज जोडलेला अर्ज प्रत्यक्ष करण्याची गरज नाही. तसेच एकदा www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज केल्यावर त्याची कोणत्याही शासकीय कार्यालयात जावून चौकशी करण्याची किंवा ऑफलाईन अर्ज देण्याची आवश्यकता नाही. एकदा अर्ज केल्यानंतर कोणतीही सूचना, बदल, तक्रार करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी इन्फो ॲट द रेट महायोजनादूत डॉट इन ( info@mahayojanadoot.in ) या ईमेलवर मेल करावा यासाठी कोणत्याही कार्यालयाच्या भेटीची गरज नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला संपर्क साधण्याची गरज नाही. *संकेतस्थळ मंदगतीने चालत असल्यास पुन्हा प्रयत्न करा* अनेक विद्यार्थी अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर सदर संकेतस्थळ मंदगतीने चालत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र 13 सप्टेंबरपर्यंत येणारे सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहे. घाई न करता आरामात सर्वांनी आपले अर्ज भरावेत. अद्यापही संकेतस्थळ बंद करण्यात आलेले नाही. अथवा त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. या संदर्भातील कुठेही तक्रार असल्यास वरील ई-मेलवर तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. *१३ सप्टेंबर अखेरची तारीख* ७ सप्टेंबर २०२४ पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून, येत्या १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. *५० हजार योजनादूत* . प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. *असे आहेत निवडीचे निकष* या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. *ही कागदपत्रे आवश्यक* मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. त्याशिवाय या योजनेबाबत वेळोवेळी वृत्तपत्रात देण्यात येणाऱ्या सूचनांकडे उमेदवारांनी लक्ष ठेवावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. ******

10 September, 2024

वसमत तालुक्यातील जोडजवळा येथे चाईल्ड हेल्प लाईनकडुन जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड हेल्पलाईनकडून प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांच्या नियोजनानुसार वसमत तालुक्यातील जोडजवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. 9 सप्टेंबर, 2024 रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात दैनदिन आपल्या सभोवताली होणाऱ्या विचित्र घटनाना आळा बसण्याकरिता चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही सेवा 24×7 तास कार्यरत असून बालका संदर्भात असणाऱ्या समस्याचे निराकरण चाईल्ड हेल्प लाइन मार्फत केले जाते. चाईल्ड हेल्पलाइनचे सुपरवायजर श्रीमती धम्मप्रिया पखाले यांनी चाईल्ड हेल्प लाईन 1098 संकटात सापडलेल्या बालकांसाठी कशाप्रकारे काम करते व ही सेवा आपातकालीन परिस्थितीत शून्य ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना मदत करण्याचे काम करते हे समजावून सांगण्यात आले. तसेंच केस वर्कर सुरज इंगळे यांनी बालकांचे हक्क, बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006, बालसंगोपन योजना या विषयाची माहिती दिली. तसेच चांगला स्पर्श, वाईट स्पर्शबाबत बालकांना व उपस्थित पालकांना समजावून सांगण्यात आले. मुलावर लक्ष ठेवताना आपल्या शेजारील किवा समाजातील लोकांचा स्वभाव कसा आहे, मूल कोणासोबत खेळत आहेत व त्यांचे मित्र कोण आहेत याचे निरीक्षण करणे महत्वाचे आहे. बालकांना रोजच्या घडामोडी घरात असताना विचारल्या पाहिजेत, असे पालकांना समजून सांगण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. ठोके, शिक्षक वृंद तसेच गावातील गावकरी मंडळी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. *******

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 10 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2025 करिता केंद्र शासनाने दि. 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. सदरचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. पोर्टल व्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादींनी अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारचया जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ******

राष्ट्रीय लोकअदालतीचे 28 सप्टेंबर रोजी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 10 : येथील जिल्हा न्यायालयात व त्या अंतर्गत येणाऱ्या विविध न्यायालयात तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 28 सप्टेंबर, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोड युक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक/ कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अधिनियमचे कलम 138 खालील प्रकरणे, नगर परिषद, विद्युत महावितरण कंपनी, बँक व पतसंस्थांचे वादपूर्व प्रकरणे इत्यादी खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. ही सर्व प्रकरणे आपआपसातील तडजोडीद्वारे निकाली काढता यावीत. यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. ए. वाबळे, सचिव ॲड. ए.एस.वानखेडे यांनी केले आहे. ******

जिल्ह्यात 'स्वच्छता ही सेवा' अभियान राबविणार - मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले

हिंगोली (जिमाका), दि. 10 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम दि. 17 सप्टेंबर ते दि.1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी दिली आहे. यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबविण्यात येणार आहे. 19 सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठे, सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते व महामार्ग, पर्यटन स्थळ, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले या ठिकाणांची साफसफाई ग्रामस्थ, एनएसएस व एनसीसी, विविध मंडळे, सामाजिक संस्था व विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. गावातील खाऊ गल्ली किंवा बाजार पटांगणामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबवून स्वयंस्फूर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमात पथनाट्य व कलापथक यांची स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्लास्टिक जनजागृतीसाठी एकल प्लास्टिक टाळण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व कुटुंबांना गृहभेटीद्वारे जनजागृती करून 'एक झाड आईच्या नावे' उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर खासदार व आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत, स्वच्छता दौड, स्वच्छता सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. गावामध्ये टाकावूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची टाकावूपासून टिकाऊ वस्तू तयार करणेबाबत स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गावातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती करण्यात येणार आहे. कायम अस्वच्छ व दुर्लक्षित ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहेत. वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत, शोष खड्डा निर्मिती करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्वच्छतेची वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 01 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. दि. 2 आक्टोबर 2024 रोजी ग्रामसभा घेऊन 'स्वच्छ माझे अंगण' स्पर्धेतील सर्वोत्तम कुटुंबास सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे. तसेच या दिवशी स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. गावस्तरावर गणेश उत्सव मंडळे, महाविद्यालय, शाळा, एनएसएस विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, शासकीय, निम शासकीय कार्यालय यांचा सहभाग घेऊन दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक संजय कुलकर्णी यांनी केले आहे. ******

ज्येष्ठांना आधार देणारी “मुख्यमंत्री वयोश्री योजना”

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता तसेच मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आधार देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु केली आहे. आज घडीला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. योजनेचे स्वरुप : ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल. या योजनेसाठी राज्य शासनातर्फे 100 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना एकवेळ एकरकमी 3 हजार रुपयांच्या लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग तसें राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनःस्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्राचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष : ज्या नागरिकांची दि. 31 डिसेंबर 2023 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण झाली आहेत, असे नागरिक या योजनेकरिता पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधारकार्ड नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास ओळख पटविण्यासाठी इतर स्वतंत्र ओळख दस्तऐवजही ग्राह्य धरण्यात येणार येईल. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असणे आवश्यक असून याबाबत लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करावे. निवड किंवा निश्चित केलेल्या जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असणार आहे. अर्जदारांने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. मात्र दोषपूर्ण, अकार्यक्षम उपकरणे आदीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते. पात्र लाभार्थ्यांच्या बँकच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाल्यावर विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे देयक तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन घ्यावे. संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करावे. अर्जासोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे 2 छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे योजनेचे लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहेत. योजनेची अंमलबजावणी : लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे आदी कामे नोडल एजन्सी, केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून आयुक्त समाजकल्याण, पुणे यांच्याद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त, महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीद्वारे लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. ही योजना वृद्धापकाळातील आरोग्यविषयक समस्या दूर करून आनंदी जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 65 वर्षे व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली या पत्त्यावर सादर करता येईल. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ********

“मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” ज्येष्ठांच्या तीर्थदर्शनाची इच्छा शासन करणार पूर्ण

राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’ योजनेमध्ये भारतातील 73 व राज्यातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश असेल. या योजेनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक यांना मिळू शकतो. पात्रता :- • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. • वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अपात्रता :- • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकार किंवा राज्यु सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार,आमदार आहे ते अपात्र ठरतील. • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. • ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा नावावर नोंदणीकृत आहेत. • कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त जसे की टीबी, हदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इ. • अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे) • जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते. परंतु प्रवासासाठी आमंत्रित करुनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही. अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही. • जर असे आढळून आले की अर्जदार, प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो, तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला, तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल. या योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्येतेने करण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे : • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. • लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे- रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.) • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नांचा दाखला (वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपर्यत असणे अनिवार्य) किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड • वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो. जवळच्या नातेवाईकांना मोबाईल क्रमांक, या योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र . लाभार्थ्यांची निवड :- प्रवाशाची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल. जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, प्रतिक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो/ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जावू शकणार नाही. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॅाटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल. तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठविण्याचा निर्णय घेऊ शकतील. प्रवास प्रक्रिया : जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी, एजन्सीला देण्यात देईल. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी, एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल. प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात, याचा निर्णय राज्य शासन घेईल. सर्व यात्रेकरुंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल. रेल्वे, बसने प्रवास : जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशाची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल. प्रवास सुरु झाल्यावर, प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत, प्रवास मध्य मार्गी सोडणे आवश्यक असल्यास, उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवाशांचा गट :- हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. हा गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण, एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरु होईल. इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध :- या योजनेंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनामध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट, बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल. प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अतिरिक्त खर्चाबाबत :- कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष, सुविधांकरिता इतर सुविधा घ्यायच्या असतील, तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील. अर्ज करण्याची प्रक्रिया :- योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जावू शकतात. पात्र नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदाराने स्वत: उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरुन त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड), स्वत:चे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल, ॲपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्देवाने मयत झाल्यास त्या अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. मूळ अर्जदारासह जीवनसाथी, सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी : 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की, त्याचा जीवनसाथी, सहायक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे. 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करु शकेल. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती-पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो पाठविला जाऊ शकतो. सहाय्यकाचे किमान वय 21 वर्षे ते कमाल 50 वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरस्त असावा. प्रवासी, पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक असेल. या योजनेचे संनियत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री हे असतील तर उपाध्यक्ष राज्यमंत्री असतील. तर सहसचिव/ उपसचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे सदस्य सचिव असतील. जिल्हास्तरीय समितीची रचना :- अध्यक्ष-संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री , उपाध्यक्ष – जिल्हाधिकारी, सदस्य -मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त, महानगरपालिका, मुख्यधिकारी, नगरपरिषद, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि सदस्य सचिव -सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण हे राहणार आहेत. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली ********

वसमत येथे जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा संपन्न

हिंगोली, दि.10(जिमाका): जिल्ह्यातील हळद लागवडीचा वाढता पेरा लक्षात घेता, हळदीसाठी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करण्यात आली असून, वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रात द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभा व जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची तर प्रमुख उपस्थिती हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र कदम, डॉ. विजय काळे, डॉ. अनिल ओळंबे यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील हळदीला ‘वसमत हळद’ जीआय नामांकन मिळवून देण्यात आले आहे. आता शेतकरीच हळद लागवड उत्पादनातून समृद्ध शेती करत, दुप्पट उत्पन्न वाढवून जिल्ह्यात "हळद क्रांती" घडविण्यासाठी जागृत झाला आहे. त्याला वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण व संशोधनातून उत्पन्न वाढवत, शेतकरी आर्थिक प्रगती साधत असल्याचे जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळेत हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा माजी खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. हळदीमुळे वसमत जागतिक नकाशावर-जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी त्यांचा नात्यातील ज्येष्ठासोबत आलेला अनुभव हरिद्रा संशोधन केंद्राच्या द्वितीय वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थिताना सांगितला. जगातील सर्वात चांगली हळद कुठे मिळते, असे विचारले असता, त्यांना दक्षिण आफ्रिकेतील मेटागास्कन येथे सांगण्यात आले होते. त्या ठिकाणी नातेवाईक गेले असता, तेथील कृषी तज्ज्ञांनी सांगितले की, आमच्याहीपेक्षा चांगली हळद ही तुम्हाला भारतातील हिंगोली जिल्ह्यात मिळेल. या अनुभवावरून हळदीमुळे वसमत हे जागतिक नकाशावर आले असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. राजेंद्र कदम यांनी प्रास्ताविकात हरिद्रा केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली. डॉ. विजय काळे, (अकोला कृषी विद्यापीठ) यांनी कीड नियंत्रण व पीक व्यवस्थापन यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. अनिल ओळंबे यांनी आपल्या भागातील विषमुक्त हळद जागतिक स्तरावर नेण्यासाठी संशोधनाची गरज व्यक्त केली. तसेच शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, सनदी लेखापाल जीवन लाभशेटवाळ यांनी हरिद्रा केंद्रातील विविध कामकाजाचा अहवाल शेतकऱ्यांसमोर सादर केला. प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील नारायण मारुतीराव दळवी, मालेगाव येथील भगवान इंगोले, जितेंद्र गोविंदराव, कुरुंदवाडी येथील बसवेश्वर नारायण काष्टे, कवठा येथील श्रीदर्शन शंकरराव खराटे, प्रल्हाद बोरगड, मधुकरराव जाधव जामठीकर या शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधली. त्यामुळे त्यांचा हरिद्रा केंद्राच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन नेव्हल तर आभार रमेश देशमुख यांनी मांडले. जिल्हास्तरीय शेतकरी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रमेश देशमुख तंत्र अधिकारी, शिवाजी शितोळे, तंत्र अधिकारी शिवाजी राचेवाड, कृषि अधिकारी नितीन देशपांडे, कृषि अधिकारी पंकज कदम, तंत्र सहायक दिपाली गायकवाड, विठ्ठल कावरखे व हरिद्रा संशोधन केंद्राचे कर्मचारी व संचालक यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिवाजी काकडे, संभाजी सिद्धेवार, लक्ष्मीनारायण मुरक्या, श्रीमती प्रतीक्षा पतंगे, श्रीमती सुनंदा पोळ यांच्यासह संचालक व प्रगतशील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. ******

जिल्ह्यातील 100 ज्येष्ठ नागरिकांना होणार तिरुपती दर्शनाचा लाभ प्रत्येक तालुक्यातून 20 लाभार्थ्यांचे अर्ज दोन दिवसात भरुन घ्या - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन हिंगोली, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांची देश किंवा राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 100 ज्येष्ठ नागरिकांना येत्या दहा दिवसात तिरुपती दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी सर्व तालुक्यातील प्रत्येकी 20 ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे अर्ज येत्या दोन दिवसात भरुन घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ऑनलाईन बैठकीत दिले. आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व मुख्याधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तिरुपती दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील इच्छूक ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज तातडीने दोन दिवसात भरुन घ्यावेत. या सर्व ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने तिरुपतीला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत अर्ज भरुन घ्यावेत, अशा सूचना केल्या. *****

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करुन अर्ज भरुन घ्या- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, दि. 10 (जिमाका): जिल्ह्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शहरी भागात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात गावनिहाय विशेष आरोग्य शिबिरे घेऊन त्यांची तपासणी करावी. तसेच त्याना आवश्यक असणाऱ्या साहित्यासाठी अर्ज भरुन घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज ऑनलाईन बैठकीत दिले. आज मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेऊन योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व मुख्याधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वांइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट लाभ वितरणाद्वारे (डीबीटी) 3 हजार रुपयाच्या मर्यादेत निधीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभाग, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी समन्वय ठेवून प्रत्येक गावनिहाय व शहरातील प्रभागनिहाय आरोग्य शिबीरे घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक उपकरणाची गरज ओळखून तपासणी करावी. त्यांना आवश्यक असणाऱ्या उपकरणासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अनुदान देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावेत. त्यांना द्यावयाच्या लाभाचा उल्लेख असलेली यादी तयार करुन मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आतापर्यंत 6 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी थोडेसे मायबापासाठी या उपक्रमातील यादी तपासून त्यातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल. पात्र लाभार्थ्यांकडून प्राप्त अर्ज ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी यावेळी दिल्या. ******